आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे आजच्या काळात प्रत्येकाचं ध्येय बनलं आहे. भारतासारख्या देशात संपत्ती जमा करण्याला आणि ती वाढवत नेण्याला महत्त्व आहे. भारताच्या संस्कृतीत, परंपरांमध्ये आणि वेगवेगळे आर्थिक स्तर असलेल्या सामाजिक घटकांमध्ये संपत्तीचा संचय करण्याची वृत्ती भिनलेली आहे. या पार्श्वभूमीवर, संपत्ती वाढवण्याचं ध्येय बाळगणाऱ्या रिटेल गुंतवणूकदारांनी कर्ज आणि उधरीचे परिणाम काय असतात हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तीची सर्वात मोठी कमाई कोणती? भरपूर बँक बॅलन्स किंवा भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक ही व्यक्तीची सर्वात कमाई नसून, त्याचं कर्जमुक्त (Loan Free) असणं ही त्याची सर्वात मोठी कमाई आहे, असं आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं. असं का? विशेषतः भारतातल्या रिटेल गुंतवणूकदारांसाठी कर्जमुक्त असणं महत्त्वाचं का आहे? जाणून घेऊया...
कर्ज म्हणजे काय? (What is Loan)
सोप्या शब्दात सांगायचं झालं, तर आपण कुणाचं तरी देणं लागतो म्हणजे आपण कर्जात किंवा उधारीत आहोत. मग ते घर खरेदी करण्यासाठी उधार घेतलेले पैसे असो, शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज असो वा रोजचा खर्च भागवण्यासाठी घेतलेली उधारी असो! हे कर्ज जेव्हा साचत जातं तेव्हा आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, अशी परिस्थिती तयार होते.
कर्जमुक्त असणं महत्त्वाचं का आहे?
- मानसिक स्थैर्य: आपण कुणाचं काही देणं लागत नाही ही जाणीव आपल्याला मानसिक स्थैर्य देते. कर्जाचे हप्ते भरण्याचं, उधाऱ्या चुकवण्याचं कोणतंही बंधन नसतं तेव्हा आर्थिक नियोजन करणं आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणं शक्य होतं.
- रोख पैसे: कोणतेही कर्ज किंवा उधारी नसते तेव्हा गुंतवणूक करण्यासाठी, अचानक आलेल्या आर्थिक संकटात खर्च करण्यासाठी आणि येणाऱ्या आर्थिक संधींचा फायदा घेण्यासाठी हातात पैसे शिल्लक राहतात.
- जोखीम कमी होणं: कर्ज आणि उधारीमुळे जोखीम वाढते. आर्थिक अनिश्चिततेच्या काळात डोक्यावर कर्ज किंवा उधारी नसणं हा मोठा आधार ठरतो. दिवाळखोरीत निघण्याची शक्यताही कमी होते.
भारताच्या संदर्भाने
- सांस्कृतिक महत्त्व: भारतीय परंपरेत कर्ज हे ओझं मानलं गेलं आहे. भारतातल्या प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्येही कर्ज कसं वाईट आहे याचे उल्लेख आढळतात. त्यामुळे कर्जमुक्त राहणं, किंवा उधारी भागवणे हे भारतात केवळ आर्थिकदृष्ट्याच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही महत्त्वाचं मानलं गेलं आहे.
- ग्राहक कर्जात वाढ: क्रेडिट कार्ड सहज उपलब्ध होणं, कर्ज घेण्याचे अनेक सुलभ पर्याय उपलब्ध असणे यामुळे भारतात ग्राहक कर्जात वाढ होताना दिसून येत आहे. त्यातून खरेदी करण्यासाठी त्वरित भांडवल उपलब्ध होतं ही जमेची बाजू असली, तरी लोक कर्जाच्या ओझ्याखली अडकून आर्थिक संकटात सापडतात हेही खरं आहे.
- व्याजदर: पाश्चात्य देशांशी तुलना करायची झाल्यास, भारतात व्याजाचे दर पूर्वीपासूनच तिकडच्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कर्ज घेणं भारतात जास्त महाग आणि अडचणीचं आहे.
रिटेल गुंतवणूकदारांसाठी
- जास्तीत जास्त परतावा: कोणत्याही कर्जाचं ओझं अंगावर नसतं तेव्हा आपण केलेल्या गुंतवणुकीतून मिळालेला परतावा सुरक्षित राहतो. याचाच अर्थ तुमचा पैसा हा केवळ तुमचा असतो.
- लवचिकता: कर्जमुक्त असल्यास आपण गुंतवणुकीचे पर्याय निवडताना जास्त लवचिकपणा दाखवू शकतो. महिन्याला कोणताही हप्ता किंवा उधारी चुकती करायची नसते तेव्हा आपण दीर्घकालीन किंवा जास्त परतावा मिळवून देणारी गुंतवणूक करू शकतो.
- कंपाऊंडिंगचा फायदा: थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, की "कंपाऊंडिंगची ताकद हे जगातलं आठवं आश्चर्य आहे.” कर्जमुक्त असताना आपण जी बचत करतो, त्या रकमेची योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कंपाऊंडिंगचा फायदा घेणं शक्य होतं. त्यातून आपल्या संपत्तीचा गुणाकार होत जातो.
कर्जमुक्तीचीच्या दिशेने
- बजेटिंग आणि नियोजन: तुमचा पैसा कुठे खर्च होतोय हे समजून घ्या. त्यानुसार तुमच्या खर्चाचं नियोजन करा आणि तो तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त नसेल याची खबरदारी घ्या.
- परतफेडीला प्राधान्य द्या: तुमच्यावर सध्या काही कर्ज असेल, आणि विशेषतः त्याचा व्याजदर जास्त असेल, जसे की क्रेडिट कार्डचं थकीत बिल, तर ते कर्ज चुकते करण्याला प्रथम प्राधान्य द्या. जास्त व्याजदर असलेलं कर्ज पूर्ण संपवल्यास त्यातून तुमची बरीच बचत होऊ शकते.
- अनावश्यक उधारी टाळा: तुम्हाला कर्ज किंवा उधारी उपलब्ध आहे याचा अर्थ तुम्ही ती घ्यायलाच हवी असा होत नाही. जेव्हा खरंच गरज असेल आणि कर्ज घेण्यावाचून पर्याय नसेल तेव्हाच कर्ज घ्या. ते घेताना तुम्ही त्याची परतफेड कशी करणार आहात याचं नियोजन करा.
- इमर्जन्सी फंड: अचानक येणाऱ्या आर्थिक संकटात खर्च करण्यासाठीचा इमर्जन्सी फंड तयार करा. अशा वेळी तुमच्याकडे पैसे उपलब्ध असल्यास कर्ज किंवा उधारी घेण्याची वेळ येत नाही.
भारतातल्या रिटेल गुंतवणूकदारांना आपली संपत्ती वाढवायची असेल, तर हुशारीने गुंतवणूक करून भागणार नाही. त्यासाठी आर्थिक निर्णय घेताना ते समजूतदारपणे घेण्याची, चागल्या आर्थिक सवयींचा अवलंब करणे आवश्यक आहे. कर्ज हे साधन हुशारीने वापरलं तर ते फायद्याचं ठरू शकतं, पण अनावश्यक आणि बेजबाबदारपणे घेतलेल्या कर्जामुळे तुमच्या आर्थिक समृद्धीच्या मार्गात मोठे अडथळे येऊ शकतात. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या तुमच्या मार्गात कर्जमुक्त असणं हा मोठा आधार ठरतो यात शंका नाही.
किरांग गांधी यांचे अन्य ब्लॉग: