टाय टाय फिस्स... किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली इलेव्हन संघांमधला सामना अखेर टाय झाला. त्या टाय सामन्यात वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानं सुपर ओव्हर विजयाचं पारडं दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं झुकवलं. त्याआधी दिल्लीच्या मार्कस स्टॉईनिस आणि पंजाबच्या मयांक अगरवालच्या धडाकेबाज फलंदाजीनं हा सामना गाजवला.


त्यामुळं आयपीएलच्या रणांगणात दिल्ली का जिंकली आणि पंजाब का हरलं किंवा स्टॉईनिस आणि अगरवाल यांच्या तुफानी खेळी या विषयांइतकाच भारतीय क्रिकेटरसिकांमध्ये गप्पांचा फ़ड रंगला तो ख्रिस गेल आणि अजिंक्य रहाणेच्या लॉकडाऊन स्टेटसवरून. पंजाबनं दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात ख्रिस गेलसाऱख्या मॅचविनरला डगआऊटमध्येच बसवलं. कर्णधार लोकेश राहुलनं गेलऐवजी वेस्ट इंडिजच्याच निकोलस पूरनवर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली.


पंजाबच्या फौजेत ख्रिस गेलचं जे झालं तोच न्याय दिल्लीनं अजिंक्य रहाणेला दिला. राजस्थान रॉयल्सला गुडबाय करून अजिक्य यंदाच्या मोसमासाठी दिल्लीच्या फौजेत डेरेदाखल झाला आहे. पण दिल्लीच्या फायनल इलेव्हनमध्ये तुला हक्काचं स्थान नाही, हे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला त्याला तोंडावर सांगितलं. मग अजिंक्य रहाणेनं दिल्लीकडून खेळण्याचा निर्णय का घेतला होता? पंजाबनंही कशाच्या भरवंशावर गेलला डावललं आणि निकोलस पूरनला खेळवलं?


गेलला डगआऊटमध्येच का बसवलं?


ख्रिस गेलच्या बाबतीत बोलायचं, तर हे मान्य करायलाच हवं की गेलचा दिवस असेल तर त्यादिवशी त्याला कुणीही रोखू शकत नाही. त्यादिवशी त्याची बॅट प्रतिस्पर्धी आक्रमणाची लक्तरं काढत राहते. आयपीएलच्या कारकीर्दीत 125 सामन्यांमध्ये 4484 धावा, त्यात 369 चौकार आणि 326 षटकार ही गेलची कामगिरी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी आणि फायनल इलेव्हनमध्ये त्याचं ध्रुवपद निर्माण करणारी आहे.


पण तोच ख्रिस गेल बांगलादेश प्रीमियर लीगनंतर गेले आठ महिने स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. इतकंच काय, पण त्याची बॅट कधी लागेल याचा नेमका भरवसा देता येत नाही. त्याउलट निकोलस पूरननं नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये 11 सामन्यांमध्ये एका शतकासह 245 धावा ठोकून आपण तयारीत असल्याचं दाखवून दिलं होतं. तो यष्टिरक्षणाचा एक उत्तम पर्याय आहे. त्याउलट गेलला क्षेत्ररक्षणात लपवायचं कुठं हा कर्णधारासमोरचा मोठा पेच असतो. त्यामुळंच पंजाबनं ट्वेन्टी ट्वेन्टीचा किंग् असूनही गेलला डगआऊटमध्येच बसवलं आणि पूरनला रणांगणात उतरवलं. अर्थात त्याच पूरनला दोन्हीवेळा भोपळाही फोडता आला नाही, ही बाब अलाहिदा.


अजिंक्य रहाणे वाट चुकला?


आता बोलूया अजिंक्य रहाणेविषयी. भारताच्या या कसोटी उपकर्णधाराची वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमधली कारकीर्द कधीच धोक्यात आली आहे. अजिंक्य वन डेत गेली अडीच वर्षे, तर ट्वेन्टी ट्वेन्टीत तब्बल चार वर्षे भारताकडून खेळू शकलेला नाही. आयपीएलच्या रणांगणात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं गेल्या नऊ वर्षांत १०० सामन्यांमध्ये 2810 धावांचा रतीब घातला आहे. तोही 122 पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं. पण आयपीएलमधल्या या कामगिरीचा अजिंक्य रहाणेच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला काहीच लाभ होताना दिसत नाहीय.


या परिस्थितीत अजिंक्य रहाणेनं गेल्या नोव्हेंबरमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याचा निर्णय घेऊन एक जुगार खेळलाय का? कारण हा जुगार त्याला थेट रिकी पॉण्टिंगच्या तालमीत घेऊन गेलाय. सचिन तेंडुलकरच्या जमान्यात जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला पॉण्टिंग हा आता दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच पॉण्टिंगच्या तालमीत ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या फलंदाजीची बाराखडी पुन्हा गिरवण्याचा अजिंक्यचा प्रयत्न आहे? कारण दस्तुरखुद्द पॉण्टिंगचा तसा दावा आहे.


रिकी पॉण्टिंग म्हणाला की, दिल्लीच्या फायनल इलेव्हनमध्ये अजिंक्यला हक्काचं स्थान नाही, हे आम्ही त्याला समजावून दिलं आहे. पण ट्वेन्टी ट्वेन्टी फॉरमॅटमधल्या अजिंक्यच्या फलंदाजीत सुधारणा व्हावी म्हणून मी त्याच्यावर मेहनत घेतोय. पॉण्टिंगच्या या शब्दांचा अर्थ काय घ्यायचा? अजिंक्य रहाणे त्याच्या आयपीएल कारकीर्दीतला जुगार निव्वळ पॉण्टिंगची शिकवणी मिळावी म्हणून खेळला का?


आता अजिंक्य रहाणेच्या शब्दांवर विश्वास ठेवून एक घटनाक्रम पाहूया. इंग्लंडमधल्या वन डे विश्वचषकाच्या कालावधीत तो हॅम्पशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत होता. त्या वेळी इंग्लंडमध्ये आलेला दिल्ली कॅपिटल्सचा मेण्टॉर सौरव गांगुलीनं आपल्याला दिल्लीकडून आयपीएलमध्ये खेळण्याची ऑफर दिली असं दस्तुरखुद्द अजिंक्यनं प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं होतं. अर्थात सौरवदादानं त्याला विचार करण्यासाठी पुरेसा वेळही दिला होता. मुख्य म्हणजे सौरव गांगुली त्या वेळी बीसीसीआयचा अध्यक्ष नव्हता. पण तो बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे याची तोवर कल्पना आली होती.


सौरव गांगुली 23 ऑक्टोबर 2019 रोजी बीसीसीआयचा अध्यक्ष आला. त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये राजस्थान रॉयल्सनं अजिंक्य रहाणेसाठी दिल्ली कॅपिटल्ससोबत सौदा केला. याचा अर्थ सौरवदादानं दिलेली ऑफर टाळणं अंजिंक्यला शक्य झालं नाही असं मानायचं का? की, सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत आपला भाग्योदय होईल या भाबड्या विचारानं अजिंक्यनं त्यानं दिलेली ऑफर स्वीकारली?


सध्या तरी झालं गेलं सारं दिल्ली कॅपिटल्सला मिळालं आहे. पण पृथ्वी शॉ, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि मार्कस स्टॉईनिस यांच्यासारख्या गुणवान फलंदाजांच्या भाऊगर्दीत स्थान मिळवायचं आणि त्यांच्या शर्यतीत त्या स्थानावर हक्क गाजवण्याचं आव्हान आता अजिंक्य रहाणेसमोर आहे. पाहूयात या परीक्षेला तो कसा सामोरा जातो?