आपल्या देशात कुठल्या बातम्यांच कसं आणि कुठे पेव फुटेल हे सांगणं मुश्किल आहे, याचं सगळं श्रेय जातं ते समाजमाध्यमांना. सध्या मराठवाड्यात 'बोंब' उठली आहे की कोरोना (कोविड-19) विषाणूच्या प्रसारानंतर आता सारी नावाचा नवीन आजार आलाय ( SARI - सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस). ही माहिती अत्यंत चुकीची असून हा कुठलाही नवीन आजार नाही. सारी म्हणजे श्वसन संस्थेशी संबंधित अनेक रोगांच्या लक्षणांचा समुदाय किंवा श्वसन प्रक्रियेशी निगडित आजाराचं विस्तृत विश्लेषण, ही एक मेडिकल कंडिशन आहे, तो कुठलाही विषाणू नाही. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वर्षानुवर्षे या आजारांवर उपचार करून रुग्णांना बरं करत आहे. अन्य आजारांमध्ये जे काही रुग्ण दागवण्याचं प्रमाण आहे त्यांच्याच जवळपास या अवस्थेतील रुग्ण दगावतात.


औरंगाबाद येथे सारीमुळे काही रुग्ण दगावल्याच्या बातम्या सध्या काही वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या आहे, आणि त्या बातम्यांची कात्रण किंवा स्क्रीनशॉट सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. प्रत्येक जण ती बातमी किती वाचतो माहित नाही पण फॉरवर्ड मात्र पटापट करत आहे. या मुळे लोकामंध्ये भीती निर्माण झाली आहे. कुतूहलापोटी किंवा या सारी सारख्या नवीन आजाराच्या माहितीपोटी लोकं विशेष करून मराठवाड्यात कोरोनापेक्षा सारी वरच बोलताना आढळत आहे.


याबाबत अधिक माहिती देताना पुणे येथील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वपनील कुलकर्णी, सांगतात की, "कमी कालावधीत, म्हणजे 10 दिवसाच्या आत ताप, खोकला आणि दम लागणे किंवा श्वास न घेता येणे या तक्रारी रुग्ण घेऊन येतो त्यावेळी डॉक्टर त्यास सारी अवस्था असे म्हणतात. मात्र त्याच्यावर उपचार करून विविध चाचण्या करून या आजराचं नेमकं निदान शोधण्याचं काम सुरु असतं. सारी कशानेही होऊ शकतो, व्हायरल इन्फेकशन, बॅक्टरील इन्फेकशन, फंगल इन्फेकशन, कोरोना मुळे होऊ शकते. न्युमोनिया हे सुद्धा सारीचं एक लक्षण आहे".


कोरोना या आजारात सारी ची बरीच लक्षणं आढळतात, त्यामुळे सर्व सामान्य जनता सारी नवीन विषाणूं आहे की याबद्दल विचार करताना दिसत आहेत. याप्रकरणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद आणि घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, सांगतात की, "लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. आमच्याकडे सारी या अवस्थेचे गेल्यावर्षी अंदाजे 1000 रुग्ण दाखल असतील त्यापैकी 57 रुग्ण दगावले होते. हा कोणताही नवीन आजार नाही किंवा विषाणू नाही. आमच्याकडे अलीकडच्या काळात खासगी दवाखाने बंद असल्यामुळे अल्पवधीत अचानक या व्याधी असलेले रुग्ण वाढले, 40 रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण सारीमुळे दगावले आहेत. लोकांनी कुणीही घाबरण्याचं कारण नाही, सारी हा नवीन प्रकार नाही.


सारी अवस्थेतील प्रत्येकालाच कोरोना होतो असे नाही, याचं अचूक प्रमाण कुणाला माहीत नाही. मात्र सारी मधील काही लक्षणं ही कोरोनामध्ये आढळतात. जशी की, न्युमोनिया होणे, श्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण होणे, फुफ्फुसात पाणी होणे. या अशा अवस्थेत रुग्णाला व्हेंटिलेवरची गरज भासू शकते. परळ येथील ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ, डॉ समीर गर्दे सांगतात की, "वैद्यकीय शास्त्रातील सारी संज्ञा ही फार मोठी आणि बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञांना याबाबत व्यवस्थित माहिती आहे. हा कुठलाही नवीन प्रकार किंवा आजार नाही. अगदी सोप्या भाषेत सारी बद्दल सांगायच झालं तर, उदाहरणार्थ तुम्ही वर्तमानपत्र वाचता, म्हणजे कुणी लोकसत्ता वाचतं, कुणी महाराष्ट्र टाइम्स वाचतं तर कुणी सकाळ वाचतं. ज्याप्रमाणे आपण वर्तमानपत्र या विषयाकडे पाहतो तसाच प्रकार ह्या सारी संज्ञामध्ये आहे, अनेक श्वसन प्रक्रियेशी निगडित आजाराच्या लक्षणांचा समूह म्हणजे सारी. त्यामुळे कुणीही घाबरून जायचं कारण नाही".


त्यामुळे कोरोना हा वेगळा आणि संसर्ग पसरवणारा गंभीर आजर आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सजग राहा. वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे हा श्वसन प्रक्रियेशी निगडित आजार असून अचूक निदान करण्यापूर्वी जी वैद्यकीय अवस्था निर्माण होते त्याला सारी म्हणतात. त्यामुळेच म्हणतोय, 'सॉरी इट्स अ सारी' लक्षात ठेवा आणि इतरांनाही सांगा.


संतोष आंधळे यांचे आणखी काही ब्लॉग


BLOG | फिनिक्सच्या पक्षासारखी मुंबई झेप घेणार


BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना