टीम इंडियाला 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी आणि 2011 सालचा विश्वचषक जिंकून देणारा शिलेदार युवराजसिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक जमाना युवराजनं आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गाजवला. पण कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादित षटकांचं क्रिकेट, युवीला भारतीय संघात आज स्थान नाही. आयपीएलमधला त्याचा रुबाबही आता इतिहासजमा झाला आहे. तरीही त्याची निवृत्ती करोडो भारतीय क्रिकेटरसिकांना चटका लावणारी ठरली आहे.

भारतीय क्रिकेटच्या युवराजानं... युवराजसिंगनं आपली बॅट अखेर म्यान केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा युवराजचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांना पचवणं कठीण असलं तरी, युवीच्या कारकीर्दीला मिळालेलं वळण पाहता त्याचा हा निर्णय आज ना उद्या अपेक्षितच होता.

युवराज आज वयाच्या चाळीशीपासून केवळ दोन वर्षे दूर आहे. गेली दोन वर्षे भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या संघात त्याला स्थान मिळू शकलेलं नाही. तो अखेरचा कसोटी सामना खेळला त्याला तर आता साडेसहा वर्ष लोटलीयत.

आयपीएलच्या रणांगणातही युवराजसिंगचा एका जमान्यातला रुबाब आज राहिलेला नाही. कुण्या एका मोसमात त्याला चौदा कोटींची बोली लागली होती. पण गेल्या दोन मोसमात ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या या ‘प्रिन्स’ला जेमतेम एक कोटीच्या मूळ किमतीवरच समाधान मानावं लागलं. मुंबई इंडियन्सकडून यंदाच्या मोसमात त्याला केवळ चारच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदाच्या सेलिब्रेशनमध्ये तर युवी असूनही नसल्यासारखाच दिसत होता.

त्यामुळं युवराजसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कधी करणार, या असा प्रश्न पडण्यापेक्षा तो आज ना उद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार हे वास्तव स्वीकारणं स्वाभाविक होतं.

अखेर तो दिवस उजाडला. युवराजसिंगनं मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

युवराजनं एक अष्टपैलू या नात्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठळक ठसा उमटवला आहे. पण युवराजसिंग ही भारतीय क्रिकेटमधली एक लढवय्या वृत्ती आहे. त्या धगधगत्या वृत्तीला आकडेवारीच्या तराजूत कसं मोजायचं?

सचिन, सहवाग, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण या फॅब्युलस फाईव्हच्या जमान्यातही उठून दिसतो, त्याला म्हणतात युवराजसिंग.

भारतीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गुणवत्तेची खाण असतानाही 19 वर्षांच्या कारकीर्दीत 40 कसोटी, 304 वन डे आणि 58 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी टीम इंडियात स्वत:चं हक्काचं स्थान निर्माण करतो, त्याला म्हणतात युवराजसिंग.

टीम इंडियाला 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी आणि 2011 सालचा वन डे विश्वचषक जिंकून देण्याचं बळ पुरवतो, त्याला म्हणतात युवराजसिंग.

2007 सालचा विश्वचषक म्हटला की, डोळ्यासमोर उभा राहितो तो इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंत सहा षटकार ठोकणारा युवराजसिंग.

2011 सालच्या विश्वचषकाच्या कालावधीत तर कॅन्सरनं युवराजसिंगचं शरीर पोखरायला सुरुवात केली होती. त्याला खेळताना धाप लागत होती, खोकला सुरु झाला की, तो थांबायचा नाही. प्रसंगी खोकताना त्याच्या थुंकीतून रक्त पडायचं. पण त्याही नाजूक परिस्थितीत युवराजचा मैदानावरचा संघर्ष सुरुच राहिला. त्यानं 362 धावा आणि 15 विकेट्स अशी दुहेरी कामगिरी बजावून भारताला वन डेचा विश्वचषक दुसऱ्यांदा जिंकून दिला.

वन डेत दहा हजार धावांचा पल्ला ओलांडता येणं यापेक्षा वन डेत विश्वचषकाचा मिळालेला मान हा युवराजसिंगसाठी अधिक मोठा आहे. त्यामुळंच वन डेत दहा हजार धावांचा पल्ला ओलांडता आला नाही, याची त्याला खंत वाटत नाही.

युवराजसिंगला 2011 सालच्या विश्वचषकानं एक अष्टपैलू म्हणून जगात मोठं नाव मिळवून दिलं. पण विश्वचषकासाठीची त्याची ही लढाई अगदीच लुटूपुटूची ठरावी, अशी लढाई तो फुफ्फुसाच्या कॅन्सरशी खेळला. कॅन्सरची ही लढाई त्यानं जिंकलीच, पण प्रतिकूल परिस्थितीशी यशस्वी संघर्ष करून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमनही केलं. युवराजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या पुनरागमनाचा तो क्षण कॅन्सरनं पोखरलेल्या  जीवांना जगण्याची, लढण्याची प्रेरणा देणारा ठरला.

युवराजसिंगच्या या लढाऊ बाण्याची झलक आपल्याला 2000 सालापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा दिसली. पण २००२ सालच्या नॅटवेस्ट ट्रॉफीची फायनल हा युवराजच्या लढवय्या वृत्तीचा एक सर्वोच्च अनुभव होता. इंग्लंडच्या 326 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना युवराजसिंग आणि कैफनं रचलेली शतकी भागीदारीची आठवण भारतीय क्रिकेटच्या करोडो पाठीराख्यांनी आपल्या हृदयाच्या कप्प्यात अजूनही जतन करून ठेवली आहे.

1970 च्या दशकात अमिताभ बच्चनमध्ये दडलेली बंडखोरीची ठिणगी सलीम जावेदनी पहिल्यांदा ओळखली आणि पुढचा सारा इतिहास घडला. हिंदी चित्रपटसृष्टीला पहिला अँग्री यंग मॅन मिळाला. जग एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना भारतीय क्रिकेटमध्ये काहीसं तसंच घडलं. सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेटमधल्या काही बंडखोर शिलेदारांना बळ दिलं आणि पुढचा इतिहास घडला. आपल्याला युवराजसिंग मिळाला आणि विश्वचषक जिंकणारी टीम इंडियाही.