BLOG : प्रकल्प म्हटल्यानंतर विरोध... कोकणात हे सर्रास घडताना दिसतं. अगदी पानं पलटून मागे गेल्यास देखील अशी अनेक उदाहरणं दिसतात. रत्नागिरी तालुक्यातील फिनोलेक्स, स्टरलाईट, जेएसडब्लू, राजापूर तालुक्यातील नाणार, बारसू येथील रिफायनरी प्रकल्प, आंबोळगड - नाटे येथील आयलॉग, गुहागर तालुक्यातील एन्रॉन, शिवाय, अगदी एमआयडीसींना झालेला विरोध देखील सर्वज्ञात आहे. त्यामुळे कोकणात प्रकल्प करायचे झाल्यास कोणते? असा प्रश्न उभा राहतो. नेमक्या याच कारणामुळे कोकणचा विकास, रोजगार निर्मिती, कामाच्या शोधात कोकणातून होणारं स्थलांतर यासारखे प्रश्न कायम चर्चिले जातात.


कोकणात प्रकल्प आल्यास कोकणच्या विकासाला दिशा मिळेल असं कायम बोललं जातं. पण, सर्वपक्षीय राजकारण्यांची भूमिका मात्र कायम कोड्यात टाकणारी देखील आहे. साधारणपणे स्वत:च्या गरजेनुसार वेळ पाहून कोणत्याही प्रकल्पाबाबत भूमिका घेतली जाते. मी मुद्दाम फायदा - तोटा हा शब्द वापरणार नाही. त्यामुळे राज्याचा विचार केल्यास कोकण औद्योगिकदृष्ट्या कायम मागास राहिला आहे. त्याला कारणं अनेक आहे. अर्थात ज्या लोकप्रतिनिधींनी दिशा दाखवायची असते, भूमिका घ्यायची असते ते कायम दोलायमान स्थितीत हेलकावे खाताना दिसून येतात.


सध्या कोकणात काही प्रकल्प आहेत. पण, लोकसंख्येचा विचार करता रोजगारनिर्मिती, सोयीसुविधा यासाठी ते अपुरेच म्हणावे लागतील. त्यामुळे सातत्यानं कोकणात प्रकल्प आले पाहिजेत अशी मागणी केली जाते. पण, त्याचवेळी ते पर्यावरणपुरक असावेत अशी देखील त्यात आग्रही मागणी आहे. अर्थात त्यात चुकीचं काही आहे असं म्हणता येणार नाही.


कोकणातील प्रकल्पांचा इतिहास पाहिल्यास, त्यावर नजर टाकल्यास विरोध, समर्थन, राजकारण याची उत्तरं मिळतात. 2017 सालापासून विचार केल्यास राजापूर तालुक्यातील नाणार आणि बारसू इथं प्रस्तावित असलेल्या रिफायनरीचा मुद्दा गाजला. आंदोलनं, मोर्चा, राजकारण्यांचे आरोप - प्रत्यारोप, हेवे - दावे यांनी परिस्थिती ढवळून निघाली. त्याच धर्तीवर आता कोकणात अर्थात नाणार - सागवे भागात ऑटोमोबाईल हब येणार आहे. याची कुणकुण लागल्यानंतर किंवा बातमी म्हणा हवं तर, याची चर्चा न झाल्यास नवल असं काही नाही.


ऑटोमोबाईल हब सारखा प्रकल्प आल्यास आम्ही त्याचं स्वागत करु असं अशी प्रतिक्रिया नाणार, सागवे भागातून येण्यास सुरूवात झाली. मुख्य म्हणजे प्रकल्पाची अधिकृत घोषणा मात्र अद्याप झाली नाही. पण, स्वागत करण्याची तयारी मात्र झाली हे विशेष. कारण, जिथं विरोध केला गेला तिथं प्रकल्पाच्या स्वागताची तयारी झाल्यास सुखद धक्का तर बसणार.


तत्कालीन विरोधाची कारणं वेगळी होती. पण, कोकणी माणूस प्रकल्पाचं स्वागत करतोय हे देखील काही थोडकं नाही. त्यात भर म्हणून राज्याचे उद्योगमंत्री असलेल्या उदय सामंत यांनी टेस्ला सारखा प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत या सर्व घडामोडींना एक प्रकारे दुजोरा दिला. मधल्या काळात राजापूरचे स्थानिक आमदार असलेले किरण सामंत देखील पर्यावरणपुरक प्रकल्पासांठी प्रयत्न करत असल्याचं ऐकिवात होतं. त्यासाठी टेस्ला हेच नाव अग्रणी होतं.


कोकणातून होणारं स्थलांतर, रोजगाराची गरज पाहता मोठ्या प्रकल्पांची गरज आहे. अर्थात, मिळत असलेल्या माहितीनुसार ऑटोमोबाईल हब किंवा टेस्लासारखा प्रकल्प आल्यास साधारणपणे 4000 ते 4500 रोजगार निर्मिती होऊ शकते असं सांगितलं जातं. शिवाय, मोठ्या आर्थिक घडामोडींना देखील त्याचा हातभार लागणार आहे. स्थानिक बाजारपेठेत खेळते भांडवल वाढण्यास मदत होईल.


अगदी काही दिवसांपूर्वी खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये कोकाकोला कंपनीनं स्थानिकांना प्राधान्य दिलं नसल्यामुळे कंपनीवर मोर्चा निघाला. पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. त्यामुळे प्रकल्प आल्यास स्थानिकांना प्राधान्य हिच माफक अपेक्षा पूर्ण झाल्यास कोकणी माणूस ऑटोमोबाईल कंपन्यांचं वाजत - गाजत आणि नाचत स्वागत करेल यात शंका नाही.


प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी स्थानिकांकडे कौशल्य नाही. शिक्षण नाही हा युक्तिवाद मला कायम लटका वाटतो. कारण, जगाच्या पाठीवर कोकणी माणूस जाऊन आज आपल्या नावाचा डंका वाजवतोय. मुंबईसारख्या शहराचा गाडा ओढणे आणि विकासामध्ये देखील कोकणी माणसाचा वाटा हा सिंहाचा राहिलाय. त्यामुळे प्रकल्पाची गजर ओळखून स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेज, आय़टीआयसारख्या संस्था, कॉलेजमध्ये अभ्यासक्रम, विद्यार्थी, पालक यांच्यात जनजागृती आणि विश्वास निर्माण करणे गरजेचं आहे.


नाणार किंवा बारसू सारख्या प्रकल्पांवेळी अगदी प्रसारमाध्यमांना देखील योग्य आणि परिपूर्ण मीहिती, शंकांचं निरसन कधी झालंच नाही. त्यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणायची झाल्यास यापूर्वीच्या चुका किमान टाळल्या जातील हि अपेक्षा करायला हरकत नाही.


कोकणी माणूस तशा शांत. ना कुणाच्या अध्यात, ना मध्यात. पण, त्याची झालेली निराशा, फसवणूक मात्र तो कधीच सहन करत नाही. स्वार्थ ही भावना देखील त्याला कधी शिवत नाही. त्यामुळे जे काही करायचं ते मनापासून हा त्याचा स्वभाव. दिलेला शब्द पाळणे त्याला आवडते. आपल्या भूमिकेशी तडजोड देखील करणं त्याला पटत नाही. परिणामी हे सर्व गुण सार्वजनिक क्षेत्रात देखील त्याच्या ठायी दिसतात. त्यामुळे प्रकल्प करत असताना त्याचा विश्वास संपादन करणे, त्याला विश्वास देणे महत्त्वाचे.


अर्थात कोकणी माणसाचा विश्वास संपादन केल्यानंतर जमीन संपादन करणे म्हणजे काही मोठं दिव्य नाही. त्यामुळे कोकणात अर्थात नाणार - सागवे भागात ऑटोमोबाईल हब आल्यास तिथं होणारं राजकारण थांबवणं हे मुख्य लक्ष्य असायला हवं. बाकी टेस्ला सारखा प्रकल्प आल्यास 'स्वागत नही करोगे हमारा'! म्हणण्याची वेळ उद्योजकावर येणार नाही हे नक्की!



याच लेखकाचा हा ब्लॉग वाचा: