जगभरात हवेत झेपवणारी विमानं आज शांतपणे विमानतळावरील धावपट्ट्या नजीक असणाऱ्या 'पार्किंग स्लॉट'मध्ये क्रमाने उभी आहेत. या काळात कोणतंही काम जीवापेक्षा अर्जंट नसल्याचा प्रत्यय सगळ्यांना आला आहे. अनेकवेळा घरात काम करणारी मावशी-ताई ( मोलकरीण ) एक दिवस आली नाही तर तिच्या नावाने शंख करणारे आपणच होतो, यावर आजही विश्वास बसत नाही. आज अनेक जण त्याच मावशांना सांगत आहेत तुम्ही कामावर येऊ नका घरीच बसा तुमची स्वतःची काळजी घ्या, आम्ही तुम्हाला तुमच्या महिन्याचा पूर्ण पगार देऊ असं माणुसकीचं पोषक वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील सदस्यांची, मित्रांची आदबीने चौकशी करीत आहेत. कोरोना जेव्हा जायचा त्यावेळी जाईल परंतु व्यवहारिक आयुष्यापेक्षा माणसं सोबतीला असणं किती महत्वाची आहे याचा एक धडा नक्कीच शिकवून जाईल.
या काळात सामाजिक माध्यमांवर विविध गोष्टी घडत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दिसणाऱ्या दोन - तीन गोष्टी म्हणजे हल्ली बहुतांश महिला वर्ग त्यांचे साडीतील फोटो टाकण्याचं मोठं आवाहन स्वीकारत ते फोटो सामाजिक माध्यमावर टाकताना दिसत आहे. तर अनेक जण नव-नवीन पदार्थां करून त्याची रेसिपी आणि त्याचे फोटो शेअर करत आहेत. तर कुणी जुने फोटो उकरण्यात मश्गुल आहेत. त्यांच्याकडे रिकामा वेळच एवढा आहे तर तो अशाप्रकारे सार्थकी लावत आहेत. काही जोडीदार लग्नाच्या फोटोचे अल्बम काढून, सोबत जमल्यास लग्नाची सीडी पाहत बसले आहेत. फार कमी लोक असावेत. ते या वेळेचा सदुपयोग करून नवनवीन गोष्टी करू पाहत आहेत. कुणी योगाची आसन शिकत दिसत असून तर काही मंडळी जुने छंद जोपासताना पहावयास मिळत आहे. काहीजण बुद्धीला खुराक मिळावा म्हणून नवनवीन पुस्तकं वाचत आहेत. तर काही जण ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पा मारून त्याना प्रसन्न ठेवण्याच काम करीत आहेत. तर काही जण लहान मुलांना आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी सांगून जुन्या आठवणीत रमत असून लहान मुलांनाही काही तरी नवीन ऐकविण्याचा आनंद देत आहेत . शेवटी कुणी काय करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
कोरोनाच्या सतत मिळणाऱ्या माहितीने आणि अप-डेटने, लोकांचं डोकं भंडावून गेलं आहे, प्रत्येक जण मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हॉट्स अॅपच्या फॅमिली ग्रुपमध्ये सदस्यांतर्फे कोरोनाची माहिती सोडून काहीही टाका अशा सूचना दिल्या जात आहेत. लोकं आता कोरोनावरील होणाऱ्या विनोदालाही कंटाळले आहेत. काही लोकांना समाजसेवा करण्याचं स्वप्न पडत आहे. परंतु बाहेर जाण्यास असणाऱ्या निर्बंधाने त्यांच्या ह्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. काही जणांना या सक्तीच्या रजेचा इतका वैतागलाय की आपल्या ओळखीच्या लोकांना खास कॉल करून 14 एप्रिलला ही सुट्टी नक्की संपेल ना असं विचारताना पाहावयास मिळत आहे.
आपल्याला मिळालेली सुट्टी ही आरामकरिता मिळालेला वेळ नसून, कोरोनाचं युद्ध लढण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आज या कोरोनामय वातावरणामुळे सगळं कसं ठप्प झाल्यासारखा फील अनेकांना येत आहे. या सगळ्या प्रक्रियेत अत्यावश्यक सेवा बजाविणारे सर्व योद्धे प्राणाची बाजी लावून काम करीत आहेत. हे आपण कदापीच विसरू नये.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!