राज्यात 18 ते 44 वयोगटातील सर्वांचे लसीकरण मोफत होणार यावर राज्य मंत्रिमंडळाने आज शिक्कमोर्तब केले. 1 मे पासून या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला राज्यभर सुरुवात होत आहे. लसीकरणाच्या नियोजनाबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य आहे, आतापर्यंत 1.5 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना लस दिली गेली असून एका दिवसात 5 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम राज्याने काही दिवसापूर्वीच केला आहे. त्यामुळे आपल्या राज्यात लसीकरण नियोजनाच्या अनुषंगाने सर्व व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. वेळ पडल्यास आणखी लसीकरण केंद्र वाढविण्यात येतील, आपल्या राज्याची तयारी पूर्ण आहे. मात्र सध्या 45 वर्षावरील नागरिकांसाठी जी लसीकरण मोहीम सुरु आहे, त्याकरिताच लागणाऱ्या लसीचा पुरवठा पुरेसा नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र लस नसल्यामुळे ओस पडली आहेत. त्यातच आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचा मुहूर्त 1 मे ठरविण्यात आल्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस आता तात्काळ आणायची कुठून हा मोठा प्रश्न सरकारपुढे पडला आहे. त्यामुळे तिसरा टप्पा 1 मे या दिवशी सुरु झाला नाही तरी आश्चर्य वाटू नये. काही काळानंतर टप्प्याटप्प्याने या लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळ न करता संयमाची भूमिका घेऊन प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. सरकार लस खरेदी करायला तयार आहेत, मात्र उत्पादकांकडे तेवढा लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लस मिळण्याबाबतीतील अडचणी निर्माण झाल्या आहेत. 


तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 5 कोटी 71 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आहे. त्याकरिता राज्याच्या तिजोरीवर जवळपास साडे सहा हजार कोटीचा भार पडणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरसकट लसीकरण झाले पाहिजे ह्या  मागणीने काही दिवसापासून राज्यात चांगलाच जोर धरला होता. विशेष करून दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांना या कोरोनाची बाधा झाली होती. अनेक तरुणांना या आजारपणामुळे ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे.  त्यामुळे सर्वच स्तरावर सरसकट तरूणांमध्ये लसीकरण करा, असे मत व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने सुद्धा तरुणांना लस देणे गरजेचे असल्याचे सांगून थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा  या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. त्यानंतर अखेर कोरोनाचा वाढता हाहाकार बघता केंद्र सरकारने 1 मे पासून 18  वर्षावरील सर्वाना कोविड प्रतिबंधक लस घेण्याची परवानगी देण्यात आली.  महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असून 27 एप्रिलपर्यंत 1 कोटी 53 लाख 37 हजार 832 व्यक्तींना लस दिली असून लसीकरणाच्या मोहिमेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.


तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींनी कोविन ऍपद्वारे लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेक तरुणांचे नाव नोंदणी केली जात नसून काही तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी ऐकण्यास मिळत आहे. मात्र अशाच पद्धतीचा गोंधळ जेव्हा लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा नावनोंदणीचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला होता. नागरिकांना नोंदणी करता येत नव्हती. मात्र हळू हळू ह्या तक्ररी दूर होऊन नागरिकांना व्यवस्थित नोंदणी करता येऊ लागली. लसीकरण मोहीम करताना त्याचे सूक्ष्म नियोजन केले जाते कारण हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. 16 जानेवारीला जेव्हा या कार्यक्रमाची सुरुवात केली होती, त्यावेळी यामध्ये सर्व प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन वर्कर यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांनतर 1 मार्चला  दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जेष्ठ नागरिक ( 60 वर्षावरील ) आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना  सरकारी  रुग्णालयात मोफत लस देण्यात देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर 45 वर्षावरील सगळ्यांना लस देणायचे निश्चित करण्यात आले होते. तोच कार्यक्रमही आजही देशात आणि राज्यात  सुरूच आहे. या वर्गाकरिता  खासगी रुग्णालयात २५० रुपये प्रति लस हा भाव निश्चित करण्यात आला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. सरकारने या तिसऱ्या टप्प्यातील  लसीकरणाची परवानगी देताना या मोहिमेची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. त्यांनी लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी थेट बोलून लस विकत घेऊन त्या नागरिकांना द्यावे असे सूचित केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या यंत्रणेने  थेट आता लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे आता राज्य सरकारची खरी कसोटी लागणार आहे. सध्या आपल्या देशात लस पुरविणाऱ्या दोन कंपन्यांनी आपले दर जाहीर केले आहे. त्यांचे स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन कंपनीने राज्य शासनासाकरिता ६०० रुपये डोस तर खासगी रुग्णालयाकरिता याचे दर १२०० रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तर सिरम निर्मित लस कंपनीने  कोविशील्ड लसीसाठी ३०० रुपये दर शासनासाकरिता निश्चित केले आहे, तर खाजगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दर ठेवण्यात आला आहे.


लसीचा तुटवडा पडू नये राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारने लसीकरणाचा हा तिसरा टप्पा व्यवस्थित जावा म्हणून लसीची जागतिक निविदा काढणार आहेत. यासाठी राज्यातील मुख्य सचिव सीताराम कुंटे  याच्या अध्यक्षतेखालील  समिती याचे कामकाज पाहणार आहे. तर 1 मे  पासून सुरु होण्याऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणांकरिता अतिरिक्त खासगी लसीकरण केंद्रे उभारावीत आणि त्या ठिकाणी गर्दीचे परिणामकारक नियोजन करावे, असे केंद्र सरकारने राज्य सरकारांना कळविले आहे. याकरिता खासगी रुग्णालये, उद्योग समूहाची रुग्णालये, औद्योगिक संघटना याना लसीकरण मोहिमेत  सहभागी करून अतिरिक्त खासगी लसीकरण केंद्राची नोंदणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. लसीचा साठा मुबलक प्रमाणात प्राप्त व्हावा म्हणून भारतातील दोन लसीच्या उप्तपदक क्मण्याशी बोलणे सुरु आहे. कारण मे 25 पर्यंत कोविशील्डचे उत्पादन हे केंद्र सरकारच्या असणाऱ्या मागणी करीता तयार करण्यात येणार आहे. कोवॅक्सीन लसीच्या उपलब्धतेबाबत बोलणी सुरु असून त्यांनी टप्प्या टप्प्याने लसीचा पुरवठा करून असे सांगितले आहे.  लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर लसीकरण मोहिमेला बळ प्राप्त होईल अन्यथा अभूतपूर्व गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ही लस शासनाच्या सर्व रुग्णालयात मोफत देण्यात येणार आहे तर खासगी रुग्णलयात ही लस घेताना नागरिकांना त्याचे शुल्क द्यावे लागणार आहे. शासनाला प्रमाणात लस विकत घेऊन जर लसीकरण करायचे झाल्यास त्यासाठी मोठा आर्थिक खर्च येऊ शकतो. आता या आरोग्यच्या आणीबाणीच्या काळात हा खर्च अधिक असला तरी तो शासनाला करावयास लागणार असून तळागाळातील ज्या नागरिकांना हा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी एखादी योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे. मात्र ज्यांना हा खर्च परवडू शकतो त्यांनी ही लस विकात घेऊन लसीकरण करण्याची गरज आहे. या परिस्थितीत नागरिकांनी सुद्धा शासनाला सहकार्य केले पाहिजे. तर काही गरिबांचा लसीचा खर्च उचलता येईल का ? याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. याप्रकरणी महाराष्ट्र युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी, मी पैसे देण्यास सक्षम असलेल्या सर्वांना आवाहन ट्विटरद्वारे आवाहन केले की, कृपया मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये लसीची रक्कम दान करा ही रक्कम कोविड 19 संबंधित इतर कामांसाठी वापरली जाऊ शकते जसे की औषधे खरेदी करणे, ऑक्सिजन प्लांट्सची उभारणी करणे यासाठी मार्गी लागेल. 


लसीकरण मोहिमेचे सक्षमीकरण अधिक प्रमाणात कशा पद्धतीने करता येईल याचा विचार सध्या करावा लागणार आहे. नागरिकांचा  लसीकरणावरील विश्वास वाढेल अशा पद्धतीने राज्याच्या आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच शहारा-शहरात लसीकरणाच्या अनुषंगाने समुपदेशन, माहिती  देण्यास सुरुवात केली पाहिजे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांसोबत आरोग्य संवादाचे आयोजन करावे लागणार आहे. चाळीत, गृह निर्माण संकुलात,  वाड्या-वस्त्यांमध्ये फिरून लसीचे महत्तव लोकांना पटवून दयावे लागणार आहे. त्यासाठी काही काळापुरती का होईना तात्पुरत्या स्वरूपाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.  


एप्रिल 20, ला ' आता 'यंगिस्तानची' जबाबदारी!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, गेला महिनाभर राज्यभर होणारी मागणी अखेर केंद्र सरकारने पूर्ण केली. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना कोविड प्रतिबंधक लस  घेता येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. मात्र सध्याची राज्यातील लसीकरण केंद्राची परिस्थिती पाहता आता महाराष्ट्र  दिनापासून मोठ्या प्रमाणात लागणारा लसीचा पुरवठा कसा होणार? हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र याचे उत्तर लवकरच येत्या काळात मिळेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. कोरोना विरोधातील लस हे सध्यातरी एकमेव हा आजार होऊ नये म्हणून प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे शक्य तितक्या जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे अपेक्षित असल्यामुळे आता तरुणांची जबाबदारी वाढली आहे. त्याचवेळी या लसीकरण मोहिमेचे अचूक नियोजन करणे अपेक्षित असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा वेळी तरुणांनी जरा दमानं घेऊन लसी टोचून घेतल्या पाहिजे. कारण अजूनही बहुतांश वयस्कर नागरिक यांचे लसीकरण सुरूच आहे. अन्यथा, तरुण मित्रांचे अनेक जत्थे लसीकरण केंद्रावर एकाच वेळी धडक देऊन 'आज कुछ तुफानी' करण्याच्या नादात पोलिसांना पाचारण करून आवरावे नाही लागले म्हणजे मिळाले. लसीकरण मोहीम हा राष्ट्रीय कार्यक्रम असून सगळ्यांनी यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे मात्र याकरिता शिस्त बाळगणे फार गरजेचे आहे. विशेष म्हणजे राज्य शासनही एवढ्या मोठ्या पद्धतीने लसीकरण करणार असेल तर नक्कीच लसीकरण केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावे लागणार आहेत.  


सध्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे 1 मे चा मुहूर्त साधणे कठीण दिसत आहे. त्यामुळे या दिवशी राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस मिळण्यासाठी थोडा आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. वास्तवतेचा स्वीकार करून कुठलाही गोंधळ करण्याची गरज नाही. देशातील सगळ्या नागरिकांना लसीच्या उपलद्धतेची जाणीव आहे. हे दिवसही निघून जातील, आणि लवकरच लसीकरण मोहीम सुरु होईल अशी आशा बाळगण्यास काही हरकत नाही.