International Mother’s Day 2021 : पण, मी काय म्हणते.. आजच का? रोज का नाही? विशेष दिवस असल्याने तिच्या कामात काही बदल होतो का? आज माझा वाढदिवस आहे.. म्हणून मी आज छान आनंदी राहणार, छान नवीन कपडे घालणार, मित्र मैत्रिणींसोबत हँग आऊट करणार.. हे जसं आपण ठरवतो आणि करतो... तसं आईला जमणं शक्य आहे का? उत्तर सोपं आहे.. हो शक्य आहे. पण, आई तसं करत नाही. कारण दिवस कोणताही असो... विकेंड असो वा सुट्टीचा दिवस, सर्वांच्या फॅमिली वेकेशन मूडमध्येही आईला काळजी असते ती आपल्या पिल्लांची. त्यांना खाऊ पिऊ नीट घालता आलं, त्यांची काळजी नीट घेता आली.. की मिळालं सर्व काही.. या आपल्याकडच्या भारतीय आयांची घर घर की कहानी आहे.
वज्रमुठ म्हणजे एकता, ताकदीची निशाणी. त्यामुळे आजच्या या खास दिवसाच्या पार्श्वभूमीवर मी ज्या ज्या आयांना ओळखते, ज्यांची धडपड मी जवळून पाहिलीय. ज्यांनी आपल्या वागण्यातून, कार्यातून मोलाची शिकवण दिलीय, अशा काही निवडक ५ आयांच्या आठवणींना शब्दबद्ध करण्याचा माझा हा एक लहानसा प्रयत्न.
माझी आई.. माझा आधार, मी तिची सावली. मागच्या वर्षी लॉकडाऊनदरम्यान कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या शेवटच्या दिवसात मी जितके दिवस तिच्या सान्निध्यात घालवले. त्यात एक गोष्ट पुन्हा एकदा तिच्याकडून शिकले. संयम. मोठं शस्त्र. एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडत नाही, असं जरी वाटलं तरी संयमाने त्याचा सामना केला पाहिजे. मनात विचारांचं काहूर माजलेलं असतानाही नम्र राहूनच समोरच्या व्यक्तीशी बोललं पाहिजे. आत्मविश्वास ही अशी गुरुकिल्ली आहे ज्याने यशाचा मार्ग सापडतोच. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपलं मतही ठामपणे मांडता आलं पाहिजे. ती आज माझ्यासोबत नाही. मात्र तिची शिकवण, तिचे संस्कार माझ्यासोबत कायम असतील.
Mother's Day 2021 : नवजात बालकांच्या साथीनं 'या' सेलिब्रिटी साजरा करत आहेत 'मदर्स डे'
दुसरी आई, म्हणजे माझ्या सासूबाई.. त्या हाऊस वाईफच.. आज वयाची साठी ओलांडलेल्या या आईकडून आई ही 24 X 7 ऑन ड्युटी असते हे पाहायला मिळतं. का? तर आपल्या मुलांसाठी झटणं, कामानिमित्त बाहेर असलेली मुलं केव्हा घरी येतायत, त्यांची अगदी तळमळीने चौकशी करणं, मुलं घरी येण्याआधी त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करुन ठेवणं. घरात काय आहे, काय नको, घराचा टापटिपपणा, नातेवाईकांची ऊठबस. मुलं चुकत असतील तर त्यांना खडेबोल सुनावणं, समजावणं,.. एकंदरीच काय तर, उत्तम मॅनेजमेंट कसं करावं, याचं मूर्तीमंत उदाहरण.
मात्र हा मॅनेजर इतरांसाठी सर्वकाही मॅनेज करतो मात्र स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र लक्ष देत नाही. आपल्या भारतीय आयांमध्ये हाच दोष मला दिसतो. घरांतल्यासाठी झटतात मात्र स्वतःकडे दुर्लक्ष करतात. पण, सतत म्हणतात..मुलं सुखी तर मी सुखी.. माणसाने सदोदीत काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत समाधानी असलं पाहिजे.. हीच त्यांची शिकवण..
तिसरी आई.. ज्यांना मी करिअरच्या पहिल्या टप्प्यापासून ओळखते. ज्यांनी मीडियातला मी पणा सोडून मीडियातल्या बाराखडीतली मी शिकवली. एकंदरीतच माझ्या गुरु.. ज्यांची ई टीव्हीत असताना ओळख झाली. त्या फक्त गुरु नव्हत्या तर ममत्वाने काळजीही घ्यायच्या. अप्रूप वाटायचं. १२ चॅनल्सच्या अँकर्सची जबाबदारी, त्यांच्यावर होती. मात्र प्रत्येकाची त्यांना ओळख होती. प्रत्येकातले दोष, गुण त्यांना माहित होते. भाषांचं ज्ञानही जबरदस्त. कडक शिस्तीच्या होत्या. शिस्त महत्वाची. वेळेचं भान ठेवलंच पाहिजे. २ मिनिटांनी काय होतं, असा समज असणाऱ्यांना त्या म्हणायच्या २ मिनिटं म्हणजे १२० सेकंद.. तुमच्यामुळे बुलेटीन वेळेत सुरु नाही झालं, तर प्रोफेशनली तुम्ही फेल आहात. आणि वैयक्तिक आयुष्यात बेजबाबदार. नापास आणि बेजबाबदारपणाचा ठपका मारुन घ्यायचाय की शिस्तप्रिय, जबाबदार आणि प्रामाणिकपणे करिअरचा आलेख चढता न्यायचा, हे ज्याचं त्याने ठरवावं.
चौथी आई.. माझ्यासाठी त्या सध्याच्या काळातला रिअल हिरो आहेत. त्या म्हणजे माझी डॉक्टर बहिण.. खरं तर त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. मुंबईतल्या प्रतिष्ठीत रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर आहेत. सुरुवातीला त्या माझ्या चांगल्या मैत्रिण होत्या. मात्र नंतर आमचं नातं केव्हा घट्ट होत गेलं. ते कळलंच नाही. आज त्या मला बहिण मानतात. या कोरोनाच्या काळात त्यांच्याकडून जिद्द, चिकाटी आणि महत्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामाचं मोल हे आपणच जाणतो, याची दिवसरात्र असलेली जाणीव.. हे गुण पुन्हा एकदा शिकायला मिळाले. कोरोनाग्रस्त रुग्ण ते कोरोनामुक्त रुग्ण हा अनुभव ज्यांना आला त्यांना खरंच डॉक्टरांच्या रुपात देवाचं दर्शन झालं असेल. आणि एक देवरुपी माणसाला, ममत्व आणि रुग्णसेवेला अर्पण केलेल्या डॉक्टरला मी ही ओळखते, याचा आज खरंच अभिमान वाटतो.
पाचवी आई.. म्हणजे आमच्याकडे कामाला येणाऱ्या ताई.. लॉकडाऊनच्या काळात त्यांचं काम बंद झालं. काही जबाबदार व्यक्तींनी माणुसकी जपत महिन्याचा ताईंचा पगार वेळेत दिला. मात्र अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. नोकरदार वर्गाचे स्वतःचेच कमाईचे हाल झाले हे पाहत ताईंचा पगारही बंद झाला. आज त्या माझ्याकडे कामाला येतात.. पूर्ण खबरदारी घेऊन.. मास्क, सॅनिटायझरचा वापर करतात. काम करतेवेळी पूर्णवेळ मास्क वापरतात. जातानाही हात पाय स्वच्छ धुवून जातात. स्वच्छता, टापटिपपणा या ताईंकडून शिकण्यासारखा.
या ताईंना 2 मुलं. त्यांनी मुलीचं लग्न लावून दिलं. मुलगा नोकरीच्या शोधात. गरज असेल तेव्हा माणूस नम्र राहतो आणि गरज संपली की उद्धट होतो.. पैसा पोटासाठी महत्वाचा. पैसा आज आहे उद्या नाही, मात्र ऊतू नये मातू नये, ही त्यांची वाक्य. परिस्थितीमुळे शिक्षण न घेतलेली बाई. मात्र शिक्षित लोकांनाही आपल्या विचारातून विचार करायला लावणारी. नम्रपणा हा फार महत्वाचा आहे, हे या ताईंकडूनही शिकण्यासारखं.
या 5 आया.. ज्यांच्याकडून मी रोज काही ना काही शिकत होते आणि शिकतेय. माणसाने विद्यार्थीच राहावं, शिकत राहावं, ज्यावेळी तो शिकणं सोडतो त्यावेळी तो खरा अशिक्षित राहतो. आज आपल्या आईला शुभेच्छा देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्यामुळे आपण आहोत. आपल्यामुळे ती नाही.
आज मदर्स डेच्या निमित्ताने जगभरातल्या कोट्यवधी आयांना कोटी कोटी प्रणाम.