Blinkit Order List : डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून घरपोच वस्तू मागवणे सोपं झाले आहे,. फूड डिलिव्हरी अॅपप्रमाणेच आता वस्तू घरपोच देण्याची सुविधा देणाऱ्या डिलिव्हरी अॅपनेदेखील वर्षातील काही रोचक माहिती समोर आणली आहे. झोमॅटोच्या अखत्यारीत असलेल्या ब्लिंकिटने (Blinkit) वर्ष 2023 मध्ये आलेल्या काही ऑर्डरची माहिती सादर केली आहे. कंपनीने याच माहितीचा आधार घेत ठिकठिकाणी होर्डिंग झळकावत ग्राहकांचे आभार मानले आहेत.
ब्लिंकिटचे सीईओ आणि सह-संस्थापक अलबिंदर धिंडसा म्हणाले की, 2023 मध्ये विक्रीचे काही मनोरंजक ट्रेंड समोर आले आहेत. दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने ब्लिंकिटच्या माध्यमातून वर्षभरात 9940 कंडोम मागवले. ही खरेदी पद्धत सामाजिक बदल दर्शवते असेही त्यांनी म्हटले. ‘ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' नुसार, गुरुग्राममध्ये वर्ष 2023 मध्ये 65,973 लाइटरची ऑर्डर करण्यात आली. तर, याच शहरात कोल्डड्रिंक ऐवजी सर्वाधिक मागणी टॉनिक वॉटरला होती.
एका महिन्यात 38 अंडरवेअर मागवले
ब्लिंकिटने दिलेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने एकाच महिन्यात 38 अंडरवेअरची ऑर्डर दिली. एकाने तब्बल 972 मोबाईल चार्जरची ऑर्डर दिली.
मध्यरात्रीच्या सुमारास 3 कोटी मॅगी पाकिटाची ऑर्डर
मध्यरात्रीनंतर ब्लिंकिटवर सुमारे 3,20,04,725 मॅगीची पाकिटे वितरित करण्यात आली. एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले होते. यावर्षी सुमारे 80,267 गंगा पाणी बाटल्या ब्लिंकिटद्वारे देण्यात आल्या. 2023 मध्ये, कोणीतरी 4,832 इतके आंघोळीचे साबण खरेदी केले. यावर्षी सुमारे 351,033 प्रिंटआउट्स सकाळी 8 वाजेपूर्वी वितरित करण्यात आले आणि 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 एनो पाऊचची ऑर्डर देण्यात आली. हैदराबादमधील कोणीतरी 2023 मध्ये 17,009 किलो तांदूळ ऑर्डर केला होता.