देशातील आरोग्य व्यवस्था आपली भूमिका बजावणायचं काम योग्य पद्धतीने करीत आहे. महारष्ट्राचे आरोग्यमंत्री दररोज न चुकता आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन प्रसारमाध्यमांना योग्य आणि आवश्यक अशी सर्व माहिती देत आहेत. शासकीय आणि खासगी क्षेत्रातील सर्व वैद्यकीय सेवेशी निगडित 'योद्धे' नित्यनियमाने कामावर हजेरी लावत आपलं कर्तव्य बजावीत आहेत. अनेक देशामध्ये जेथे या आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे त्या ठिकाणी स्वत्रंत समर्पित अशी 'कोरोना' रुग्णालये उभारली गेली आहेत. त्यामुळे केवळ या विषाणूचा संसर्ग असलेले रुग्ण केवळ तेथेच दाखल होतील आणि एकाच छताखाली जास्तीत जास्त या आजाराचे रुग्ण असतील. शिवाय काही सूचना द्यायच्या असतील तर त्या एकाच ठिकाणी देऊन त्या त्यांचा नातेवाइकांमार्फत दिल्या जातील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे वैद्यकीय तज्ज्ञांना उपचार करणे सोपे जातील.


सध्याच्या घडीला आपण महाराष्ट्राचा विचार केला तर, पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या कस्तुरबा आणि नायडू रुग्णालयाने कोरोना बाधीत रुग्णांना उपचार देण्याची मोठी कामगिरी बजावली होती. त्यानंतर शासनाच्या रुग्णालयांनी सहभाग घेतला आणि मग टप्याटप्याने खासगी रुग्णालयेही या आजारांकरिता उपचार देण्याकरिता पुढे सरसावली. तसेच आजही जितक्या संख्येने कोरोना टेस्ट होणे अपेक्षित आहेत ते होताना दिसत नाही, परंतु त्याची कमतरता ही भरून निघेल. कारण केंद्र सरकारने शासनाच्या आणि खासगी क्षेत्रातील टेस्टिंग लॅबला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. तसेच एकंदर आरोग्य तज्ंज्ञाच्या मते लॉकडाऊन हा अनेक उपायांपैकी एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. याचा अर्थ या विषाणूचा प्रदुर्भाव तात्काळ थांबणार नसला तरी भविष्यात या रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता नाकारत येत नाही. त्याकारिता तर शासन सर्व प्रकारचे उपाय योजना करीत आहे.


आज पुणे जिल्हा आणि मुंबई महानगर परिसर या दोन क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेनं अधिक आहे. त्यामुळे किमान या दोन ठिकाणी तरी सध्या स्वतंत्र कोरोना रुग्णालये उभारण्याची गरज आहे. स्वतंत्र रुग्णालये उभे करणं असं बोलणं सोपं असतं. कारण पायाभूत साधानसामुग्री निर्माण केली जाऊ शकते मात्र याकरीता मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. विशेषतः डॉक्टर्स, कौशल्ययुक्त कामगारांची आवश्यकता असते. त्यामुळे जर ही स्वतंत्र रुग्णालये उभारायची असतील तर निश्चितच खासगी क्षेत्रातील डॉक्टर्सनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याची गरज आहे.


या सर्व परिस्थितीत महत्वाची बाब आजपर्यंत 15 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन घरी सुद्धा गेले आहेत. यावरून आपल्याला एक गोष्ट कळाली असेल की, कोरोना झाला तर घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, तो योग्य उपचाराने बरा होऊ शकतो. कोरोना झाला म्हणजे माणूस मरतो हा गैरसमज दूर करा. त्यामुळे या आजाराने घाबरून जाण्यासारखं तसं फार विशेष असं काही कारण नाही. फक्त या आजाराची गांभीर्यता लक्षात घेता, या रुग्णांवर उपचार करण्याकरिता त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून डॉक्टर्सना उपचार द्यावे लागतात. त्यामुळे याचा संसर्ग रुग्णालयात दाखल असलेल्या अन्य रुग्णांना होत नाही.


सध्या काही परदेशातून आलेल्या प्रवाशांना काही हॉटेल्स मध्ये कॉरेन्टाईन करून ठेण्यात आले होते. तेथे त्यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून बऱ्याच प्रवाशांना घरीही पाठविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्यांची सज्जता करण्यात आली आहे. या ठिकाणी 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकेल. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात, माहिती देताना त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थितीत नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे.


ही झाली प्रशासनाची जबाबदारी ते आपलं काम करणार आहे, परंतु नागरिक म्हणूनही आपलं कर्तव्य आपण पाळायला पाहिजे. त्यामुळे घरीच राहा, कोरोना विषाणू आणायला घरा बाहेर पडू नका. तो विषाणू स्वतःहून तुमच्या घरी येणार नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग


BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क