Adani Wilmar Price Cut: देशात आजपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये (GST) वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल कंपनी अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी कपात केली आहे. फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत उत्पादने विकणाऱ्या या कंपनीने जागतिक स्तरावर तेलाच्या किंमत घट झाल्याने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने सोयाबीन तेलाच्या दरात सर्वात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमतीसह माल लवकरच बाजारात पोहोचेल. तत्पूर्वी धारा ब्रँड अंतर्गत खाद्यतेल विकणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि भात कोंड्याच्या तेलाच्या (Rice Bran Oil) किमतीत 14 रुपयांनी कपात केली होती.



खाद्यतेलाच्या किमतींवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने 6 जुलै रोजी एक बैठक बोलावली होती. ज्यामध्ये सर्व खाद्य तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील घसरणीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले होते. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले होते की, " जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीत झालेली घट आणि खाद्यतेलाच्या किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे प्रयत्न पाहता, अदानी विल्मरने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी केल्या आहेत." याआधी कंपनीने गेल्या महिन्यातही दर कमी केले होते.


सोयाबीन तेल आता 165 रुपयांना मिळणार 


खाद्यतेलाच्या कंपनीत कपात केल्यानंतर आता फॉर्च्युन सोयाबीन तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 165 रुपये प्रति लीटर झाली आहे. सूर्यफूल तेलाची किंमत 210 रुपये प्रति लीटरवरून 199 रुपये प्रति लीटर झाली आहे. मोहरीच्या तेलाची किंमत 195 रुपये प्रति लिटरवरून 190 रुपये प्रति लीटर इतकी कमी करण्यात आली आहे. फॉर्च्युन भात कोंड्याच्या तेलाची किंमत 225 रुपये प्रति लीटरवरून 210 रुपये प्रति लीटर करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातमी: 


Gold Rate Today : 24 कॅरेट सोन्याचा दर 60 हजारांच्या वर; तर चांदीही झाली महाग, काय आहेत ताजे दर?
Petrol Diesel : जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसात पेट्रोल-डिझेलचा खप घसरला; जाणून घ्या कारण
Share Market Updates : शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स 350 अंकांनी वधारला