देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक म्हणजे बारामती. पवार घराण्याचा अभेद्य किल्ला अशी बारामतीची ओळख. इथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत फक्त म्हणायला आहे. खरी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच आहे. बारामतीकरांनी सलग तीनवेळा सुप्रिया सुळे यांना दिल्लीत पाठवलं आहे. या तीनही वेळा त्यांच्या प्रचाराची धुरा, सर्व नियोजन एकहाती सांभाळायचे अजितदादा. साम दाम दंड भेद सगळं काही वापरुन अजित पवार सुप्रिया सुळेंचा मार्ग प्रशस्त करायचे, कधी निधी कधी पाणी कधी गोडी गुलाबी कधी थेट धमकीसदृश इशारा असे सगळे मार्ग ते वापरायचे, त्यामुळे २००९ पासून सुप्रिया सुळेंना, शरद पवारांना इथे फार लक्ष द्यायची वेळ कधीच आली नाही . फक्त लीड मोजायची आणि जिंकल्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं एवढंच काम सुप्रिया सुळेंसाठी शिल्लक असायचं.
आता मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे हे चित्र बदललं आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार समोरासमोर आहेत. अजित पवारांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना लोकसभेच्या मैदानात सुप्रिया सुळें विरोधात उतरवावं लागलं. त्यामुळे अजितदादांची सगळी यंत्रणा कामाला लागलीय. त्यांना सर्वात मोठी साथ भाजपची मिळतेय त्या खालोखाल शिवसेना आणि खडकवासला सारख्या ठिकाणी मनसेची. गेल्या १५ वर्षात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी नेहेमी वाईटपणा घेतला, अनेकांशी शत्रुत्व घेतलं. पुरंदरचे विजय शिवतारे असोत, इंदापुर चे हर्षवर्धन पाटील असोत, दौंडचे राहुल कुल असोत की भोरचे संग्राम थोपटे . आता अचानक त्या सगळ्या विरोधकांच्या दारात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातही कमीपणा न मानता जुळवून घेत आहेत. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या कारणांमुळे सुनेत्रा पवार यांना मदत करणार आहेत, यामागे सर्वात मोठं गणित हे विधानसभा निवडणूकांचं असणार आहेच तसेच यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली बांधबंदिस्ती हे कारण सुद्धा आहे.
अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे, आज बारामतीत जी पिंपरी चिंचवडची झलक दिसतेय ती दादांमुळेच हे सामान्य बारामतीकरांना माहिती आहे. त्यामुळेच विधानसभेला दादा इथून विक्रमी मतांनी निवडून येतात आणि लोकसभेला सुप्रिया सुळेंना बारामतीतून विक्रमी मताधिक्य मिळवून देतात. झीरो अवरच्या निमित्ताने बारामतीत फिरता आलं, ग्राऊंड झीरो वर मूड काय आहे ते जवळून बघता आलं. पवार कुटुंबातील सदस्यांपासून सामान्य मतदारांना बोलता आलं.
राजेंद्र पवार यांचं कुटुंब सुनंदा पवार, आमदार रोहित पवार हे तर सुरुवातीपासून अजित पवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात होते, त्यांनीही अजित पवारांवरील हल्ला आणखी तीव्र केला आहे.
पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना तिकीट दिल्यानंतर सर्वात मोठी उलथापालथ कुठली झाली असेल तर ती म्हणजे अजितदादांना नेहमी साथ देणारे अजितदादांचे सख्खे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडून चुलत काका शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. हा अजितदादांसाठी सर्वात मोठा धक्का असेल. श्रीनिवास पवार यांच्या सुविद्य पत्नी शर्मिला पवार या शरयू फाऊंडेशन च्या माध्यमातून गावपातळीवर काम करतात; त्या सुप्रिया सुळेंच्या मागे उभा राहिल्या. त्यांनी प्रचारात आपल्या परीने रंग भरला. त्यांचा मुलगा युगेंद्र पवार आक्रमकपणे बाजू मांडत काका अजित पवारांच्या विरोधात मैदानात उतरला. आक्रस्ताळेपणा केला नाही, पाय जमिनीवर ठेवले, रोहित पवारांच्या काही चुकांमधून शिकले तर युगेंद्र पवार 'लंबी रेस का घोडा' ठरु शकतात. अर्थात त्यांच्या राजकारणातील एन्ट्री बद्दल ना सुनंदा पवार समाधानी होत्या ना सुप्रिया सुळे, दोघींनीही सावध प्रतिक्रिया दिल्या. युगेंद्र पवार यांना आणखी शिकण्याचा, सबुरीचा सल्ला दिला आहे. फार दूरवरचा विचार न करता युगेंद्र आज अजित पवारांविरोधात उभा आहेत असं अनेकांना वाटतं.
अजितदादांच्या विरोधात सुप्रिया सुळे, युगेंद्र, रोहित, सुनंदा, शर्मिला, श्रीनिवास, शरद पवार बोलत असताना त्यांच्या बाजुने पार्थ, जय बोलतील त्यातही पार्थ पवार किल्ला लढवतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी शांततेत काम करण्याला प्राधान्य दिलं आहे किंवा त्यांना तसं सांगितलं गेलं असावं. पार्थ पवार 2019 च्या धक्क्यातून सावरतील, शिकतील, सुधारणा करतील, नव्या जोमाने राजकारणात उतरतील असं वाटत होतं पण ते झालं नाही. आता सर्वात कसोटीची वेळ असताना एखादा तरुण दादांच्या बाजुने बोलायला उभा राहिला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता. काहीही असलं तरी या सगळ्यामुळे पवार कुटुंबात अजित पवार एकाकी पडल्याचं चित्र आहे.याचाही थोडाफार परिणाम मतदानावर होईल.
बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे, पवार परिवारात अशी फूट पडल्यानं तो अस्वस्थ आहे.. बाहेरच्या कोणी पवारांवर टीका केली की तो उसळून उठतो. इतकी वर्ष पवारांना दुखावले नाही आता या वयात कशाला दुखवायचं असं मानणारा एक वर्ग आहे. पण हे नातं बारामती शहरापुरतं, विधानसभा मतदारसंघापुरतंच आहे. इतर पाच मतदारसंघांत पवारांकडे बुली म्हणून, आपल्या हक्काचं पळवणारे म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे मोठ्या पवारांसाठी थोडीफार सहानुभूती असलीच तर ती प्रॉपर बारामतीपुरती मर्यादित आहे. त्यामुळेच महिला मतदारांना भावनिक साद घालण्यासाठी फोकस केलं जात आहे. त्यासाठी महिला बचत गटाचा उपयोग केला जात आहे.
परवाच्या महिला मेळाव्यात पवार परिवारातील सर्व महिला हजर होत्या, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती बोलत नसल्या तरी आपल्या उपस्थितीने त्यांची पॉप्युलॅरिटी किती आहे याचा अंदाज देऊन गेल्या. या मेळाव्यात मंचावर आणखी एक शांत संयमी चेहरा होता तो प्रतिभाकाकींचा. शरद पवार यांच्या आयुष्यातील प्रत्येक चढउतार जवळून पाहिलेल्या, त्यात त्यांच्यामागे खंबीरपणे उभा राहिलेल्या प्रतिभाकाकीचं बारामतीतील महिला वर्गाला अप्रूप वाटलं नाही तरच नवल. या सगळ्या भावनिक गोष्टींचा उपयोग झाला तर सुप्रिया सुळेंच्या प्रचार यंत्रणेला हवंच असेल.
या मतदारसंघातील सगळं नियोजन अजित दादा पाहात असल्यामुळे सुप्रिया सुळेंना इकडे फार फिरकायचं काम पडलं नाही. सुरुवातीच्या काळात फार मिसळल्या नसल्या तरी त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्या सकाळी काटेवाडीतील सर्वसामान्य महिलेसोबत दिसतात तर रात्री मुंबईच्या ग्लॅमरस जगातील बड्या उद्योगपतीच्या कौटुंबिक गेट टुगेदर मध्ये. या दोन्ही पोल-अपार्ट जगात बॅलन्स त्यांनी सांभाळला आहे. पवार साहेबांची लेक म्हणून त्यांचं कौतुक आजही आहे. अभ्यासू खासदार, डाऊन टू अर्थ ताई अशी इमेजही त्यांनी कमावली आहे.
२०१९ ला सुप्रिया सुळे १ लाख ५५ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या, त्यातील १ लाख २७ हजार ९१८ मतांचा लीड एकट्या बारामती ने दिला होता. तर इंदापुरने ७० हजार ९३८ मतांचा लीड दिला होता. या दोन्ही मतदारसंघातून लीड मिळणे तोही एवढा मोठा हे सध्याची परिस्थिती पाहता तरी दुरापास्तच वाटते आहे. गेल्या वेळी सुप्रिया सुळेंना सहापैकी बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर या 4 मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंड मधून 7 हजाराची तर खडकवासल्यातून तब्बल 65 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे बारामतीत मतदान कट टू कट झाले तरी दौंड आणि खडकवासल्यातलं मताधिक्य टिकवले किंवा वाढवले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर बनेल असे गणित असू शकते. दौंडमध्ये महेश भागवत कुणाचं गणित बिघडतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पुरंदरमधून गेल्यावेळी सुप्रिया सुळेंना ९ हजाराची आणि थोपटेंच्या भोर मधून १९ हजाराची लीड मिळाली होती, तिथली स्थानिक गणित बघितली तरी यावेळी फार उलटफेर होईल असं वाटत नाही. विजय शिवतारेंनी काम केलं आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं, एकनाथ शिंदेंचं ऐकलं तर तिथे सुद्धा समसमान मतं पडतील किंवा सुनेत्रा पवारांना एडवांटेज मिळेल असं बोललं जातंय. हा प्रश्न फक्त या लोकसभेच्या निकालापुरता असता तर वेगळी गोष्ट होती पण याला ४-५ महिन्यात होणाऱ्या विधानसभेची समीकरणं सुद्धा जोडली गेली आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील, विजय बापू शिवतारे, राहुल कुल जोमाने कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांनी ग्राऊंड लेव्हलवरील सर्व नियोजन व्यवस्थित केलं आहे. जात हा फॅक्टर असला तरी केंद्रात भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित मानले जातंय. तो विचार सुद्धा इथला तरुण मतदार करत आहे असं जाणवलं.
थोडक्यात काय तर बारामती मतदारसंघात जे 'दिल से' विचार करत असतील त्यांची पसंती सुप्रिया सुळे असतील.
तर 'दिमाग से' विचार करत असतील ते नक्कीच सुनेत्रा पवार यांच्या समोरचं बटन दाबतील असं आजचं तरी चित्र आहे.
संदीप रामदासी यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग!
BLOG : मुत्सद्देगिरीची झलक, शरद पवारांचं राजकारण अन् शिंदे-दादा-फडणवीसांची पंचाईत
उबाठा सेनेचा मार्ग खडतर?