Lata Mangeshkar : 'मेरी आवाज ही पहेचान है' गानसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकरांचा हा आवाज भावी पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहे. त्यांचा आवाज, त्यांचं संगीत, त्यांचे सूर, त्यांची गाणी ही अजरामरच आहेत. 36 भाषांमध्ये 30 हजाराहून अधिक गाणी.. हा दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. मात्र यशाचं हा सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी असलेली जिद्द, प्रामाणिकपणा, संगीतावरची श्रद्धा, स्वतःवरचा विश्वास आणि रियाज हे आलौकिकच म्हणावं लागेल. गेल्या 6 दशकाहून अधिक काळ ज्य़ांचा आवाज घराघरात घुमला, तो आवाज आज हरपला आहे. लता दीदींच्या जाण्याने संगीतविश्वच नव्हे तर आपल्या घरातली व्यक्ती गेल्याने पोरकं झाल्याची भावना प्रत्येकाचीच आहे. संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारं लता मंगेशकर यांच्या 'लता' नावाची कहाणीही रंजक आहे.


लता मंगेशकर यांचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. आज हे नाव घराघरात पोहोचलेलं आहे. मात्र लता मंगेशकरांचं नाव हे लता नसून हेमा होतं. हे नाव त्यांना त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकरांनी दिलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर हे मराठी थिएटरमध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यसंगीतकार होते. त्यांच्याकडूनच संगीताचा वारसा लता मंगेशकरांना मिळाला.


लता मंगेशकरांचं मूळ गाव हे गोव्यातलं मंगेशी. दिनानाथ मंगेशकरांच्या आई येसूबाई या मंगेशीतल्या मंदिरात भजन, किर्तन गात. इथून मंगेशकर हे आडनाव दिनानाथ यांना मिळालं. भावबंधन या नाटकात पंडित दिनानाथ मंगेशकर यांनी काम केलं होतं. त्यावेळी नाटकातल्या महिला पात्राचं नाव हे लतिका होतं. पंडित दिनानाथ मंगेशकरांना हे नाव इतकं आवडलं की त्यांनी आपल्या मुलीचं हेमा हे नाव बदलून लता ठेवलं. या त्याच छोट्या हेमा आहेत ज्या आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर म्हणून आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.


लता नावाचा अर्थच मुळात सक्रिय, सर्जनशील आणि सक्षम. लता दीदींची कर्मभूमी मुंबई असली तरी त्यांची जन्मभूमी इंदोर त्यांच्या मनात कायमस्वरुपी राहिली. इंदोरबाबत त्यांना खास आपुलकी होती. जेव्हा केव्हा त्या इंदोरमधल्या लोकांना भेटायच्या त्या त्यावेळी इंदोरमधल्या सराफाबाबात त्या विचारत असे. सराफा म्हणजे खाऊगल्ली. इंदोरमधल्या लोकांच्या भेटीवेळी किंवा फोनवर बोलणं झाल्यास सराफा तसाच आहे का? असं त्या विचारत असे. इंदोरमध्ये असलेल्या लता दीदींच्या घराचं रुपडं पालटलं आहे. मात्र त्यांच्या आठवणींचा खजिना इंदोरवासियांच्या मनात कायमस्वरुपी घर करुन आहे. लता हे नाव ऐकलं की आता फक्त दीदी आठवतील. आणि या नावाची जादू आसमंतात कायमस्वरुपी राहणार.


संगीतविश्वात पाऊल ठेवणारा कलाकार आणि भावी पिढीसाठी लता मंगेशकर या आदर्श आहेत. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, असंख्य अडचणींवर मात करत, अनेक चढ उतार पाहिल्यानंतर आत्मविश्वास आणि आपल्या साधनेवर विश्वास ठेवत, संगीतालाच आपला श्वास, ध्यास मानणाऱ्या लता दीदींचं जाणं म्हणजे मोठा धक्का आहे. लता दीदींसारखं कुणी झालं नाही आणि होणेही नाही!


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट


Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड