कोलंबिया पिक्चर्सने निर्मिलेल्या आणि रोलँड इमरिचने दिग्दर्शित केलेल्या 2012 या चित्रपटाची कथा जगबुडीच्या भाकितावर आधारित होती. त्यात एक दृश्य असे होते की सर्वत्र जलप्रलय आलेला असतो आणि अवघ्या काही तासांत पृथ्वी जलमय होणार असते. मोजक्या लोकांना वाचवण्यासाठी विशेष पाणबुड्या निर्मिलेल्या असतात, तिकडे सर्वांनी कूच केलेलं असतं. जगभरातील श्रीमंत आणि सत्तेतील मातब्बर लोक यात आघाडीवर असतात. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे थॉमस विल्सन यांचा निरोप येतो की ते अमेरिकन  नागरिकांसोबतच तिथेच राहणार आहेत, एअरफोर्स वन मध्ये ते चढणार नाहीत ! हा संदेश ऐकताच तिथला इनचार्ज व व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ असणारा कार्ल अनहायजर उद्गारतो, "फाईन ! कप्तानाने आपल्या बुडणाऱ्या जहाजासोबत राहायचा निर्णय घेतला आहे जो तिथल्या लोकांना आपलंसं करेल, शिवाय त्याचे त्यांना समाधानही वाटेल ! आपले प्रेसिडेंट असाच निर्णय घेतील हे अपेक्षितच होतं कारण ते लढवय्ये आहेत !" 
या नंतर सिनेमात पुढे काय घडते हे सर्वांना ठाऊकच आहे. 


हे सर्व आज इथे सांगण्याचे कारण म्हणजे युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी घेतलेला निर्णय. मागील काही दशकात जगभरात जिथेही युद्धे झाली वा चकमकी झडल्या तिथे अपवाद वगळता राष्ट्रप्रमुखांचे पलायन करणे वा परागंदा होणे हे कॉमन होते. इथे गोष्ट वेगळी आहे. बलाढ्य रशियाच्या तुलनेत युक्रेनचा साफ धुव्वा उडताना दिसतोय तरीही ते राष्ट्र मागे हटायला तयार नाही, ते आपल्या परीने हल्ले प्रतिहल्ले करतच आहेत. ज्या अमेरिकेने त्यांना सर्वाधिक भरवसा दिला होता त्याच अमेरिकेने आज झेलेन्स्की यांना मदत देऊ केली होती, मात्र ती युद्ध लढण्यासाठीची नव्हती तर देश सोडून जाण्याकरिताची सेफर एक्झिटची तजवीज होती. युक्रेनच्या राष्ट्रपतींनी यावर निर्णय घेतला की आपल्या कुटुंबासोबत ते अखेरपर्यंत राजधानी किवमध्येच राहतील, देश सोडून ते कुठेही जाणार नाहीत. उलटपक्षी आपल्या सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. याचा परिणाम असा झाला की युक्रेनमधल्या हरेक शहरातून रशियाविरोधातला एल्गार बुलंद झाला, सैन्याचे मनोबल वाढले ! 


युद्ध किती दिवस चालेल हे भल्याभल्यांना सांगता येणार नाही. आजघडीला युक्रेनची बाजू अगदीच दुबळी आहे मात्र राष्ट्रपती झेलेन्स्कींना आपल्या जनतेला युद्धाच्या खाईत लोटून पळून जायचे नाहीय ही खूप मोठी गोष्ट आहे. भविष्यात युक्रेन हरले वा झेलेन्स्कीना बंदिवास भोगावा लागला वा त्यांची हत्या जरी झाली तरी युक्रेनियन जनतेचे ते महान जननायक असतील हे निश्चित ! व्लादिमिर पुतीन यांना युक्रेनमध्ये ते स्थान कधीच मिळणार नाही. परिणामी ते त्या भूमीवर राज्य करतील मात्र तिथल्या जनतेवर कधीच राज्य करू शकणार नाहीत. 


कधी कधी युद्ध कोण जिंकले, हरले यापेक्षा कुणी सर्वोच्च समर्पणाची भूमिका घेतली यावरून जगाच्या इतिहासातली नोंद ठरते आणि विद्रोहाची नवी बीजेही तिथेच रोवली जातात ! सध्या जरी झेलेन्स्कींची अवस्था बाजी हरलेल्या सिकंदरासारखी असली तरी जननायकाच्या भूमिकेत तेच आहेत ! 


(लेखातील मतं लेखकाची व्यक्तिगत मत आहेत.)


समीर गायकवाड यांचे अन्य काही महत्वाचे ब्लॉग