शासनाने जे काही करायचं आहे ते केलं, आता यापुढे सगळी मदार आरोग्य व्यवस्थेवर आहे. शेवटी जीवन मरणाचं प्रश्न येतो तेव्हा आपण प्रत्येक जण जीवन जगण्यालाच प्राधान्य देतो. जेव्हापासून आपल्या देशावर कोरोनाच्या संकटाने घोंगावण्यास सुरुवात केली तेव्हापासून आपली आरोग्य यंत्रणा या संसर्गपासून मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे. त्यात त्यांना यशही प्राप्त झालाय. महाराष्ट्रात आपली सार्वजनिक आरोग्य यंत्रणा जोरदार काम करीत आहे, यामध्ये निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स ही या आरोग्य यंत्रणेचा कणा असून त्यांचं योगदान या सर्व प्रक्रियेत अधोरेखीत करण्यासारखंच आहे.आज राज्यातील सर्वच शासकीय आणि महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालय जोडून जी रुग्णालये आहेत, ती खऱ्या अर्थाने चालविण्याचं काम निवासी डॉक्टर्स आणि इंटर्नस करतात हे 'ओपन सिक्रेट' आहे.


प्रत्येक राज्यात निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स डॉक्टर्सच्या संघटना ह्या कार्यरत आहे. त्यामध्येही निवासी डॉक्टर्सची संघटना खूपच तळमळीने काम करत असतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ही संघटना कार्यरत असून निवासी डॉक्टर्सच्या प्रश्नांवर फक्त काम करत नाही तर वेळप्रसंगी कुठलंही मोठा अपघात, अतिरेकी हल्ला, नैसर्गिक आपत्ती आणि मोठ्या आजाराची साथी या काळात जे रुग्ण रुग्णालयात भरती होतात तेव्हा ते दिवस-रात्र काम करत असतात. त्यांच्यासोबत इंटर्न्सही असतात परंतु त्यांना तसं रुग्णांना उपचार देण्यावर मर्यादा येतात. शासकीय किंवा महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णाचा पहिला मुकाबला हा निवासी डॉक्टर्स करत असतो. प्रथम तो जे आवश्यक आहे असे उपचार करून वेळप्रसंगी गरज पडल्यास वरिष्ठांकडे तो रुग्ण पाठवत असतो.


राज्यात आजच्या घडीला सुमारे 5500 हजार निवासी डॉक्टर्स आहेत, तर 4000 हजार इंटर्नस आहेत. आपल्या राज्यात आजही निवासी डॉक्टर्सने अमुक इतका वेळ काम केले पाहिजे असे ठरलेले नाही. आपल्याकडे हे डॉक्टर्स आपत्कालीन स्थितीत 24 ते 48 तास सलग काम करतात. त्याचप्रमाणे इतर दिवशीही ते 24 तास काम करत असतात. प्रत्येक निवासी डॉक्टर्सच्या शाखेवर त्यांच्या कामाचा ताण आणि कामाचे तास हे ठरत असतात.


कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टर्स व्यवस्थित काम करत आहेत. काही डॉक्टर्सचा तक्ररीचा सूर आहे की, त्यांना आवश्यक मास्क आणि स्वयंसुरक्षित वैद्यकीय किट (पर्सनल प्रोटेक्शन एक्वीपमेण्ट) जे अनेक वेळा साथीच्या आजरात वापरलं जातं ते मिळत नाही. अशा स्वरूपाची तक्रार मार्डच्य माजी अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती. त्यांनी ते पत्रच सामाजिक माध्यमांवर टाकले होते.


याप्रकरणी मार्डचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ सांगतात की, "आतापर्यंत कुठल्याही डॉक्टर्सने आमच्याकडे तक्रार केलेली नाही. आमचे डॉक्टर्स 24 तास रुग्णांना सेवा देत आहे. फक्त आमचं एकाचं मागणं आहे की, शासनाने, स्वयंसुरक्षित वैद्यकीय किट आणि मास्कचा मोठ्या प्रमाणात साठा मोठया प्रमाणात करून ठेवावा, जेणे करून ते कोणत्या निवासी आणि इंटर्न्सना कमी पडणार नाही." दोन दिवसापूर्वीच, नाशिक-मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यास आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याची बातमी प्रसारमाध्यांमध्ये प्रसारित झाली होती. या काळात अशा घटनांमुळे डॉक्टर्सचं मनोबल खच्चीकरण होऊ शकते याचा आपण सर्वानी विचार केला पाहिजे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर्सवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाही असे सांगत सज्जड दम भरला होता. डॉ. तात्याराव लहाने, प्रभारी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, यांनी स्पष्ट केले की, " मला माझ्या सर्व निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्सचा अभिमान आहे. ते रुग्णांना रात्र-दिवस सेवा पुरविण्याचे काम करीत आहेत. आम्ही त्यांना आरोग्याशी निगडित लागणाऱ्या सर्व गोष्टीचा साठा करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर, आमच्या विभागाचे मंत्री अमित देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेत आपण आणखी कोणत्या चांगल्या गोष्टी आपल्या डॉक्टर्ससाठी करू शकतो यावर चर्चा झाली आहे. योग्य वेळेस ती माहिती दिली जाईल."


राज्यातील आरोग्य यंत्रणेला बळ देण्याची आता आपली सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. ती कुठल्याही कारणामुळे बिघडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स यांना पण कुटुंब आहे, त्यांचे पालक त्यांच्याबद्दल किती काळजी करत असतील याचाही आपण कुठे तरी विचार केला पाहिजे. कुठलेही निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स या काळात घरी पळून गेलेले नाही तर ते इमाने इतबारे आपली सेवा बजावत आहे. काही दिवसापूर्वी डॉक्टर्सनी सामाजिकमाध्यमांवर एक कॅम्पेन चालवलं होत, ते सांगतात आम्ही आपल्यासाठी रुग्णालयात आहोत, तुम्ही आमच्यासाठी घरीच थांबा. त्यांच्या या कॅम्पेनचा आदर राखून अविरतपणे काम करणाऱ्या या सर्व निवासी डॉक्टर्स आणि इंटर्न्स डॉक्टर्सना मनाचा मुजरा.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क


BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा


BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...


सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?


BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!