Annasaheb Dange College Of Engineering : अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक), बेंगलोर यांचेकडून ए++ मानांकन मिळाल्याची माहिती संस्थेचे सचिव अॅड. चिमणभाऊ डांगे व कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांनी दिली. नॅककडून जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठ, काकिनाडाचे माजी कुलगुरू डॉ. कुमार वेलंकी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीमध्ये कर्नाटकातील अक्कमहादेवी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. रमेश के. यांनी समन्वयक म्हणून तर डेहराडून येथील ग्राफिक एरा विद्यापीठाचे संचालक डॉ. प्रवीण पाटील यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. या त्रिसदस्यीय समितीने दि. 15 व 16 जून 2023 रोजी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देवून सात वेगवेगळ्या निकषांवर आधारित महाविद्यालयाचे मूल्यमापन केले होते. यामध्ये महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचे पैलू, महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांनी केलेले संशोधन आणि नवनिर्मिती, शैक्षणिक सोयी- सुविधा, विद्यार्थी केंद्रित शिक्षण, प्रशासकीय कामकाज, महाविद्यालयातील  वैशिष्ठ्यपूर्ण शिक्षण पद्धती व महाविद्यालयाचे वेगळेपण या पैलूंवर मूल्यमापन करण्यात आले होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे मूल्यांकन एकूण 4000 गुणांवर आधारित करण्यात आले होते. त्यापैकी सुमारे 70 टक्के गुण ऑनलाईन पद्धतीने करण्यात सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूल्यांकनावर आधारित देण्यात येतात तर उर्वरित 30 टक्के गुण प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलेल्या समितीकडून देण्यात येतात. या संपूर्ण प्रक्रियेनंतर या समितीने  आपला अहवाल नॅककडे सादर केलेला होता. समितीच्या या अहवालास अनुसरून नॅकच्या दि. 08 जुलै 2023 रोजी झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयास ‘ए ++’ दर्जा बहाल करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.


सध्या या महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीमधील 08 पदवी अभ्यासक्रम सुरू असून प्रथम वर्षाची एकूण प्रवेश क्षमता 660 इतकी आहे. आजमितीस सुमारे 2900 विद्यार्थी या महाविद्यालयात दर्जेदार शिक्षण प्राप्त करीत आहेत. आजअखेर या महाविद्यालयातून सुमारे 9500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकीमधील शिक्षण पूर्ण केले आहे. संपूर्ण भारतामध्येच नव्हे तर जागतिक पातळीवरही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवित आहेत. महाविद्यालयातील सर्व पात्र अभ्यासक्रमांना एन. बी. ए., दिल्ली यांचेकडून मानांकनप्राप्त करून घेण्यात आलेले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांच्या शिफारशीनुसार शिवाजी विद्यापीठाकडून या महाविद्यालयास 2017 पासून स्वायत महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आलेला आहे.


सध्या महाविद्यालयामध्ये एकूण 150 पेक्षा जास्त उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वर्ग कार्यरत आहेत. त्यांच्यामुळेच महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, शिक्षकांनी केलेले संशोधन आणि नवनिर्मिती या बाबतीमध्ये नॅककडून उत्तम श्रेणी देण्यात आलेली आहे. महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्वाधिक प्लेसमेंट, इंटर्नशिपद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या संधी यामध्येही महाविद्यालयास उत्कृष्ट गुण मिळाले आहेत. अभियांत्रिकी शिक्षणास आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक प्रयोगशाळा, त्यामध्ये उपलब्ध असणारी उपकरणे, त्यांचा विद्यार्थ्यांकडून होणारा वापर याही बाबतीत महाविद्यालय आघाडीवर असल्याचे या मूल्यांकनात दिसून आलेले आहे. नॅककडून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाबाबतचा अभिप्राय घेतला जातो. महाविद्यालयामध्ये दिले जाणारे शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात सोयी-सुविधा याबाबत विद्यार्थी समाधानी असल्याचे या निकालावरून दिसून आले आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयी-सुविधा, महाराष्ट्रातील एक आदर्श असलेले ग्रंथालय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स याबाबत नॅक समितीने महाविद्यालय व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI