>> विजय साळवी


अखेर धोनी जिंकला आणि रोहित शर्मा हरला. पण जयपराजयाच्या या खेळानं कोट्यवधी भारतीय क्रिकेटरसिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटवली. कोरोनाच्या संकटात हैराण झालेल्या भारतीयांना लॉकडाऊननं आणखी बेचैन केलं होतं. अर्थात लॉक़डाऊन ही काळाची गरज होती. पण लॉक़डाऊनच्या काळात लाडकं क्रिकेटही ठप्प झाल्यानं भारतीय मनाला आधार उरला नव्हता. अखेर अबुधाबीच्या रणांगणात आयपीएलचा नारळ फुटला आणि कोट्यवधी भारतीयांना खायला उठणारी संध्याकाळ सत्कारणी लागली.


चेन्नई सुपर किंग्सचा कोरोनातून सावरलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरनं या आयपीएलचा पहिला चेंडू टाकला ही एक ऐतिहासिकच घटना म्हणायला हवी. पण तोच दीपक चहर मुंबई इंडियन्सच्या अखेरच्या षटकांत लंगडताना दिसला, ही बाब चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढवणारी ठरावी. संयुक्त अरब अमिरातीच्या रणांगणांमधलं तापमान प्रामुख्यानं वेगवान गोलंदाजांच्या आणि फलंदाजांच्याही फिटनेसची परीक्षा पाहणार आहे. त्यामुळं त्यांना कायम मॅचफिट ठेवण्यासाठी आयपीएलमधल्या आठही फौजांच्या फिजिओंवरचा ताण वाढणार आहे.


कोरोनाच्या संकटात आयपीएल सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाहीय. त्यामुळं साहजिकच स्टेडियम रिकामं असतं. पण या परिस्थितीत टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांना सुनसुनं वाटू नये म्हणून स्टेडियममधल्या प्रेक्षकांचा रेकॉर्डेड आवाज थेट प्रक्षेपणात वापरण्यात येत आहे. तसंच मैदानातल्या वातावरणात चैतन्य निर्माण व्हावं म्हणून डिजिटल चीअरलीडर्सचीही सोय करण्यात आली आहे. पण शेवटी आयपीएलच्या नांदीत खरा रंग हा मुंबई आणि चेन्नईच्या शिलेदारांनीच भरला.


चेन्नईची विजयी सलामी


चेन्नई सुपर किंग्सनं या सामन्यात मुंबई इंडियन्सला पाच विकेट्सनी हरवून आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजयी सलामी दिली. हा विजय जितका कर्णधार धोनीचा, त्यापेक्षा कितीतरी अधिक तो त्याचे सहकारी अंबाती रायुडू आणि फाफ ड्यू प्लेसीचा ठरला. राष्ट्रीय निवड समिती आणि भारतीय संघव्यवस्थापनानं इंग्लंडमधल्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून अंबाती रायुडूवर दाखवलेला अविश्वास किती चुकीचा होता हे दाखवून देणारी खेळी त्यानं पुन्हा उभी केली. एमएसके प्रसाद, विराट कोहली आणि रवी शास्त्री आदी मंडळींना आपली ती चूक आता कधी तरी मान्य करावीच लागणार आहे. असो.


अबुधाबीच्या रणांगणात अंबाती रायुडू आणि फाफ ड्यू प्लेसी ही जोडी एकत्र आली त्या वेळी चेन्न्ईच्या धावफलकावर दोन षटकांत दोन बाद सहा धावा अशी केविलवाणी परिस्थिती होती. त्या दोघांनी 14 षटकांत आठच्या सरासरीनं तब्बल 115 धावांची भागीदारी रचून चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. अगदी सहज. त्यात रायुडूचा वाटा होता 48 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 71 धावांचा. या खेळीदरम्यान अंबाती रायुडूनं अगदी मुक्तहस्ते फटक्यांची उधळण केली. त्यामुळं त्याच्या खेळीला धाडसाची किनार होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अंबाती कित्येकदा चेंडूच्या टप्प्यावरही पोहचत नव्हता, पण त्याचा बॅलन्स आणि त्याचं स्थिर डोकं त्याला चौकार किंवा षटकाराचा हवा तो रिझल्ट मिळवून देत होतं.


चेन्नईकडून फाफ ड्यू प्लेसीनंही 44 चेंडूंत सहा चौकारांसह 58 धावांची खेळी उभारून आपलं काम चोख बजावलं. त्यानं एक खिंड लढवली आणि त्या खिंडीतून हल्लाही चढवून चेन्नईच्या धावफलकाला मजबुती आणि गती दिली. त्यामुळं अखेरच्या चार षटकांत विजयासाठी 42 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणं चेन्नईला अवघड ठरलं नाही. त्याआधी, एक क्षेत्ररक्षक म्हणून ड्यू प्लेसीनं सीमारेषेवर टिपलेले तीन झेल हे धावा रोखणारे आणि चेन्नईला विकेट्स मिळवून देणारेही ठरले. ड्यू प्लेसीसारखा लवचिक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर असणं हे ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या हातघाईच्या लढाईला कलाटणी देणारंच ठरतं. कॅचेस विन मॅचेस असं म्हणतात, ते उगीच नव्हे.


खरं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नईला दिलेलं 163 धावांचं लक्ष्य हे नक्कीच आव्हानात्मक होतं. पण मुंबईच्या फलंदाजांनी वारंवार मोठे फटके खेळण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावा वेचण्याकडे अधिक लक्ष दिलं असतं तर त्यांचा धावफलक अधिक मजबूत दिसला असता आणि सामना अधिक चुरशीचा झाला असता. पण अंबानींचं एटीएम कार्ड जणू आपल्याच खिशात असल्याच्या थाटात मुंबईच्या फलंदाजांनी वारंवार मोठ्या फटक्यांचं शॉपिंग करायचं मनावर घेतलं होतं. त्याची शिक्षा त्यांना अखेर पराभवाच्या रुपानं भोगावी लागली.


लॉकडाऊननं वाढवला पोटांचा घेर


मुंबई आणि चेन्नईच्या शिलेदारांनी सलामीच्या या लढाईसाठी आपली अस्त्रशस्त्रं परजण्याआधी प्रकर्षानं जाणवला तो अनेकांच्या पोटाचा वाढलेला घेर. चेन्नईचा सुपर किंग महेंद्रसिंग धोनी चाळीशीकडे झुकला आहे, त्यामुळं त्याचा स्थूलपणा जाणवणं हे स्वाभाविक आहे. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा गुटगुटीतपणा तोंडात बोटं घालायला लावणारा होता. रोहितनं 25 ऑगस्टला त्याची पत्नी रितिका सजदेच्या साथीनं व्यायाम करतानाची एक चित्रफित इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. पण लॉक़डाऊनच्या सहा महिन्यांत रोहितनं घेतलेली मेहनत तेवढीच होती का, असा प्रश्न प़डावा इतकं पोट त्याच्या टी शर्टमधूनही जाणवत होतं. त्यामुळं रोहितगारुला युएईतल्या मुक्कामात विराट कोहलीकडून फिटनेसच्या चार गोष्टी आता शिकाव्याच लागतील.


अर्थात रोहितनं वाढलेल्या पोटासह त्यांचा क्लासही दाखवून दिला. दीपक चहरचा पहिला चेंडू रोहितनं कव्हर आणि पॉइंटला भेदून सीमापार धाडला, त्या वेळी या पठ्ठ्याकडे एखादा फटका खेळण्यासाठी किती वेळ असतो हे स्पष्ट दिसून आलं. मग सॅम करननं उजव्या यष्टीच्या खूप बाहेर टाकलेल्या चेंडूवर तो त्या दिशेनं झुकला आणि त्यानं त्या चेंडूला मारलेली चापट मुंबई इंडियन्सला चौकार बहाल करणारी ठरली.


महेंद्रसिंग धोनीनंही डावखुऱ्या कृणाल पंड्याचा उजवीकडे झेपावत पकडलेला झेल त्याच्या वयाचा आणि किंचित स्थूलपणाचा विसर पडायला लावणारा होता. तीच बाब चेन्नईचा लेग स्पिनर पियुष चावलाच्या गुटगुटीतपणाची आणि मुंबईचा डावखुरा फलंदाज सौरभ तिवारीच्या तुंदिलतनूची. पण त्या दोघांच्याही कामगिरीनं त्यांच्या अव्यवस्थितपणाला झाकून टाकलं. धोनीनं रवींद्र जाडेजाआधी पाचव्या षटकासाठी चावलाच्या हाती चेंडू सोपवला होता. त्यानं चौथ्याच चेंडूवर रोहित शर्माला माघारी धाडून आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. त्यामुळं रोहित आणि लेग स्पिनरमधलं विळ्याभोपळ्याचं नातं कायम राहिलं.


बिहारच्या सौरभ तिवारीकडे एका जमान्यात धोनीचा वारसदार म्हणून पाहिलं जात होतं. त्या जमान्यात त्यानं धोनीनं राखलेले तसेच लांबसडक केस राखले होते. धोनीनं ती हेअरस्टाईल बदलून जमाना लोटला. सौरभ तिवारीनं तर वयाची तिशीही ओलांडली तरी तो दुसरा धोनी काही होऊ शकलेला नाही. तिवारीनं सलामीच्या सामन्यात 31 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह 42 धावांची खेळी उभारली. पण त्या खेळीतला योजनाबद्धतेचा म्हणजे प्लॅनिंगचा अभाव सौरभ तिवारीला मुंबई इंडियन्ससाठी मॅचविनर ठरवू शकला नाही.