Amazon India Layoffs 2022: अॅमेझॉन इंडियाने कर्मचारी कपातीवर स्पष्टीकरण दिले आहे. अॅमेझॉनने केंद्रीय कामगार मंत्रालयाला दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढले नाही. कंपनीने सांगितले की, कर्मचार्‍यांनी स्वतःच नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार मंत्रालयाने अॅमेझॉन इंडियाला कर्मचारींना कामावरून  काढल्याबद्दल समन्स पाठवले होते, त्यानंतर कंपनीने कामगार मंत्रालयाला स्पष्टीकरण दिले आहे.


काय म्हटलं कंपनीने? 


अॅमेझॉनने सांगितले की, त्यांनी कोणत्याही कर्मचार्‍यांना काढून टाकले नाही आणि ज्यांनी Severance Package स्वीकारले आणि स्वत: हून नोकरी सोडायचा पर्याय निवडला आहे. या संदर्भात कामगार मंत्रालयाने नोटीस बजावली असून अॅमेझॉन इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला उत्तर देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. अॅमेझॉन इंडियाने याबाबत आपली भूमिका कायम ठेवली आहे. ज्यामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचे राजीनामे ऐच्छिक असल्याचे म्हटले होते. कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याच्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे.


इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, केंद्रीय राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेनेटने (NITES) कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे तक्रार केली. ज्यामध्ये त्यांनी अॅमेझॉन इंडियाने कर्मचारी कपात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबरची अंतिम मुदत ठेवली असल्याचं म्हटलं आहे. याची चौकशी करण्यास यावे असं त्यांनी म्हटलं आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अनेकांच्या जीवनावर होणार असल्याने या निर्णयाची चौकशी व्हायला हवी, असही या संघटनेने म्हटले आहे. मंत्रालयाने तातडीने कंपनीला समन्स पाठवून बुधवारी बेंगळुरू येथील उप कामगार आयुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले. मंत्रालयाने आपल्या नोटीसमध्ये कंपनीला लिहिले आहे की, तुम्ही या कार्यालयात वैयक्तिकरित्या किंवा प्रतिनिधीमार्फत या तारखेला आणि वेळेला सर्व पुराव्यासह हजर व्हा. 


भारतात अॅमेझॉनने मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांना कामावरून काढल्याप्रकरणी आज आपले म्हणणे मांडले आहे. अॅमेझॉनच्या प्रतिनिधीने बेंगळुरू येथील केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या उप कामगार आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. मात्र, या सुनावणीवेळी अॅमेझॉन इंडियाचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. कामगार मंत्रालयाकडे आलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, अॅमेझॉनने भारतातील कार्चमारी कपात करताना नियमांचे पालन केले नाही.कामगार कायद्याचे उल्लंघन करून हे पाऊल उचलले जात आहे. त्यानंतर अॅमेझॉन इंडियाने सांगितले की, ते दरवर्षी कंपनीच्या प्रत्येक वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा आढावा घेतात. 


दरम्यान, अलीकडेच अॅमेझॉनने 10,000 हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता अनेक पदांवर कर्मचाऱ्यांची गरज नाही. त्यामुळे काही पदे रद्द करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत बाधित कर्मचार्‍यांचा कार्यकाळ 17 जानेवारी 2023 पर्यंत असेल आणि त्यानंतर सेवा समाप्त मानली जाईल.