पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया! टायटल वाचून चमकलात ना! हा एक हॅश टॅग आहे जो काल पाकिस्तानमधला ट्विटर टॉप ट्रेंड होता. असो..
आधी या फोटोविषयी.
फोटो कराचीमधला आहे. 2012 सालचा आहे.
फोटोत डाव्या बाजूला एक रुग्णवाहिका दिसतेय. त्यात ड्रायव्हरच्या डाव्या बाजूस बसलेल्या व्यक्तीस रस्त्यावरून जाणारा एक दुचाकीचालक आपल्या गाडीचा वेग कमी करून आदराने सलाम करताना दिसतोय. कारण ती व्यक्ती होतीच तशी खास!
ती व्यक्ती म्हणजे चौऱ्याऐंशी वर्षीय अब्दुल सत्तार ईधी आहेत.
अब्दुल सत्तार ईधी यांची पाकिस्तानमधली सर्वात वेगवान आणि मोफत सेवा असणारी सर्वात जास्त व्याप्ती असणारी ईधी ऍम्ब्युलन्स सर्व्हिस विख्यात आहे.
भारतात कोरोनाने कहर केल्याने ईधींचे कुटुंबिय व्यथित झाले त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.
काही रुग्णवाहिका भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांचे पत्र व्हायरल झाल्यानंतर तमाम पाकिस्तानी नेटकऱ्यांनी 'पाकिस्तान स्टँड्स विथ इंडिया'! हा हॅश टॅग ट्विटरवर सुरु केला आणि अवघ्या काही तासात तो टॉपला गेला.
भारत आणि पाकिस्तानचे राजकारणी काय करू इच्छितात आणि त्यांची मजबुरी काय आहे यावर भाष्य करण्याची ही जागा नाही आणि वेळही नाही.
एक कट्टर दुष्मन समजल्या गेलेल्या देशातील लोकांनी आपल्या शेजारी देशात आलेल्या आपत्तीविषयी मानवतावादी दृष्टिकोनातून व्यक्त केलेल्या हृदय सृजन भावनांचा सन्मान स्वीकार व्हायला हवा, मला तर या भावना खूप आर्त वाटल्या.
कुणाला हे बालिश खुळचट वाटले तरी हरकत नाही.
असो...
'प्रेयर्स फॉर इंडिया' आणि 'इंडिया निड्स ऑक्सिजन' हे हॅश टॅग देखील पाकमध्ये ट्रेंडींग टॉपवर होते.
पाकिस्तानी लोकांनी खूप छान बोलकी मिम्स बनवून शेअर केलीत. निखळ शब्दात प्रेम व्यक्त केलंय.
पुनश्च असो..
2016 मध्ये अब्दुल सत्तार ईधी मरण पावले. त्यांच्या गावी त्यांना सन्मानाने खाक ए सुपूर्द करण्यात आलं. त्यांची अवयवदानाची अंतिम इच्छा होती. मात्र, मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांचे निधन झालेलं असल्याने त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. त्यामुळे केवळ नेत्रदानच शक्य झाले.
आज अब्दुल सत्तार ईधी हयात नाहीत. मात्र, त्यांचे नेत्ररोपण ज्या व्यक्तीवर करण्यात आलं. त्याच्या रूपातून पाहताना त्यांच्या वारसांनी जारी ठेवलेल्या मानवतावादी विचारधारेचा त्यांना सार्थ अभिमान वाटत असेल!
1950 साली एका ऍम्ब्युलन्सने पाकिस्तानमध्ये मोफत सेवा सुरु करणारे अब्दुल सत्तार ईधी तिथले सेवाभावी नायक समजले जातात. त्यांनी उभ्या केलेली अनाथ वसतीगृहे, मुक्या प्राण्यासाठीचे निवारे, बेघर व्यक्तींसाठी उभ्या केलेल्या वसाहती, शोषित व्यक्तींसाठी उभारलेली पुनर्वसन केंद्रे आजही पाकिस्तानी जनतेचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
आपण ज्या नजरेने पाहू, जग आपल्याला तसेच दिसेल!