ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ विचारु नये. नदीला तर नाहीच नाही. भारतीय संस्कृतीत नद्यांना आईचा दर्जा दिला गेला आहे. आई आपल्या उदरात जसं बाळांना वाढवते. तसं नद्या या जगाचं पालनपोषण करत असतात. त्यात दोन नद्या एकत्र येत असतील तर ते संगम आपोआप तीर्थक्षेत्र बनते. लडाखसारख्या प्रदेशात अमृतसरीता होऊन वाहणारी सिंधू नदी वरदानच म्हणावं लागेल. अंगावर येतील इतक्या विशालकाय शुष्क पहाडांच्या मधोमध स्वतःची वाट काढत जाणाऱ्या  सिंधूमुळेच लडाखींच्या कोरड्याठाक आयुष्याला पालवी फुटते. तिबेटमधून निघालेली सिंधू भारतीय हिमालयरांगेतून प्रवास करत जाते. श्योक, गिलगिट, हुंजा, नुब्रा, शिगर, गस्टिंग अशा उपनद्यांना सोबत घेत सिंधू नदी संगमाचे सोहळे जागोजागी भरवते. लेहजवळच्या नीमू गावाजवळ झंस्कार नदी संथगतीनं वाहत येते. दुसऱ्या बाजूला खळखळ येणारी शक्तिशाली प्रवाही सिंधू एका क्षणात झंस्कार नदीला घट्ट मीठी मारते. सिंधू आणि झंस्कार या हिमालय कन्यांचा हा संगम सोहळा विलक्षण देखणा आहे.





लेहवरुन निघाल्यावर अर्ध्या वाटेत पत्थर साहिब गुरुद्वारामध्ये थोडं विसावल्यावर पुन्हा संगमाची वाट धरली. दूर-दूर पर्यंत चिटपाखरू दिसत नव्हतं. सैन्यदलाचे ट्रक आणि पर्यटकांची वाहनं एवढाच काय तो राबता. नीमू गावाकडे पहाडांच्या मधून जाणाऱ्या निमुळत्या रस्त्यांवरून गाडीवर स्वार होण्याचा आनंद शब्दातीत आहे. संगमावर पोहोचलो तेव्हा दुपार टळली होती. उन्हामुळे त्रास होत होता खरा, पण समोरचं दृश्य बघितल्यावर सगळा त्रास, शीण दूर झाला. हल्ली माणसं माणसांना भेटत नाहीत. नद्या अशा दोन दिशांमधून येऊन एकमेकींना भेटतात, मिसळतात आणि एकरुप होऊन पुढे जातात ही कल्पनाच किती भारी आहे. माणसांना जसे राग, लोभ, इगो असतात, तसे नद्यांना नसतील का? असले तरी त्या कसं जुळवून घेत असतील? असे असंख्य प्रश्न विनाकारण मनात उगाच येत राहतात.


संगम म्हणजे दोन किंवा अधिक नद्यांनी एकाच ठिकाणी एकत्र येण्याचं ठिकाण. स्वतंत्र अस्तित्व असलेल्या जलवाहिन्या एकमेकांमध्ये मिसळतात आणि त्याच वेगानं पुढे निघूनही जातात. कधी एखादी मोठी आपल्या उपनद्यांना सोबत घेत आपलं पात्र फुलवते तर कधी दोन किंवा तीन नद्या एकत्र येत एकमेकींमध्ये अशा विसर्जित होतात की आपलं नावही बदलून टाकतात. आपलंच उदाहरण घ्या ना, वर्धा नदी आणि पैनगंगेच्या संमागमातून प्राणहिता नदी जन्माला येते. पुढे आपलं सर्वस्व अर्पण करून ती गोदावरी होते. कऱ्हाडच्या सीमेवर एकमेकींना समोरासमोर भेटणाऱ्या कृष्णा आणि कोयनेसारखा संगम जगात तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणूनच त्याला प्रिती संगम म्हटलं जातं. नेवासे परिसरात संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीचा प्रेरणास्रोत गोदा-प्रवरेचा संगम तर नसावा! भीमा-नीरेच्या संगमावरचं नीरा नृसिंहपूर श्रद्धेचा भाग. प्रत्येक संगमाची आपली एक कथा असते.


सिंधू नदी वाटेत अनेक नद्या आणि उपनद्यांच्या हातात हात घालून त्यांना आपलंच नाव देऊन पुढे जात असते. झंस्कार पर्वतरांगेतून वाहत येणारी झंस्कार नदी ही सिंधू नदीची पहिली उपनदी आहे. डोडा नदी आणि त्सराप नदी एकमेकींना भेटतात आणि पुढे जाताना स्वतःचं नाव झंस्कार असल्याचं सांगतात. हीच झंस्कार एखाद्या शहाण्या लेकरासारखी सिंधूमाईला बिलगते आणि तिथेच आपल्या नावाचा त्याग करून विसर्जीत होते. अविरत चालणाऱ्या या प्रवासात वडीलबंधूसारखा हा हिमालय सिंधूच्या पात्राला आपल्या बाहुपाशातून मार्ग देत असतो.


झंस्कार ही भारतातल्या सर्वात थंड प्रदेशातली नदी. ऋतुमानानुसार झंस्कार नदीच्या पाण्याचा रंग बदलतो. झंस्कार शब्दाचा अर्थ आहे व्हाईट कॉपर म्हणजे पांढरं तांबं. ग्रीष्म काळात प्रफुल्लीत होऊन सुसाट धावणारी झंस्कार कधी निळ्या तर कधी हिरव्या रंगाची भासते. नीमू गावच्या संगम काठावर जेव्हा झंस्कार नदी सिंधू नदीसोबत एकजीव होते तेव्हा सिंधूच्या पाण्याचा आणि झंस्कारच्या पाण्याचा वेगवेगळा रंग स्पष्टपणे जाणवतो. शरद आणि शिशिर म्हणजे ऑक्टोबर ते मार्चच्या दरम्यान झंस्कार नदी एकाच जागी थांबून बर्फात रुपांतरीत होते. विस्तीर्ण पात्रात बर्फाच्या चादरीवर ट्रेकर्सना वाट मोकळी करुन देते. झंस्कार नदीवरचा चादर ट्रेक करण्यासाठी जगभरातले पर्यटक गर्दी करतात. संगम काठावर रिव्हर राफ्टिंगचा खेळ पर्यटकांच्या आवडीचा. संगमावर विसावण्यासाठी काठावर असलेल्या संगम कॅफेला तर सेलिब्रिटी स्टेटस आलंय.




जगभरात लोकांनी वस्ती केली ती मुळातच नदीच्या काठी. शांत आणि संथ निर्मळ पाण्यानं असंख्य मळे फुलले. जगभरात कुठेही गेलात तरी नदीकाठच्या गावांएवढी सुबत्ता कुठेही आढळणार नाही. नदीकाठीच जगभरातली साम्राज्ये उदयाला आली. श्रीरामचंद्र आणि सीतामाईच्या प्रेमाची साक्ष असलेल्या शरयूकाठी रामराज्य उभं राहिलं. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि वासुदेवानं टोपलीत ठेवलेल्या कृष्णाला यमुनेच्या उग्र पात्रातून सुरक्षित ठिकाणी नेलं. कृष्णाचं आणि यमुनेचं सख्य अगदी जन्मापासूनचं. यमुनेच्या काठावरच कृष्णलीला रंगल्या. कृष्णाला राधा भेटली ती याच यमुनेच्या तीरावर. पुढे क्षिप्रा नदीच्या काठी संदिपान ऋषींच्या आश्रमात कृष्णानं शिक्षण प्राप्त केलं, इथेच जीवाभावाचा मित्र सुदामा भेटला. महाभारतात चर्मन्वती (चंबळ) नदीकाठचे अनेक संदर्भ आहेत. दक्षिणेत कावेरी नदीच्या काठी वैभवशाली चोल राजवंशाच्या पिढ्यांनी राज्य केलं. चोल राजे तर स्वतःला कावेरीपुत्र म्हणवून घ्यायचे. कावेरीच्या काठावरच द्रविड संस्कृती वाढली. रामायणकाळात पम्पा नदीच्या काठी वानरांचं राज्य किष्किंधा वसलं. पम्पा नदीचं नाव पुढे तुंगभद्रा झालं. तुंगा आणि भद्रा अशा दोन नद्यांच्या संगमावर तुंगभद्रा आकाराला आली आणि इथेच जगाला हेवा वाटावं असं संपन्न विजयनगर साम्राज्य (हम्पी) उदयाला आलं. आजही तुंगभद्रेच्या पात्रात विजयनगर साम्राज्याची समृद्धता शिल्परुपात पाहायला मिळते. प्रयागमधला गंगा आणि यमुनेचा संगम हा तर हिंदूच्या धार्मिक अस्मितेचा केंद्रबिंदू आहे. संगमावरचा कुंभमेळा हा जगभरात चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय. अमृतबिंदू उसळत धावणाऱ्या या सर्व नद्या भारतमातेच्या जीवनवाहिन्या आहेत.


सिंधू तर आशियातली सर्वात मोठी नदी. तिबेट ते पाकिस्तान व्हाया भारत जाणारा हा आनंदाचा झरा अनादी काळापासून जगण्याचा भाग आहे. जगातल्या पहिल्या प्रगत जीवनाची पाळंमुळं रुजली ती याच सिंधूच्या काठावर. सिंधूचं पात्र आणि खोरं ही आपल्या सामाजिक जीवनाची प्राचीन काळापासूनची ओळख आहे. त्यामुळे सिंधूकाठी हा असा निसर्गाचा विलय बघताना कृतकृत्य झाल्याची भावना मनात येते.


आयुष्यात कितीही अडचणींचे पहाड उभे ठाकले तरी आपण त्यातून मार्ग शोधायचा असतो. साचलेपणा भयंकट वाईट असतो. त्यामुळे हाती काही लागो वा ना लागो आपण चालत राहावं, काठावरच्या खाच खळग्यांना हुलकावणी देत नदी धावत राहते. तसं आपणही दुःखाला टपली मारून धावत सुटावं. कचऱ्याला काटेरी झुळपांमध्ये अडकवून स्वतःचं शुद्धीकरण करुन घेते नदी. तशी आपणही मनातली मद-मत्सराची, लोभाची, इर्षेची घाण साफ करून हसतमुखानं आनंदी राहायला शिकलं पाहिजे. योग्य वेळी मी पणाचा त्याग करत झोकूनही देता यायला हवं स्वत्वाची पर्वा न करता. संगमाच्या काठावरचं हे सुरम्य दृश्य आपल्याला जीवनाचं मर्म सांगत असतं. संगमाच्या या जलस्मृतींना कायमचं मनात साठवत परतीच्या प्रवासाला निघालो.


क्रमश:


(या आधीचे पहिले तीन भाग वाचण्यासाठी यावर क्लिक करा).


BLOG : जु'लेह' लडाख (भाग 1)


BLOG : जु’लेह’ लडाख (भाग 2)


BLOG : जु’लेह’ लडाख : (भाग 3 )