गणेशोत्सव (Ganeshotsav) आला की गावाकडचा गणपतीच्या आठवणी ताज्या होतात. गणेश आगमनापासून ते विसर्जनापर्यंत गाव चैतन्यमय असायचं. साधी सरळ मंडळी असायची, ना कुठला खर्च, ना कुठला लवाजमा, साध्या साध्या गोष्टीतून गणेशोत्सव साकार व्हायचा, आजही तरुण मंडळींनी गावाकडच्या गणपतीची परंपरा जपली आहे, मात्र या परंपरेला नवं स्वरूप मिळालं आहे. प्रत्येक वर्षी गणपती आला की गावाकडच्या गणपतीच्या (Gavakadcha Ganpati) आठवणी डोळ्यासमोरून जातात. गावाकडच्या गणपतीची नाळ आजही कायम बांधून ठेवलेली आहे.
गणेशोत्सव आला की धावपळ हा विषयच नसायचा. फक्त दोन दिवस आधीपासून तयारी सुरु व्हायची, यासाठी काहीजण गणपतीचे डेकोरेशन करणार तर तर काहीजण इतर कामात असायचे. काम जास्त असले तरीही गावातील सगळी तरुण मंडळी गोळा होत असल्याने काही तासांत डेकोरेशन उभं केलं जायचं. आता हल्ली अनेक देखावे सादर केले जातात. मात्र त्यावेळी अन् आजही काही भागात अस्सल मातीचे डोंगर गणपतीच्या पाठीमागे उभे केले जात. अगदी हुबेहूब डोंगररांगा साकारल्या जात. कुठे घाट, कुठे नदी, रस्ता, जंगल असा सगळं त्या डोंगरावर पाहायला मिळायचं. याचबरोबर ज्यावेळी डोंगर बनविला जया असे, त्याचवेळी कुणी मोहरी, भात, गहू आदी बियाणे या ओल्या डोंगरावर टाकून दिले जात. ज्यामुळे पुढच्या एक दिवसांत या डोंगरावर हिरवेगार गावात पसरल्यासारखे दिसत असे. त्यामुळे त्याला एक वेगळाच लूक तयार व्हायचा, आणि गणपती देखील उठून दिसायचा. हल्ली डोंगर करायचा असल्यास गोणपाट फाडून ते चिखलात बुडवून त्याखाली काठ्या टोचून डोंगराचा आकार देऊन डेकोरेशन केले जाते.
गावाकडच्या गणपतीची आरती
गणपतीच्या आरतीची (Ganesh Aarti) एक वेगळीच मज्जा असायची. गणपती म्हटलं की गावात कस चैतन्य फुलायचं. घरातील प्रत्येक मुलं हे मंदिरात गणपतीच्या आरतीसाठी हजर होते असे. आरती ठरलेली असायची. सुरवातीला गणपती, मग देवीची, विठ्ठलाची, महादेवाची, एकनाथ, ज्ञानेश्वर आदी संतांच्या आरत्या केल्या जात. शेवटी शेवटी घोषणा देताना सर्वांच्या तोंडून 'गणपती बाप्पा मोरया' बाहेर पडायचे. त्यानंतर प्रसादाला खूपच कसरत करावी लागे. मंदिरात गावातील एकमेव गणपती असल्याने गावातील लहानग्यांची गर्दी मंदिरात होत असे. अनेकजण तर आरतीचा शेवट ऐकून घरातून प्रसादासाठी बाहेर येत. अशावेळी प्रसाद घेण्यासाठी लहानग्यांची झुंबड उडायची. काहीवेळा लहान मुलांना दिल्यानंतर इतर नागरिकांना देण्यासाठी प्रसाद उरायचा नाही, मग साखर वाटावी लागे....
चालला रे चालला गणपती चालला...
लाडक्या बाप्पाला निरोपाचा दिवस म्हणजे गावासाठी अतिशय भावुक करणारा दिवस असायचा. गणपतीची स्थापना केल्यानंतर दहाव्या दिवशी भजनी मंडळासोबत मिरवणूक काढून अभंग म्हटले जात. एका ट्रॅक्टरवर मोठ्या फळ्या अंथरून त्यावर गणपती ठेवले जात. एक दोन तासात मिरवणूक आटपत असे. मात्र ही मिरवणूक पूर्ण गावातून जात असल्याने सर्वच महिला घरासमोर औक्षणाचे ताट घेऊन उभ्या असतं. मिरवणूक आली की ओवाळले जाई, काहीजणी नारळ तर काहीजणी मक्याच्या फुल्या भेट म्ह्णून देत. यातूनच पुढे प्रसाद वाटला जाई... वाजत गाजत नदीवर गेल्यावर पुन्हा आरती केली जात असे. त्यानंतर गावातील काही तरुण, ज्यांना चांगले पोहता येत असेल असे तरुण गणपतीला घेऊन नदीत घेऊन जात. याच दुसऱ्या बाजूला इतर उपस्थित लहान मुलं, तरुण मंडळी गणपतीच्या घोषणा देत असतं. एक, दोन तीन, चार, गणपतीचा जयजयकार, चालला रे चालला गणपती चालला, अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला' अशा घोषणा दिल्या जात. काही वेळाने सर्वच गावकरी घरी परतत.
संपूर्ण गावात महाप्रसाद....
लाडक्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर महाप्रसाद गावात वाटला जाई. मिरवणूक आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जात, मात्र तरुण मंडळी मिरवणुकीत जमा झालेले साहित्य घेऊन मंदिरात जमा होत असत. यावेळी दुकानातून गूळ आणला जाई. जमा झालेले नारळ फोडून त्याचे तुकडे केले जात, त्यानंतर गुळाचा पाक करून नारळाचे तुकडे व मक्याच्या फुल्या एकत्र केल्या जाई. हा प्रसाद हा विसरता येणार नाही. तसेच कोणत्याच वर्षी हा प्रसाद टळला नाही. प्रत्येक घराघरात जाऊन हा प्रसाद वाटला जाई. गावातील कोणत्याच घरी महाप्रसाद पोहचला नाही, असे झाले नाही. असा एकूणच गावाकडचा गणेशोत्सव आजही आठवणी ताज्या करतो, मात्र आज गणेशोत्सव पूर्णपणे बदलला असून परंपरेला नवं रूप आले, असे म्हणता येईल.