राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी प्रशासन मेहनत घेत आहे. आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टरना रुग्णांना बरे करण्यात चांगले यश प्राप्त होत आहे. नवीन रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होऊन घरी जाणाऱ्यांचे प्रमाण चांगले होत चालले आहे. या काही सकारात्मक गोष्टी घडत असताना पहिल्या लाटेच्या तुलनेत या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वैद्यकीय तज्ञांचे हे मृत्यूचे प्रमाण कमी करणे हेच उद्धिष्ट आहे, त्यासाठी ते रात्र-दिवस मेहनत घेत आहे. मात्र काही दिवसांपासून ' जवळचं कुणी तरी गेलं ' असल्याच्या बातम्यांनी नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण केली आहे. वैद्यकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार, वेळेवर उपचार घेतले तर ह्या आजरातून रुग्ण बरे होतात, उगाच घरी अंगावर दुखणं काढल्यामुळे अनेकांना त्रास अधिक होतो. त्या तुलनेने लक्षणे दिसल्यावर तात्काळ उपचार केलेले रुग्ण केवळ विलगीकरण कक्षात राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने  गोळ्या औषधे खाऊन व्यवस्थित बरे होत आहेत. राज्याचा मृत्यू दर दीड टक्का आहे. 98.5 टक्के रुग्णांना हा आजार होऊन ते ठणठणित बरे होऊन घरी जात आहे, ही चांगली गोष्ट आपण विचारात घेत नाही. तर या आजरामुळे मृत्यू होत आहे या गोष्टीचा अधिक बाऊ करत विनाकारण नागरिक ह्या आजाराला घाबरत आहे. घाबरल्यामुळे मानसिक खच्चीकरण होते, ते न होऊ देता सुरक्षित राहण्यावर भर द्या. 


या आजारात काही मृत्यू होतात हे वास्तव नाकारून चालणार नाही. मात्र त्याचे प्रमाण कमी कसे करता येईल यावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ काम करीत आहेत. नागिरकांनी या लढाईला धीराने सामोरे जाण्याची गरज आहे. अनेक वेळा नकारात्मक बातम्या आणि माहिती सतत कानावर आदळल्यामुळे त्याचा मानसिक आरोग्यवर परिणाम होत असल्याचे मानसोपचार तज्ञ सांगतात. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत.  जास्त वेळ अशा पद्धतीने  इंटरनेटवर काढल्यामुळे मानसिक स्वास्थ्य ढासळू शकते. कुठल्याही गोष्टीचा अतिरके हा वाईट असतो, आणि बहुतांश सध्या शहरात इंटरनेट वापरण्याचं प्रमाण वाढले आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहावेत म्हणून काही हेल्प लाईन आहे त्याचा आधार नागरिकांना घेता येऊ शकतो. विशेष म्हणजे कुटुंब मित्र परिवारासोबत सवांद साधला गेला पाहिजे. नागरिकांचं मानसिक आरोग्य उत्तम असणं ही काळाची गरज आहे.नागरिकांना केव्हाही मनात धडधड होणे, भीती वाटत असल्यास घरातील, परिचयातील, मित्रांशी बोला. जर तुम्हालाही यासंदर्भात कुणी माहिती विचारात असेल तर शक्यतो त्याच्याशी बोला. जर तुम्हाला त्याचं गांभीर्य अधिक वाटत असेल तर त्यांस डॉक्टर्स कडे जाण्याचा  सल्ला द्या. मानसिक आजारामध्ये कुटुंबीयांची साथ फार मोलाची असते, त्यांच्या आधारवर रुग्ण अशा आजारावर मात करण्यास यशस्वी होत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पाहावयास मिळतात.
  
मानसोपचार तज्ञ डॉ हरीश शेट्टी सांगतात कि, "पहिली गोष्ट डबल मास्क लावा, गरज असेल तर प्रवास करा, विनाकारण घराबाहेर पडू नका. मनातील भीतीबाबत, कुटुंबीय, मित्र, नातेवाईक याच्यासोबत बोला. घरात काही वेळ, काही तरी काम करत रहा. स्वतःला कामात छोट्या मोठ्या कामात व्यस्त ठेवा. रोज सकाळी योग प्राणायाम करा. एखादी ओळखीच्या  व्यक्तीचे निधन झाले असेल तर सांत्वन करा, चौकशी करत बसू नका. कसे गेले, ऑक्सिजन किती होते, व्हेंटिलेवर ठेवले होते का ? हे औषध दिले होते या गोष्टीची माहिती घेत बसू नका. कोरोनच्या अनुषंगाने  विश्वासार्ह - शासकीय स्रोतातून आलेल्या १०-१५ मिनिटे बातम्या पहा. सारख्या सारख्या त्याच बातम्या पाहत बसू नका. स्वतःचे छंद जोपासा. पुस्तके वाचा, गाणी म्हणा. मित्र परिवाराबरोबर अंताक्षरी सारखे खेळ खेळत रहा. व्हाट्स अँप ला जास्त वेळ देऊ नका. नकारात्मक बातम्या देणाऱ्याला समज द्या. काही घरातील मोठी काम करणे बाकी असतील तर त्याच्याबाबतीत जास्त विचार ह्या वेळी करत बसू नका. संतुलित आहार घ्या, घरच्या घरी थोडा व्यायाम करा, त्यामुळे शांत झोप लागेल. या सगळ्या गोष्टींमुळं तुमचं मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल."         


मे 23, 2020, रोजी 'फुंकर मनाच्या जखमेवर' या शीर्षाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये  कोविड-19, लॉकडाउन, सक्तीची विश्रांती आणि तेच तेच.  या सगळ्या प्रकारामुळे लोकांच्या मनात चीड निर्माण झाली असून उगाच मानसिक ताण वाढत असल्याची जाणीव अनेकांना होत आहे. आता बस्स ! झाल्याची भावना प्रबळ होत असून मन अस्थिर होत असून, अनेक वेळ इंटरनेटच्या माध्यमातुन  घालविल्यानंतर अनेकांना सर्व ओळखीचे लोक आजूबाजूला असूनही एकटे पडल्यासारखे वाटत आहे. या सगळ्या प्रकारामुळे आपण आजारी वाटत नसलो तरी वैद्यकीय शास्त्रीय भाषेत याला मानसिक आजार म्हटले जाते यावर वेळीच उपाय केले नाही तर हा आजार बळावू शकतो.  या सगळ्या कोलाहालात नागरिकांच्या मनावर होणाऱ्या 'इजांचा' विचार करण्याची गरज असून वेळ पडल्यास संपूर्ण राज्यात कोरोनाच्या उपचारासोबत मानसिक उपचारांबाबत गंभीरतेने विचार करायला हवा.      


याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, "मागच्या लाटेत काही रुग्ण दगावलेत, मात्र त्या तुलनेने आता जे रुग्ण दगावत आहेत ते आपल्या ओळखीचे असे आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अनाठायी भीती बाळगू नये. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत आहेत हे पण त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. रुग्णांनी वेळेवर उपचार घेतले पाहिजे. कोणत्याही लक्षणांसाठी डॉक्टरांचा वेळेत सल्ला घेतला पाहिजे. उगाचच भीती मनात न बाळगता कोरोनाच्या अनुषंगाने सर्वांनी आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. नवीन औषध उपचारपद्धती विकसित करण्यात येत आहे. नवनवीन औषध बाजारात उपलब्ध आहेत. या सगळ्या जमेच्या बाजुंचा विचार करावा. काही प्रमाणात मृत्यू होतात हे नाकारून चालणार नाही, मात्र अनेकवेळा हे मृत्यू रुग्ण वेळेवर उपचार न घेतल्यामुळे झाल्याचे दिसून आले आहे." 


एकंदरच अति काळजी ही घातक ठरू शकते अशा वेळी विचार सकारत्मक ठेवून दैनंदिन कामे करा. नकारात्मक, भीतीदायक बातम्यांची चर्चा करत बसू नका. सध्याची स्वतःच आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी कसे ठेवता येईल याचा विचार केला पाहिजे. रुग्ण व्यवस्था त्यांचे काम व्यस्थित पार पडत आहे. डॉक्टर आणि हॉस्पिटल व्यस्थापनावर विश्वास ठेवा. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला रुग्णालयात दाखल केले असेल तर कुटुंबाच्या एका सदस्यांनी डॉक्टरांच्या पर्कात राहणे गरजेचे आहे, मात्र एकच गोष्ट तुम्हाला कुणी सारखी सारखी समजावून सांगणार नाही त्यांच्या वर असणाऱ्या कामाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. एखादी गोष्ट सातत्याने विचारल्याने त्यात काही बदल होत नाही. वैद्यकीय शास्त्राच्या अभ्यासावर डॉक्टर रुग्णांवर उपचार करत असतात, त्यात अधिकचे सल्ले डॉक्टरांना दिल्याने रोष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शांत रहा आणि उपचार घ्या. सध्याच्या काळात कोरोनाच्या आजारावरील  उपचार पद्धती बहुतांश डॉक्टरांना माहित आहे ते त्याप्रमाणे उपचार देत असतात. त्यामुळे काही प्रमाणात असणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा बाऊ न करता, मोठ्या प्रमाणत रुग्ण बरे होऊन घरी जात आहे या सकारात्मक गोष्टीचा विचार करा. शक्यतो घरीच राहा. सुरक्षित राहा.