T20 World Cup 2024: २४ चेंडूंत २६ धावा. भारतीय फलंदाजी चौफेर टोलवणारा क्लासेन मैदानात. सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने पूर्ण झुकलेला. त्याच वेळी हार्दिक पंड्याच्या एका ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर बॅट घालण्याचा मोह क्लासेनला नडला, तो बाद झाला आणि भारताने सामन्याची सूत्र हाती घेतली. क्रिकेटच्या मैदानात थरारक, अविश्वसनीय लढती याआधीही झाल्यात. पण, फायनलमधली ही लढाई, त्यातही भारतीय विजयाची चव चाखायला मिळाल्याने या विजयाचा आनंद काही औरच होता. ब्लड-प्रेशरचा काऊंट वरखाली होत असताना क्लासेन आऊट झाल्यावर १२०-८० ची नॉर्मल रेंज आली आणि हृदयाचे ठोकेही स्थिरावले. मग सूर्यकुमारने बाऊंड्रीवर जे फूटवर्क आणि हाताचं कौशल्य दाखवत कॅच घेतला, तेव्हाही ठोके वाढले. पण, सूर्याने दाखवलेलं प्रसंगावधान कमाल होतं. भारतीय क्रिकेटच्या आकाशात विजयाचा सूर्यच तळपणार यावर त्या कॅचने शिक्कामोर्तब केलं. आपण अखेरच्या मॅचपर्यंत अजिंक्य राहत आयसीसी ट्रॉफीची २०१३ नंतर रिकामी असलेली ती शोकेस भरली.


फायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकत पहिली फलंदाजी घेतली. रोहित, पंत आणि सूर्या या भारताच्या स्पीडगन लवकर बाद झाल्या. धाकधूक वाढली. पण, तेव्हाच रोहितचे विराटबद्दलचे शब्द आठवले. त्याने सर्वोत्तम खेळ अखेरच्या सामन्यासाठी राखून ठेवलाय. मोठ्या मॅचमध्ये मोठा परफॉर्मन्स हे गणित विराटने पुन्हा दाखवून दिलं. अक्षरला घेऊन ७२ ची पार्टनरशिप केली, ज्यामुळे भारताने १७६ चं आव्हानात्मक लक्ष्य समोर ठेवलं. विराट-अक्षरच्या भागीदारीत अक्षर ड्रायव्हिंग सीटवर होता. इथे कोहलीचा अनुभव, मॅच्युरिटी दिसते. एरवी नायक म्हणून एकट्याच्या बळावर सिनेमा हिट करणाऱ्या विराटने इथे अक्षऱला हिट होऊ दिलं आणि स्वत:कडे सहनायकाची भूमिका घेतली. तर, अक्षरनेही अष्टपैलूत्त्व सिद्ध करताना ३१ चेंडूंत ४७ धावांमध्ये एक चौकार, चार षटकार ठोकत विराटवरचं दबावाचं ओझं आपल्या डोक्यावर घेतलं. मग अखेरच्या षटकात विराटने दुबेच्या साथीने अखेरच्या तीन ओव्हर्समध्ये १६,१७  आणि ९ अशी धावांची माळ लावली. तिथून १५० वाटणारा स्कोअर १७६ वर पोहोचला.


धावा आव्हानात्मक होत्या, तरी अशक्यप्राय नव्हत्या. विशेषत: जेव्हा समोरच्या टीममध्ये डी-कॉक, क्लासेन, मिलरसारखे धडकी भरवणारे फलंदाज असतात तेव्हा तर मुळीच नाही. तसंच झालं, हेन्ड्रिक्स, मारक्रम स्वस्तात माघारी परतल्यावर स्टब्जही थोड्या फुलबाजा वाजवून आऊट झाला. दुसरीकडून विकेट पडत असताना क्लासेनने मात्र मोठे फटाके लावले. त्याच्या टोलेजंग षटकारांच्या रॉकेटने भारतीयांच्या काळजात धस्स होत होतं. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये फिरकीची गिरकी दाखवणाऱ्या अक्षर आणि कुलदीपची गोलंदाजी त्याने फोडून काढली. २४ चेंडूंत २६ धावांवर समीकरण आणून ठेवलं आणि हार्दिकच्या चेंडूवर अवसानघातकी फटका मारला. तिथून मॅच दक्षिण आफ्रिकेच्या हातून निसटली.


दबावाच्या क्षणी बुमराने टाकलेल्या १६ व्या आणि १८ व्या ओव्हरची महती काय वर्णावी. हा माणूस बर्फालाही लाजवेल असं टेम्परामेंट घेऊन गोलंदाजी करतो. कठीण समय येता बुमराह कामास येतो, हे त्याने वारंवार करुन दाखवलंय. अर्शदीपची तोलामोलाची साथ आणि हार्दिक पंड्याच्या तीन षटकांमधील २० धावांच्या मोबदल्यातील तीन विकेट्स अत्यंत मोलाच्या. भारतीय वेगवान त्रिकूटाने दक्षिण आफ्रिकेच्या हातात असलेला सामना हिसकावून घेतला. या थरारक विजयाने अनेक यादगार क्षण समोर आले. आपण २००७ नंतर टी-ट्वेन्टीचा विश्वचषक जिंकला, तर २०१३ नंतर आयसीसी ट्रॉफी पटकवली. कोच राहुल द्रविडला विनिंग सेंडऑफ दिला. योगायोग पाहा २००७ मध्ये धोनीच्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विनिंग टीममध्ये रोहित होता आणि २०११ मधील धोनीच्या वनडे वर्ल्डकपमधील विनिंग टीममध्ये कोहली होता. या दोघांनी एकत्रित खेळताना हा गोड क्षण भारताला गिफ्ट केला. दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा ट्रॉफीच्या दारातून उपाशी परतावं लागलं. आपल्याप्रमाणेच तेही फायनलपर्यंत अजिंक्य होते. इथे मात्र त्यांची घोडदौड आपण रोखत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. हृदयावर कोरलेल्या एका अविस्मरणीय क्षणाची अनुभूती दिल्यावर रोहितसेनेचं हार्दिक अभिनंदन.