Adani Group Share : मागील काही दिवसांपासून अनेक प्रश्नांनी घेरलेल्या अदानी समूहाला (Adani Group) आणखी एक धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठी स्टॉक गुंतवणूकदार नॉर्वे वेल्थ फंडने (Norway Wealth Fund) अदानी समूहातील विविध कंपन्यांचे सारे इक्विटी शेअर्स विक्री केले आहेत. आता, या वेल्थ फंडची अदानी समूहातील कंपनीमध्ये कोणतीही गुंतवणूक नाही. नॉर्वेच्या या वेल्थ फंडने अदानी समूहातील तीन कंपन्यांमध्ये जवळपास 200 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली होती.
>> कोणत्या कंपनीत किती होती गुंतवणूक?
'रॉयटर्स'च्या वृत्तानुसार, 2022 च्या अखेरीस, अदानी समूहाच्या कंपन्यांमधील नॉर्वे वेल्थ फंडाची इक्विटी गुंतवणूक पुढील प्रमाणे होती.
- अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) : 83.6 दशलक्ष डॉलर
- अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (Adani Ports & Special Economic Zone) 63.4 दशलक्ष डॉलर
- अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) : 52.7 दशलक्ष डॉलर
अदानी समूहात गुंतवणूक नाही: NWF
नॉर्वे वेल्थ फंडचे ESG रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ESG शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ESG म्हणजे, पर्यावरण (Environmental), सामाजिक (Social) आणि शासन (Governance) संबंधित मुद्यांच्या समावेश आहे.
नॉर्वे वेल्थ फंड जगभरातील 9200 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करते. जगातील शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांमध्ये 1.3 टक्के शेअर्स आहेत. हा फंड नॉर्वे सरकारशी संबंधित असून केंद्रीय बँकेकडून याचे व्यवस्थापन केले जाते.
अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर, अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण सुरू झाली. त्यानंतर अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या शेअर दरात काही दिवस तेजी दिसून आली होती. मात्र, आज गुरुवारी (9 फेब्रुवारी 2023) अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. आज, अदानी टोटल गॅस तिमाही कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाले. तिमाही निकाल चांगले असूनदेखील एनएसईवर कंपनीच्या शेअर दरात 5 टक्क्यांची घसरण दिसून आली.
अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. आज, या कंपनीचा शेअर दर 10.72 टक्क्यांच्या घसरणीसह 1927.30 रुपयांवर स्थिरावला. कंपनीचा मार्केट कॅप आता 2,19,712.42 रुपये इतका झाला आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर दरात 2.90 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या कंपनीचा शेअर दर 582.05 रुपयांवर स्थिरावला. अदानी पॉवरच्या शेअर दरात आज लोअर सर्किट लागला. अदानी पॉवरचा शेअर दर 172.90 रुपयांवर स्थिरावला. अदानी ट्रान्समिशनमध्येही लोअर सर्किट लागला. या कंपनीचा शेअर पाच टक्क्यांच्या घसरणीसह 1248.55 रुपयांवर स्थिरावला.