मुंबई : कोणत्याही प्रकारची नोटीस न देता थेट राजीनामा देऊन काम बंद करणे हे सहा जणांना महागात पडण्याची शक्यता आहे. विनानोटीस राजीनामा देणाऱ्या सहा वैमानिकांविरोधात अकासा एअर लाईन्सने (Akasa Air) दाखल केलेल्या दाव्यावर आता मुंबईतच सुनावणी होईल, असं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. यातील सहा पैकी पाच वैमानिकांनी मुंबईत होणाऱ्या सुनावणीवर आक्षेप घेतला होता. आम्ही मुंबईत राहत नाही, आम्ही मुंबई बाहेरुन राजीनामा पाठवला होता. त्यामुळे कंपनीच्या दा़व्यावर मुंबईत सुनावणी होऊ शकत नाही, असा या पाच वैमानिकांनाचा दावा न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांनी बुधवारी फेटाळून लावला. 


वैमानिकांनी मुंबई बाहेरुन राजीनामा ई-मेलद्वारे पाठवला असला तरी कंपनीचे मुख्य कार्यालय हे मुंबईत आहे. हा राजीनामा स्विकारावा की नाकारावा किंवा काही अटी घालून राजीनामा स्विकारावा याचा निर्णय मुंबईतच होणार आहे. राजीनामा ई-मेलवरून जरी मुंबईबाहेरून पाठवण्यात आला असला तरी त्यावरील कार्यवाहीचा निर्णय मुंबईतील कार्यालयातच होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी कंपनीच्या दाव्यावर मुंबईतच सुनावणी होईल, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. 


काय आहे प्रकरण 


याप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर सहा महिनं काम करणं वैमानिकांसाठी बंधनकारक आहे.‌ या अटीची पूर्तता न करताच सहा वैमानिकांनी थेट काम बंद केलं. वैमानिकांनी अचानक काम बंद केल्यानं काही नियोजित विमानांची सेवा कंपनीला रद्द करावी लागली. त्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं तसेच कंपनीच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला. असं अचानक काम बंद करणं हा नोकरीतील कराराचा भंग आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 18 लाख रुपये व नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी 21 कोटी कंपनीला द्यावेत, अशी कंपनीची मागणी करत या कंपनीनं सहा वैमानिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. ज्यात कॅप्टन गरिमा कुमार, आदित्य यादव, कॅप्टन धीरेन सिंग चौहान, अनिल सेरराव, महेश खैरनार, अरविन नित्यनाथम या वैमानिकांचा समावेश असून याप्रकरणी पुढील आठवड्यातपासून सुनावणी सुरू होईल.


राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची कंपनी 


भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीची अकासा एअर कंपनी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air कंपनीला 7 जुलै रोजी नागरी उड्डयन संचालनालय म्हणजेच, डीजीसीएकडून विमान उड्डाणाची परवानगी मिळाली होती. 7 ऑगस्टला पहिल्या विमानानं उड्डाण घेतलं. अकासाचं पहिलं विमान मुंबई-अहमदाबादसाठी झेपावलं. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच झुनझुनवाला यांचे प्रकृती अस्वास्थामुळे निधन झाले.