>> संतोष आंधळे 


गेला महिनाभर राज्यभर होणारी मागणी अखेर केंद्र सरकारने पूर्ण केली. 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वाना कोविड प्रतिबंधक लस  घेता येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. मात्र सध्याची राज्यातील लसीकरण केंद्राची परिस्थिती पाहता आता महाराष्ट्र  दिनापासून मोठ्या प्रमाणात लागणारा लसीचा पुरवठा कसा होणार? हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र याचे उत्तर लवकरच मिळेल अशी अपेक्षा करुया. कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक लस हेच एक प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे शक्य तितक्या जास्त लोकांनी लसीकरण करून घेणे अपेक्षित असल्यामुळे आता तरुणांची जबाबदारी वाढली आहे. त्याचवेळी या लसीकरण मोहिमेचे अचूक नियोजन करणे अपेक्षित असून मोठ्या प्रमाणावर लसीकरण केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, मोठा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा वेळी तरुणांनी जरा दमानं घेऊन लसी टोचून घेतल्या पाहिजे. कारण अजूनही बहुतांश वयस्कर नागरिकांचं लसीकरण सुरू आहे. अन्यथा, तरुण मित्रांचे अनेक जत्थे लसीकरण केंद्रावर एकाच वेळी धडक देऊन 'आज कुछ तुफानी' करण्याच्या नादात पोलिसांना पाचारण करण्याची वेळ येऊ नये. लसीकरण मोहीम हा राष्ट्रीय कार्यक्रम असून सगळ्यांनी यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे, मात्र याकरिता शिस्त बाळगणे फार गरजेचे आहे. विशेष म्हणजे राज्य शासनही एवढ्या मोठ्या पद्धतीने लसीकरण करणार असेल तर नक्कीच लसीकरण केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी लागणार आहे.   


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरसकट लसीकरण झाले पाहिजे ह्या  मागणीने काही दिवसापासून राज्यात चांगलाच जोर धरला होता. विशेष करून दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांना या कोरोनाची बाधा झाली होती. अनेक तरुणांना या आजारपणामुळे ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे.  त्यामुळे सर्वच स्तरावर सरसकट तरूणांमध्ये लसीकरण करा, असे मत व्यक्त केले जात होते. विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने सुद्धा तरुणांना लस देणे गरजेचे असल्याचे सांगून थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा  या संदर्भात पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. अखेर कोरोनाचा वाढता हाहाकार बघता केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वाना कोविड प्रतिबंधक लस घेण्याची परवानगी देण्यात आली. महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असून 19 एप्रिलपर्यंत 1 कोटी 26 लाख 59 हजार 954 व्यक्तींना लस दिली असून लसीकरणाच्या मोहिमेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.   


 कोरोना काळात ज्यावेळी मोठ्या संख्येने नागरिक बाधित होत होते, अनेक जणांचे या आजारामुळे मृत्यू झाले होते. त्यावेळी नागरिकांमध्ये या आजाराने जबरदस्त दहशत पसरवली होती. त्यावेळी प्रत्येक जण या आजरावरील लस कधी येणार असे प्रश्न विचारत होते. अनेक लस निर्मित करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ या कामी  दिवस रात्र काम करत होते. देशातील डॉक्टरच नव्हे तर सर्वसाधारण व्यक्ती लसीची वाट बघत होते. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात लस आली त्यानंतर लसीकरणाच्या कामासाठीचा  प्राधान्यक्रम आखण्यात आला.  यामध्ये सर्व प्रथम आरोग्य कर्मचारी, फ्रण्टलाईन वर्कर यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांनतर 1 मार्चला  दुसऱ्या टप्प्यात ज्या व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले, त्यामध्ये जेष्ठ नागरिक (60 वर्षावरील ) आणि सहव्याधी असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांना सरकारी रुग्णालयात मोफत लस देण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय  खासगी रुग्णालयात त्याकरिता 250 रुपये प्रति लस हा भाव निश्चित करण्यात आला होता. लसीकरण मोहिमेचे सक्षमीकरण अधिक प्रमाणात कशा पद्धतीने करता येईल याचा विचार सध्या करावा लागणार आहे. नागरिकांचा  लसीकरणावरील विश्वास वाढेल अशा पद्धतीने राज्याच्या आणि महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापासूनच शहारा-शहरात लसीकरणाच्या अनुषंगाने समुपदेशन, माहिती  देण्यास सुरुवात केली पाहिजे. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांसोबत आरोग्य संवादाचे आयोजन करावे लागणार आहे. चाळीत, गृह निर्माण संकुलात, वाड्या-वस्त्यांमध्ये फिरून लसीचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागणार आहे. त्यासाठी काही काळापुरती का होईना तात्पुरत्या स्वरूपाची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी लागणार आहे.    


याप्रकरणी ब्रीच कँडी रुग्णालयाचे शस्त्रक्रियाद्वारे लठ्ठपणा कमी करणारे डॉ संजय बोरुडे यांनी सांगितले की, "सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. ज्या वेगात राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार होत आहे, आता वेळ आली आहे की सरसकट लसीकरण करण्याची,  वयाची अट आहे ती आता शिथिल करण्याची गरज आहे. सुरवातीच्या काळात असे वाटले होते की प्राधान्यक्रमाने ही लस दिली पाहिजे.  मात्र असे अनेक तरुण आहेत की  ते कामासाठी बाहेर ये जा करत असतात, अशा काही तरुणांना कोरोनाचा संसर्ग होत आहे आणि हे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्र राज्यात आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार ह्या दोघांना माझ्या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमधून विनंती केली होती की माणुसकीच्या दृष्टीकोनातून ज्याला लस हवी ह्या तत्वावर  लसीकरण करण्यास सुरुवात केली पाहिजे. या अगोदर मी लठ्ठ असणाऱ्या सर्वाना ही लस द्यावी कारण लठ्ठपणा ही सुद्धा एक व्याधी आहे. त्यामुळे त्यांना अनेक आजाराचा सामना करावा लागतो. मात्र गेल्या काही दिवसात सर्वच गटातील नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढवून वेग वाढवावा लागणार आहे. ज्या झपाट्याने कोरोना वाढत आहे नाही तर एक वेळ अशी येईल की लस असून सुद्धा वेळेत न मिळाल्यामुळे काही जणांना जीव गमावण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही."  


राज्यात देशातील एकूण रुग्णाच्या 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस राज्यातील जनतेला मिळणेअपेक्षित आहे. सध्या ज्या वयोगटात कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण आढळून येत आहे त्यामध्ये तरुण आणि चिमुकल्यांचा समावेश अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्याचा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने बुधवारी 31 मार्च रोजी सादर केलेल्या अहवालानुसार,  आतापर्यंत जेव्हापासून कोरोनाची साथ महाराष्ट्रात सुरु झाली  त्यामध्ये वयोगटानुसार बाधितांची  आकडेवारी पहिली तर लक्षात येईल की सध्याच्या काळात कोरोनाने तरुणाईला लक्ष्य केले आहे , ० ते १० वर्ष - ८७,१०५, ११ ते २० वर्ष - १,८२,६५६, २१-३० वर्ष - ४,५८,९४५, ३१ ते ४० वर्ष - ५, ८७, १५०, ४१ ते ५० वर्ष - ४,९८,०२१, ५१ ते ६० वर्ष - ४,४४,९३०, ६१ ते ७० वर्ष - ३,०४.८९२, ७१ ते ८० वर्ष - १,४७,४८९, ८१ ते  ९० वर्ष - ४२,१४१ , ९१ ते १०० वर्ष ५, ३४२, १०१ ते ११० वर्ष - १४३ नागरिक बाधित झाले आहे. या सर्व वयोगट 31 ते 40 वर्ष वयोगटात बाधित होणार्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 21.28. टक्के इतके आहे. गेल्या काही दिवसात हे प्रमाण आणखी वाढले असणार यामध्ये कोणतेही दुमत नाही. शिवाय लहान मुलांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे, वर्षभरापूर्वी हे प्रमाण कमी होते.


एप्रिल 1 ला  ' तरुणांना लस द्या !' ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, आज 1 एप्रिल, लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु होत आहे. 45 वर्षांपुढील सर्वाना आता लसीकरणाची मुभा देण्यात आली असून अधिकाअधिक नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, ज्या झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे त्या वेगाने लसीकरण व्हावे अशी मागणी मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. टप्प्याटप्प्याने लसीकरण न करता आता 18 वयावरील सरसकट तरुणांना लस देण्यास सुरुवात केली पाहिजे. कारण ज्यावेळी फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तेव्हापासून 20 ते 45 वयोगटातील अधिक तरुणांना या आजाराचा संसर्ग पाहायला मिळत होता. कारण ही तरुण मंडळी नोकरी कामाधंद्याच्या निमित्ताने बाहेर पडत असतात, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा ते वापर करीत असतात. त्यामुळे ते अनेकदा लक्षणं विरहित असले तरी कळात नव्हते कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नव्हते. हेच तरुण घरी येऊन परत घरातील वृद्धा आणि लहान मुलांमध्ये संसर्ग पसरवत होते. त्यामुळे आता लसीकरणासाठी असे कोणतेही टप्पे न ठेवता सर्व 18 वर्षावरील तरुणांसाठी लस घेण्याची परवानगी आता केंद्र  सरकारने राज्य शासनाला दिली पाहिजे. कोरोनाविरोधातील लस सुरक्षित आहे हे आता दिसून आले आहे.        


तसेच या लेखात असेही नमूद करण्यात आले होते की, लसीकरणाच्या या मोहिमेत खरे तर प्रत्येक राज्याला स्वतःचे अधिकार असायला हवे. लसीकरण मोहिमेचे सर्व नियंत्रण जर केंद्रातून होत असेल आणि राज्यात सध्या ज्या पद्धतीने रुग्ण वाढ झाली आहे. त्यानुसार येथील वैद्यकीय तज्ञांना वाटत असेल लसीकरण 18 वर्षावरील तरुणांना करावे, तर त्यास केंद्र सरकाने  हिरवा कंदील दाखवला पाहिजे. अन्यथा असे होऊ नये, मात्र काही तरुण जर या आजराने दगावले तर लस असून सुद्धा केवळ वयाच्या अटीमुळे ते घेऊ शकले नाही असे झाले तर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होऊ शकतो. कारण शेवटी लस घेतल्यामुळे नागरिकांना या आजाराच्या विरोधात संरक्षण प्राप्त होणार आहे आणि  ते त्यांना वेळेतच प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. लसीकरण मोहिम हा राष्ट्रीय कार्यक्रम असला तर त्याचे नियोजन  कशा पद्धतीने ह्यासाठी राज्यांना विशेष अधिकार दिले पाहिजे. केंद्र सरकारला लस सगळ्यांना टप्प्या टप्प्याने  द्यायची आहे हा त्यांचा इरादा नेक असला तरी राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर 18 वर्षावरील तरुणांना लस देण्याबाबत केंद्र सरकाने पुन्हा एकदा विचार करायला हवा. या  मागणीसाठी राज्य शासनाने केंद्र सरकारडे तगादा लावला पाहिजे.     


एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, या कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव थांबवा याकरिता कोरोनाविरोधातील लस राज्यातील सर्व तरुणांना मिळावी यासाठी लसीकरणसाठी असणारी वयाची अट शिथिल करून 25 वर्ष करावी अशी  मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे देशातील डॉक्टरांची अग्रणी असलेली संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन  यांनीही  लसीकरणासाठी देशभरात वयाची अट 15 इतकी करावी अशा मागणीचे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे. त्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लसीकरणासाठी वयाची अट असून नये असे सूचित केले होते.  तसेच त्यांनीही याबाबत 13 एप्रिल रोजी पंतप्रधांना पत्रही लिहिले होते. 


मात्र आता सर्वात कठीण काळ सुरु होणार असून 1 मे नंतर  मोठ्या प्रमाणात राज्यात लस प्राप्त कराव्या लागणार आहे. कारण मधल्या काळात अनेक ठिकाणी लसच उपलब्ध नव्हत्या. अनेक लसीकरण केंद्र काही काळाकरिता बंद ठेवण्यात आले होते. सध्या काही ठिकाणी लसीकरण सुरळीत चालू आहे तर काही ठिकाणी अजूनही लसीचा तुटवडा जाणवत आहेच. महाराष्ट्राला लसीच्या संख्या वाढून देण्याच्या मुद्दयांवर राजकारण्यांच्या आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याचा सिलसिला कायम असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे. वाटपावरून सुरु असलेल्या गुऱ्हाळामुळे त्याचा परिणाम थेट लसीकरणावर झाला असून राज्यातील अनेक केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याचे बोर्ड लागले आहेत. कोरोनाच्या या वाढत्या प्रसारामुळे भीतीपोटी अनेक जण लस घेण्यासाठी गर्दी केंद्रावर करत असताना त्यांच्या पदरी मात्र लस न मिळाल्यामुळे निराशा आल्याचे दिसत आहे. त्यामुळे लसीकरणाचे व्यवस्थित नियोजन करावे लागणार आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची मदत घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे  ज्याठिकाणी मोठी गृहसंकुल आहेत, किंवा , खासगी कामगारांच्या मोठ्या आस्थापना आहेत त्याठिकाणी  लसीकरणाचे तात्पुरते केंद्र निर्माण करणे. गावागावात जाऊन लसीकरण मोहिमेचे आयोजन करावे लागण्याची शक्यता आहे.