लेखक अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या कालच्या घटनेतील खुलाशाने एक प्रश्न पुन्हा समोर आला त्याचं हे प्रकटीकरण..


आपल्याकडे बहुअंगाने जातीय अस्मितेचे ध्रुवीकरण होत राहिले आणि त्यातूनच ही मानसिकता उभी राहिली की जर कुठे संविधानाचा अवमान झाला वा संविधानविषयक गैरटिप्पणी केली गेली तर केवळ दलितांनीच त्याचा निषेध करायचा.


याचे मूळ आपल्याकडील महापुरुषांच्या जातीय चौकटीच्या मजबूतीकरणात आहे. मराठ्यांनी शिवजयंती करायची, मातंगांनी अण्णा भाऊ साठेंची जयंती करायची, बाबासाहेबांची जयंती महारांनी करायची, रोहिदास चर्मकारांच्या वाट्याला, टिळक ब्राम्हणांच्या हिश्श्यात, राणाप्रतापांवर राजपुतांची मक्तेदारी, फुले म्हटलं की माळी समाजाने पुढाकार घ्यायचा, अहिल्यादेवी होळकर म्हटलं की धनगर समाजाने बाह्या सरसाव्यात, बसवेश्वरांना प्रथम नमन लिंगायतांनी करायचे, धोंडो केशव कर्वेंसाठी ब्राम्हणांनीं अग्रक्रम स्वीकारायचा हे असं आपल्याकडे चालत आलं आहे.


हे समज दृढ करण्यात आपल्या कपटी राजकारण्यांचा वाटा मोलाचा आहे. प्रत्येक राजकीय पक्ष ही खबरदारी घेत असतो की हरेक जातीचा माणूस आपल्या पक्षाच्या मुख्य वर्तुळात असला पाहिजे. मग मराठ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा आला की मराठा नेता पुढे येतो, अण्णा भाऊंच्या जयंतीचा संदेश द्यायचा असला की मातंग नेत्यास आवर्जून आदर व्यक्त करावा लागतो, बाबासाहेबांविषयी व्यक्त होताना एससीचा माणूस पुढे रेटला जातो. विशेष म्हणजे आपणही याला निर्ढावलो आहोत की आपल्याला यात काहीच गैर वाटत नाही. बाबासाहेबांच्या तसबिरी मुख्यत्वे महारांच्या घरी आढळतील, शिवराय मराठ्यांच्या घरी, अण्णाभाऊ मातंगांच्या घरी, अशी जातीपरत्वे महापुरुषांची यादी आपल्याकडे विभागली गेली आहे. आपल्यातला अपवाद वगळता अनेकांना याबद्दल काही खेद खंत वाटत नाही हे दुःखद आणि अविवेकी आहे. या अशा प्रतिमा निश्चितीकरणातूनच तरडेंनी काल तो खुलासा केला.


काल प्रवीण तरडेंच्या घटनेवर दोन्ही बाजूंनी विरोधी टोकांची मते मांडल्याचे पाहण्यात आले. काहींनी छुप्या पद्धतीने जातीउद्धाराचा प्रयत्न केला. काहींनी खोचक पद्धतीने प्रतिसवाल करत पाठराखण केली. काहींनी सांगितलं की तरडेंनी माफी मागून चूक कबूल केली आहे, विषय संपलाय. हा अनुभव कुणा एकट्याचा नसून या अनुषंगाने पोस्ट करणाऱ्या बहुतांशांना याची प्रचीती आली. एका मित्राने तरडेंचा खुलासाही पाठवला. तो पाहिल्यावर अधिकच वैषम्य वाटलं. तरडे म्हणतात, "दलित बांधवांनो नकळतपणे चूक झाली, माझ्याकडून तुम्ही दुखावले गेले असाल तर माफी मागतो!'


इथे तरडेंना संविधान विषयक अवमान भावनांचा खुलासा करताना केवळ दलितांचा उल्लेख का करावा वाटला असेल या प्रश्नाने पिच्छा पुरवला. ते असं बोलले याचं कारण आपल्या इथल्या वैचारिक धारणा आणि त्यांची कथित प्रतीकेच आपल्यासमोर तशा पद्धतीने मांडली गेली आहेत. यात एक छुपा बुद्धिभेद आहे जो मनामनातले अंतर वाढवणारा आहे, एक अहं आहे जो जातीच्या अस्मितेला फुंकर घालणारा आहे आणि एक वेदनेचा हुंकार ही आहे ज्याला अजूनही अंतःकरणापासून ऐकलं जात नाही.


हजारो वर्षे उपेक्षितांचे जिणे जगलेल्या गावकुसाबाहेरच्या शोषित जगाला संविधानाने न्याय आणि हक्क प्रदान झाले, त्या संविधानाच्या जडणघडणीत बाबासाहेबांचा वाटा मोलाचा असल्याने वंचितांना ते आपलंसं वाटणं किंवा आपल्या हक्काच्या सनदीसारखं वाटणं साहजिक आहे. काहींनी याचं प्रकटन करताना 'संविधान आमच्या भीमाचं नाही कुणाच्या बापाचं' अशी दर्पोक्ती केली. याला मी दर्पोक्तीच म्हणेन कारण खुद्द बाबासाहेबांनी 'वुई द पीपल ऑफ इंडिया' लिहिल्यानंतर सगळे एकाच पातळीवर आलो आहोत. बाबासाहेबांमुळे कोटी कोटी कुळे उद्धरली हे एकीकडे म्हणत असताना त्यांना केवळ आपल्याच जातीच्या चौकटीत बंदिस्त करत राहिल्याने त्यांच्या विचारांशी प्रतारणा करत असतो.


असंच चित्र शिवबांच्या बाबतीतही सोशल मीडियावर पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी म्हणजे मराठ्यांचं काळीज असं वाक्य अनेक ठिकाणी वाचनात येतं. असं लिहून नकळत ते शिवरायांच्या विचारांच्या विरुद्ध वागतात. शिवाजी राजे एका ठराविक जातीचेच कसे काय होतात बरे? महापुरुष ज्या जातीत जन्माला येतात त्याच जातीच्या लोकांना ते आपलेसे वाटणं हा आपल्याकडचा साथीचा आजार आहे, यातून कोणत्याही महापुरुषाची आणि कोणत्याही जातीची सुटका झाली नाही अपवाद गांधींचा!


बाबासाहेबांनी संविधान निर्मितीसाठी मोलाचे योगदान दिल्यामुळे ती घटना आपल्याच जातीपुरती आहे वा केवळ वंचितांच्या भल्यासाठीच ती अंमलात आणली आहे असा अल्पबुद्धी परीघ काहींनी आखून दिला आणि त्यात लोक फसत गेले. याचा फायदा घेत हे आपले संविधान नाही हे दलितांचे आहे कारण ते यावर मालकी हक्क दाखवतात असा एक उलटा प्रवाह काहींनी जाणीवपूर्वक रूढ केला. या मिथ्यात अनेकजण सहज वाहवत गेले. याचा उलटा परिणाम असा झाला की पूर्वी केवळ आपल्याच लोकात बोलणारे वंचित शोषित घटक उघडपणे वल्गना करू लागले की संविधान आमचेच! याला विरोध करताना नैतिक दृष्ट्या योग्य मांडणी करण्याऐवजी संविधान त्यांचे तर त्यांचे मात्र राज्य तर आमचे अशी धारणा वसवली जाऊ लागली. यातून द्वेष आणि दुहीची बीजे यथावकाश पेरली गेली.


वास्तवात सर्व महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपलं जीवन अर्पिले आहे. त्यांचा कळवळा एका जातीसाठी वा एका धर्म समाज समुदायासाठी कधीच नव्हता. आपल्या जातीत एखादा महापुरुष जन्माला आला म्हणून त्याचं कौतुक असणं समजू शकतो. मात्र, त्याला त्या जातीच्या चौकटीत चिणून टाकणं हा त्याच्या जीवन तपस्येचा घोर अवमान होय. जो आजकाल सर्रास केला जातो आणि याला कोणत्याही जातीधर्माचे लोक अपवाद नाहीत. अनेक दलितेतरांनी दलितांसाठी कार्य केलं आहे आणि अनेक दलितांनी सकल मानव समुदायासाठी खस्ता खाल्ल्या आहेत. असं असताना लोक आपल्या पोकळ जातीय अस्मिता गोंजारण्यासाठी त्यांचा वापर करतात हे दुःखद आहे.


माझ्या शालेय जीवनात वैचारिक आणि सामाजिक जडण घडणीचा प्रभाव पाडणाऱ्या प्रमुख लेखकांत श्री. म. माटे यांचं नाव महत्वाचं मानतो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथे जन्मलेले माटे जन्माने ब्राम्हण होते. एम.ए.पर्यंत शिक्षण घेणाऱ्या माटे यांना रँगलर परांजपे, वासुदेवराव पटवर्धन, देवधर यांच्यासारखे व्यासंगी अध्यापक लाभले. टिळक, वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला होता. ते माटे मास्तर म्हणून ओळखले जात असत मात्र माटेंनी जे लेखन केलं ते सर्वस्वी वंचितांच्या शोषितांच्या आक्रोशासाठी केलं. त्यांनी अस्पृश्योद्धाराचे काम केले. भाषेचा जन्म आणि विकास कसा झाला, हे ‘रसवंतीची जन्मकथा’ या ग्रंथातून दाखवून देणाऱ्या माटेंनी ‘अस्पृश्यांचा प्रश्न’ मौलिक ग्रंथ लिहिला. महाविद्यालयीन जीवनात माटे पुन्हा नव्याने भेटले. उपेक्षितांचे अंतरंग हे त्यांचे पुस्तक शिवाजी विद्यापीठात बी.ए. ला अभ्यासक्रमात होते. 'बन्सीधर, तू कुठे जाशील?’, 'कृष्णकाठचा रामवंशी’, ‘तारळखो-यातील पि-या’, ‘सावित्री मुक्याने मेली’ या त्यांच्या कथा आजही लख्ख स्मरणात आहेत. माटे ब्राम्हण होते मात्र त्यांनी लेखन उपेक्षितांसाठी केलं.


आजच्या काळात कवी ग्रेस जन्माला आले नाहीत हे एका अर्थाने बरेच झाले नाहीतर लोकांनी त्यांचीही जात काय असं गुगलला विचारलं असतं. लोकांच्या मनातलं हे विष नष्ट होण्यासाठी आपल्या जातीधर्माच्या चाकोरीबाहेर जाऊन सर्व महापुरुषांचे विचार वाचायला हवेत, त्याचे अनुसरण करायला हवे आणि मुख्य म्हणजे मनापासून त्यांना स्वीकारायला हवे. आपण परिवर्तनाची अशी सुरुवात करू शकलो तर या चौकटी आणि भिंती आपसूकच कमजोर होत जातील. आपल्या श्रद्धा जोपासत परिवर्तनाचे चक्र फिरवायचे आपल्याच हाती आहे. इथली सर्व माणसं माझी आहेत आणि इथले सर्व महापुरुष ही माझे आहेत, त्यांच्या विचारांपासून मी प्रेरणा घेतो हे केवळ म्हणायचं नसून अंमलात आणायचं आहे. आताचा काळ तर मध्ययुगीन काळासारखा काटेरी नाही त्यामुळे परिवर्तनाच्या या पहिल्या पायरीवर पाऊल अडखळायचे काही कारण नाही!