मुंबई : हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल (Hindenburg Research report) समोर आल्यानंतर  गौतम अदानी सर्वेसर्वा असलेल्या अदानी समूहाला मोठे नुकसान झाले आहे. अदानी (Adani Group)  समूहाला  आठवड्याभरात शंभर अब्ज डॉलरचं  नुकसान झाल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. शंभर अब्ज डॉलर ($100 billion) भारतीय मूल्य 8.23 लाख कोटी आहे. अदानी समूहाच्या भांडवली बाजार मूल्यात (cumulative market capitalization loss) ही घसरण झाली आहे.

  


हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर भारतीय शेअर बाजारात अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअर्सची झपाटल्यागत विक्री झाली. स्वतः गौतम अदानी यांनी हिंडनबर्ग रिसर्च बिनबुडाचा असल्याचा दावा केला आणि अदानी समुहातील सर्व कंपन्याची बॅलन्सशीट मजबूत असल्याचा दावा केला तरी विक्रीचा सपाटा थांबला नाही. आज सकाळपासूनच 2.5 अब्ज डॉलर्स किंमतीच्या शेअर्सची विक्री झाल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत म्हटलंय. एका दिवसातच एवढा मोठा फटका बसला आहे तर गेल्या आठवड्याभरातील विक्रीच्या माऱ्यामुळे अदानी समुहाच्या भांडवली बाजार मूल्यात तब्बल 100 अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात 8.23 लाख कोटींची घट झाल्याचा अंदाज आहे. 


अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.  त्यानंतर आज  अदानी समूहातील कंपन्याच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली आहे. अदानी समुहातील सातही कंपन्यांचे शेअर्स पुन्हा गडगडले आहेत.  मात्र अदानी एन्टरप्रायझेजच्या समभागातही सात टक्क्यांची घसरण आली आहे. अदानी टोटल गॅसच्या समभागात मागील पाच दिवसात 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 


अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागात होत असलेल्या घसरणीचा गौतम अदानींना देखील फटका बसला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालाआधी श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असलेले गौतम अदानी थेट 16 व्या स्थानी आले आहेत.  गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली आहे. अदानींची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर्सवर आली आहे. 


अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने 20,000 कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता. हा एफपीओ बुधवारी मागे घेण्यात आला. याबाबत अदानी समूहानं परीपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं अदानी समूहानं परिपत्रकात सांगितलं. 


Hindenburg Research च्या अहवालात काय म्हटलंय?


Hindenburg Research ने आपल्या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अदानी समूह मोठ्या कर्जामुळे दबाबाखाली येऊ शकतो, असे या अहवालात म्हटले. त्याशिवाय, अदानी समूहाने शेअर दरात वाढ करण्यासाठी फेरफार आणि इतर प्रकार केले असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फ्रॉड केल्याचा दावा केला आहे. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर दर अधिक असून मूल्यांकनापेक्षा सुमारे 85 टक्के अधिक दर आहेत.