BLOG : विमानाच्या काचबंद खिडकीतून हिमालयाचं टोक पहिल्यांदाच ठेंगणं वाटलं. सकाळची सोनेरी किरणं या टोकांना आलिंगन देत होते. त्या सुवर्णस्पर्शानं हिमालयाचं सौंदर्य आणखीच खुललं. दिनकरही अधाशासारखा सुदूर डोंगर कपारीतून वर येत होता. त्यालाही जणू हिमालयाची ओढ लागलेली असावी. गदिमा एका गीतात म्हणतात,


‘उघडे डोंगर आज हिमाचे मुगूट घालती शिरी..’


तसं पर्वतांच्या टोकावर कुणीतरी आताच बर्फाचा सडा टाकून गेलंय की काय असं वाटत राहतं. आकाश ठेंगणं होणं म्हणजे काय असतं ते पहिल्यांदाच मी अनुभवत होतो. स्वर्गातून देवादिकांना भूलोकीचं हे सौंदर्य बघून हेवा वाटत असावा, म्हणूनच या हिमालयाच्या उदरात कैलास पर्वतावर महादेवानं आपलं सेकंड होम घेतलं असावं. कुठे शुभ्र, कुठे राखाडी, कुठे लाल तांबड्या मातीचे पर्वत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून कोणाची बरं वाट पाहात असावेत. एवढा संयम, एवढी स्थितप्रज्ञता कुठून आली असेल हिमालयात. शेकडो किलोमीटरच्या रांगा शेकडो रंगांच्या छटा. निसर्गाचा असा अविष्कार याची डोळा पाहण्याचं सौभाग्य काही क्षणांपुरतं का होईना तो परमेश्वर आपल्याला देत असतो. ते क्षण भरभरून जगायला हवे.


आताशी बऱ्यापैकी उजाडलं होतं. शेकडो मैल पसरलेल्या या पर्वतांवर ना झाड ना वनस्पती. निर्जन वाळवंटातल्या महाकाय पहारेकऱ्यांसारखा इथला हिमालय पुढे जाऊन काराकोरम पर्वतरांगांसोबत सोयरिक करतो. विमान आपल्या गंतव्य स्थानासाठी थोडं खाली आल्यानंतरचा नजारा तर काय वर्णावा. पर्वतांच्या आड लपंडाव खेळणाऱ्या ढगांसोबत आता सिंधू नदीचंही दर्शन झालं. तिबेटमधून निघालेली सिंधूमाई अशी हसत खळाळत या निर्जन प्रदेशावर हिरवाईची शाल पांघरते. त्याच हिरवाईच्या जोरावर माणसांना इथं जगण्याचं बळ मिळत असावं. आपण नद्यांना माता म्हणतो ते काय उगाच नाही. आई आपल्या मुलांचं पालन पोषण करते तसंच सिंधू नदीच्या खोऱ्यात इथल्या माणसांवर सिंधूमाईचे संस्कार आहेत. म्हणूनच तर जगातली सर्वात प्रगत संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात जन्माला आली. एखाद्या चित्रकारानं आपल्या कल्पनेच्या पलिकडचं चित्र रेखाटावं तसा नजारा डोळ्यात साठवत होतो.


एअर होस्टेसच्या सूचना आता सुरू झाल्या होत्या. त्यामुळे सीट बेल्ट लावून शांत बसलो. विमानाच्या लँडिंगची वेळ झाली होती. हरखून गेलेला जीव आता भानावर आला होता, एअरपोर्टला दोन घिरट्या घातल्यावर धावपट्टीवर उतरलेलं विमान आपल्या ठरलेल्या जागी थांबलं. विमानातून बाहेर पडताना एअर होस्टेस हसत हसत म्हणाली, “जुलेह.. वेलकम टू लेह..”




बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल हे जुलेह काय प्रकरण आहे. जसं आपण नमस्कार करतो तसं लडाखमध्ये जुलेह म्हणतात. लडाखच नाही तर, लाहौल, स्पिती, किन्नोर, कुलू अशा विस्तीर्ण पहाडी प्रदेशात तुम्ही जुलेह म्हटलं की लोक तुमच्याशी प्रेमानं वागतात. लडाख परिसरातल्या सैन्यदलात तर हा शब्द इतका प्रचलित आहे की, फोनवरून हॅलोच्या ऐवजी जुलेह म्हटलं जातं. लडाखमध्ये तुम्हाला कुणाला रस्ता विचारायचा असेल, तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्हाला लिफ्ट हवी असेल तर लडाखी स्त्री पुरूषाला फक्त जुलेह म्हणा आणि मग जादू बघा. लोक तुमच्या मदतीसाठी धावत येतील. जुलेह हा फक्त नमस्कारापुरता शब्द नाही तर ती एक भावना आहे जी तुम्हाला आदर आणि प्रेम मिळवून देते. तुमच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य ठेवून जुलेह म्हणा आणि नवीन लडाखी मित्र बनवा. किती सोप्पंय ना. जुलेह मित्रांनो.


हिमालयाच्या मधोमध असलेलं टुमदार छोटसं लेह विमानतळ. अतिसंवेदनशील परिसर असल्यानं इथे फोटोला परवानगी नाही. इथे आर्मीची मोठ्या प्रमाणावर गस्त असते. पर्यटक कमी आणि सैनिक जास्त असं दृश्यं इथल्या लोकांना आता अंगवळणी पडलंय. लेह विमानतळावर पाय ठेवताच थंड वाऱ्याची झुळूक अंगात हुडहुडी भरवते. लेहच्या वातावरणाबद्दल सांगायचं, तर या टोकाची थंडी ते त्या टोकाची गर्मी अशी अवस्था असते. जुलै आणि ऑगस्टमध्ये उन्हाचा मारा न सोसवणारा असतो. विशेषतः ऑगस्टमध्ये दिवसभर उन्हाळा, रात्री थंडी आणि क्वचित पाऊस अशी स्थिती असते. समुद्र सपाटीपासून साडे अकरा हजार फूट उंचीवर पर्वतांमध्ये थंड वारे वाहत असतात. त्यातल्या त्यात जून, जुलै आणि ऑगस्ट हे तीन महिनेच सुसह्य असतात. सावलीत आलात तर थंडी वाजते आणि उन्हात गेलात तर त्वचा जाळणारा उन्हाळा असं विचित्र वातावरण या तीन महिन्यांमध्ये असतं. एवढ्य़ा उंचीवर ऑक्सिजनची कमतरता असते त्यामुळे ज्यांना श्वासनाचे आजार असतील किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे, आजारी आहे, लहान किंवा वृद्ध व्यक्ती अशा सर्वांनी वैद्यकीय सल्ला घेऊनच या लेहच्या मोहिमेवर या. तूर्तास आम्हाला काहीही त्रास झाला नसला तरी इंटरनेट बंद पडल्यानं जीव गुदमरायला लागला होता. इंटरनेट हल्ली ऑक्सिजनपेक्षाही जास्त गरजेचं असल्याचं जाणवलं. विमानतळावर पोहोचल्यावर आमचे सिमकार्ड बंद पडले. तुमचे सिमकार्ड प्रिपेड असतील तर लेहमध्ये ते बंद पडतात. त्यामुळे लेहला जाण्याआधी एखादं पोस्टपेड सिमकार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे. कुठलीही पूर्वकल्पना नसल्यानं आमचे सिम कार्ड बंद पडले. पण नशिबानं ज्या ठिकाणी आम्ही मुक्काम करणार होतो, त्या होम स्टेचा पत्ता मोबाईलमध्ये सेव्ह असल्यानं विमानतळाच्या बाहेर पडलो.


विमानतळाच्या बाहेर प्रायव्हेट टॅक्सीशिवाय पर्याय नाही. इथे सिटी बस हा प्रकार नाही, तीनचाकी, टमटम वडाप किंवा इतर कुठलीही साधने नाहीत, इथे फक्त प्रायव्हेट टॅक्सीवाल्यांचं राज्य आहे. त्यांच्या युनियनचे रेट ठरलेले आहेत. त्यापेक्षा जास्त किंवा कमी ते घेत नाही, घासाघीस वगैरे प्रकार इथे चालत नाही. टॅक्सी युनियनचा रेट आपल्या खिशाला परवडत नाही. पण नाईलाज असल्यानं एअरपोर्टपासून 5 किमीच्या अंतरासाठी 500 रुपये कुर्बान करावे लागले. नेहमीप्रमाणे कुठल्याही टूर कंपनीसोबत किंवा ग्रुपने आम्ही आलेलो नसल्यानं अशा अनपेक्षित खर्चाला आणि प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. याचे काही तोटे असले तरी फायदेही भरपूर असतात.


सकाळी आठ वाजताच्या सुमारास आम्ही जो होमस्टे बुक केला होता त्याठिकाणी पोहोचलो. होम स्टे म्हणजे काय तर हॉटेलमध्ये न थांबता कुणाच्या तरी घरी थांबणं. हा प्रकार आता फार काही नवीन नाही. ते एक प्रकारचं हॉटेलंच असतं फक्त ते चालवणारे तुमच्या आमच्यासारखे फॅमिली मॅन असतात. बाकी रुम्स या हॉटेलसारख्याच असतात. पण हॉटेलपेक्षा अतिशय स्वस्त, परवडणारे असल्यानं बहुतांश लोक होमस्टेला प्राधान्य देतात. शिवाय तिथल्या स्थानिक लोकांशी तुमचं कनेक्शन जोडल्या जातं. त्यांचं राहणीमान, खान-पान जवळून बघण्याची संधी मिळते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे थेट संवाद होतो. त्यातून ती जागा, शहर, राज्य आणि तिथली माणसं आपल्याला अधिक स्पष्टपणे कळतात. शेवटी यासाठीच तर प्रवास सुरू असतो. लेहमध्ये हल्ली प्रत्येक घर होमस्टे झालंय, कारण पर्यटन हाच इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय असल्यानं शिवाय फक्त सहा महिनेच पर्यटक येत असल्यानं उत्पन्नाचं महत्वाचं साधन म्हणून होमस्टे सुरू करण्यावर स्थानिकांचा भर आहे. जागेची कमतरता नसल्यानं छान निसर्गरम्य होमस्टेचे अनेक पर्याय लेहमध्ये आहेत.




गोन्बो गेस्ट हाऊस. लेहच्या मध्यवर्ती भागातलं तिबेटी पद्धतीनं बांधलेलं घर. घराच्या परिसरातच प्रचंड सकारात्मकता, फुलांची झाडं आणि सोबतच सफरचंदाचीही झाडं. मालक स्टँझिन थुपस्तान भलाच गोड माणूस. सकाळी आठ वाजता त्यांनी आम्हाला रुम उपलब्ध करून दिली. याजागी हॉटेल असतं तर चेक इन १२ पर्यंत झालंच नसतं. स्टँझिन यांनी काही प्राथमिक सूचना दिल्या. अचानक उंचपर्वतांमध्ये आल्यानं शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे पहिला दिवस शक्यतो आराम करावा. ज्येष्ठ नागरिकांना घेऊन गेलेल्या टूर कंपन्या तर सक्तीनं दोन दिवस हॉटेलमध्येच बसवतात. आम्हाला मात्र अजिबातच त्रास होत नसल्यानं थोडा वेळ आराम करून बाहेर पडायचं पक्कं केलं. सगळ्यात महत्वाचं काम सिम कार्ड कसं मिळणार? हा नेहमीचा अपेक्षित प्रश्न आल्यावर त्यांनी, मुख्य बाजाराच्या कॉर्नरला सगळे सिम कार्ड मिळतात, असं सांगितलं. सिमकार्ड घेऊन इंटरनेट सुरु करेपर्यंत जीवाची घालमेल काय होत असेल याचा तुम्ही विचार करा.


टूर कंपन्या आयोजित करतात तशी ट्रिप मला तरी आवडत नाही. दिवसभर या स्पॉटवरून त्या स्पॉटवर फक्त सेल्फी काढण्यासाठी प्रवास करायचा नसतो. मस्त पोटभर झोपावं, दुपारी उठून शहरातल्या मुख्य बाजारात चालत जावं, निरीक्षण करावं, समजून घ्यावं, नवीन पदार्थ खायला मिळाला तर न चुकता त्याचा फडशा पाडावा. सगळ्यात महत्वाचं माणसं वाचता यायला हवी. पण हे सगळं करण्याआधी सिम कार्डचं दुकान शोधणं गरजेचं होतं. मुख्य बाजाराच्या कॉर्नरला बाईक रेन्टने मिळतात. सर्वात आधी आम्ही शहरात फिरण्यासाठी बाईक घेतली. पूर्ण दिवसाचे अकराशे आणि हाफ डे चे सातशे रुपये. जवळच सिम कार्डचं दुकानही सापडलं. इथेही अडिचशेच्या रिचार्जला 500 रुपये मोजावे लागले. पण हरकत नाही. तब्बल 12 तासांनंतर मोबाईलमध्ये स्वयंभू इंटरनेटच्या कांड्या बघून “अख्खं मार्केट आता आपलंच आहे” असला भलताच आत्मविश्वास वाढला होता. कारण आता खऱ्या प्रवासाला सुरूवात झाली होती.


(क्रमश:)