लहरों से डरकर नौका पार नहीं होती,
कोशिश करने वालों की हार नहीं होती ...
सध्याची देशातील कोरोनाच्या थैमानाची परिस्थिती बघितल्यानंतर सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेच्या ओळी आठविल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या साथीची सुरुवात झाल्यापासून अनेक तज्ञांनी कोरोनाच्या विषाणूची भविष्यातील वर्तनाविषयी अनेक भाकितं केली होती, मात्र अनेकांची भाकितं फोल ठरली आहे. कोरोना विरोधातील दुसऱ्या लाटेचे युद्ध सुरु असताना त्यात थोडे फार कुठे यश दिसायला लागत आहे, तो पर्यंत तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सामोरे जाण्यासाठी तयारी करा अशा सूचना केंद्राला दिल्या आहेत. साथीच्या आजरात पूर्वतयारी करणे केव्हाही चांगलेच आहे, कारण हे आपल्याला दुसऱ्या लाटेने दाखवून दिले आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी त्यामुळे उगाच चिंता बसण्याचे कारण नाही. सध्या सुरु असलेले लसीकरण जर वेगात झाल्यास मोठ्या लोकसंसंख्येला या आजरापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम वेगवान होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहे. लसीकरणासोबत औषधांचा आणि ऑक्सिजनचा मोठा साठा सगळ्याच राज्यांना करून ठेवावा लागणार आहे.
दुसऱ्या लाटेचा पीक कधी येणार माहित नाही. कुणी सांगतंय 15 मे पर्यंत लाट आटोक्यात येईल कुणी म्हणताय 30 मे ला लाट ओसरण्यास सुरुवात होईल. प्रत्येक तज्ञ त्यांच्या आकलनानुसार मत व्यक्त करत आहेत. कुणी असे ठोस सांगायला तर नाही. शक्यता या अफाट असू शकतात. त्याचा वापर पूर्वतयारी करून ठेवली पाहिजे इतकाच घेऊन आहे ते काम चालू ठेवावे लागणार आहे. प्राणवायूची टंचाई पडू नये म्हणून महाराष्ट्रातील सरकार त्यादृष्टीने पावले पुढे टाकत आहे हि चांगली गोष्ट आहे. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए ) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 38 पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे 53 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1250 मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी 1750 मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी साठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.
ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 150 पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे 350 प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे 500 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.
याप्रकरणी, मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ अविनाश सुपे सांगतात की, " कोरोनाची दुसरी लाट जाईल आणि तिसरी येईल अशी शक्यता वर्तविली असली तरी सध्या आपण ज्या वेगाने तयारी करत त्याच वागणे तयारी चालूच ठेवावी लागणार आहे. लसीकरणावर भर देण्याची गरज आहे. आपल्या देशातील लोकसंख्येच्या तुलनेत किम ५० ते ६० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आपण आता कुठे जेम तेम २ टक्क्यावर आहोत, हा आकडा वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीचा साठा राज्यांना देणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजूनही अनेकांना पहिला डोस देण्यात आलेला नाही. १९२० साली सुद्धा बघितले तर त्या काळात सुद्धा तीन चार लाटा आल्या होत्या. मात्र प्रत्येक लाटेतून बोध घेऊन येणाऱ्या लाटेला सक्षम पणे सामोरे जात येईल याचा विचार केला पाहिजे. आरोग्य व्यवस्थापनच्या सर्व गोष्टीची उपलब्धता करून ठेवावी लागणार आहे. लोकांनी या काळात सुरक्षित कसे राहता येईल याचा फक्त विचार केला पाहिजे. बाकीच्या गोष्टीकड़े विनाकारण लक्ष देऊ नये. १० वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लूचे रुग्ण आजही आढळून येत आहे. लाट आता लॉकडाउन केल्यामुळे बऱ्यापैकी आटोक्यात आहे, पुन्हा निर्बंध शिथिल केल्यानंतर गर्दी झाल्यास पुन्हा रुग्णसंख्येचा आकडा खाली वर होऊ शकतो. त्यामुळे या आजारापासून संरक्षण देऊ शकता असलेली लस सगळ्यांनीच घेतली पाहिजे."
तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात सरसकट लसीकरण झाले पाहिजे ह्या मागणीने काही दिवसापासून राज्यात चांगलाच जोर धरला होता. विशेष करून दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात तरुणांना या कोरोनाची बाधा झाली होती. अनेक तरुणांना या आजारपणामुळे ऑक्सिजन बेड्सची गरज भासत आहे. महाराष्ट्रात लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरु असून ६ मे पर्यंत १ कोटी ७२ लाख २१ हजार ०२९ व्यक्तींना लस दिली असून लसीकरणाच्या मोहिमेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. लसीचा तुटवडा पडू नये राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. राज्य सरकारने लसीकरणाचा हा तिसरा टप्पा व्यवस्थित जावा म्हणून लसीची जागतिक निविदा काढणार आहेत. यासाठी राज्यतील मुख्य सचिव सीताराम कुंटे याच्या अध्यक्षतेखालील समिती याचे कामकाज पाहत आहे. सरकारने या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची परवानगी देताना या मोहिमेची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. त्यांनी लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी थेट बोलून लस विकत घेऊन त्या नागरिकांना द्यावे असे सूचित केले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या यंत्रणेने थेट आता लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी बोलणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येथे आता राज्य सरकारची खरी कसोटी लागणार आहे. सध्या आपल्या देशात लस पुरविणाऱ्या दोन कंपन्यांनी आपले दर जाहीर केले आहे. त्यांचे स्वदेशी बनावटीची कोवॅक्सिन कंपनीने राज्य शासनासाकरिता 600रुपये डोस तर खासगी रुग्णालयाकरिता याचे दर 1200 रुपये असल्याचे जाहीर केले आहे. तर सिरम निर्मित लस कंपनीने कोविशील्ड लसीसाठी 300 रुपये दर शासनासाकरिता निश्चित केले आहे, तर खाजगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दर ठेवण्यात आला आहे. मात्र या कंपन्यांनीही जेवढी आपल्या राज्याची मागणी आहे ती पूर्ण करू शकत नाही. कारण त्यांना देशातील अन्य राज्यांना पण लस द्यावी लागणार आहे.
4 मे ला ' महाराष्ट्र लसदायी केव्हा होणार ? ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, लस सुरक्षित आहे, ती सर्वांनीच घेतली पाहिजे. लस घेतल्याने या आजारापासून संरक्षण प्राप्त होते. लसीचे दोन डोस घेतलेल्याना जरी कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सौम्य लक्षणांचा असतो. त्या रुग्णांना फारसा त्रास होत नाही. ही वाक्ये आहे आपल्या देशातील आणि राज्यातील वैद्यकीय तज्ञांची. या तज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून आतापर्यंत ही कोरोनाविरोधातील लढाई सर्वसामान्य जनता लढत आहे. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून दैनंदिन व्यवहारात या डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार वावर ठेवला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही लस मिळविण्यासाठी या राज्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, ज्यांना लसीचा एक डोस मिळाला आहे त्यांना दुसरा डोस मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील तरुणांनी सरकारच्या सूचनेनुसार नाव नोंदणी करून ठेवली आहे, मात्र त्यांना अजूनही लस घेण्यासाठी कुठलाही मेसेज आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात काहीसा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोनाचा वाढता कहर पाहता, प्रत्येकालाच आता लस घेण्याची 'आस ' लागली आहे. मात्र लसीच्या अपुऱ्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्रे म्हणावी तशी कार्यरत नाहीत. लस मिळण्याचे आशेने अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी आहे. महाराष्ट्राला आरोग्यदायी करायचे असेल तर प्रथम लसदायी करावा लागणार आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा विचार शासनाला करावा लागणार आहे.
तिसरी लाट आली तरी जर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले तर त्याचा त्यांना फारसा त्रास होणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. तर लहान मुलांना त्या लाटेत त्रास होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या साथीच्या आजारात शेवटी स्वयंशिस्तता किती पाळतो यावर सगळे अवलंबून आहे. त्यामुळे नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा विचार न करता सध्या ज्या पद्धतीने सुरक्षित वावर ठेवला आहे त्यापुढे तो कायम तसाच राहील याची काळजी घ्यायची आहे. महाराष्ट्रात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा त्याचे काम करीत आहे. नागरिकांनी त्यांना या काळात सहकार्य करणे अपेक्षित आहे. दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने प्रशासनाने अनेक गोष्टीचे नियोजन करून ठेवले आहे. त्याच्या फायदा आता नाही झाला तरी येत्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसऱ्या लाटेतील हे युद्ध संपल्यानंतर मात्र आता नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून कोरोनाची साथ वाढू नये यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.