माझ्या लहानपणी गावाकडे किंवा मुंबईतून बाहेर जायचं असेल तर एकच हक्काची गाडी.. एसटी. त्यात गणपतीत गावाकडचा प्रवास म्हणजे एसटीला फुल टू डिमांड. तीन-चार महिने आधीच बुकिंग. थोडा उशीर आणि बुकिंग फुल. बुकिंगसाठी आतासारखी व्यवस्था नव्हती. तिकीट बुक करायचं म्हटलं की काका, आत्या, ताई, माई, मावशी यांच्या लवाजम्यासह बुकिंग. त्यामुळे लहान पोरांची गैरसोय नको म्हणून बाबा, काका मध्यरात्रीपासूनच तिकीट काऊंटरवर लाईन लावायचे. आळीपाळीने जागे राहायचे. पहाटे खिडकी उघडताच दोन ते तीन खिडक्यांच्या लाईनमधून तिकीट मिळवायचे. एसटीचं तिकीट मिळालं म्हणजे युद्ध जिंकल्याचं समाधान असायचं. मला चांगलं आठवतंय, बाबा तिकीट मिळवल्यानंतर घरी आल्यावर आई दारातच विचारायची, अहो, एसटीचं तिकीट मिळालं का? बाबा हसत घरात आले की आईही समाधानी चेहऱ्याने चहाचा कप बाबांच्या हाती द्यायची.
 
गणपतीत गावाक जायचो म्हटलं की तारांबळच असायची, बोरीवलीवरुन सुटणाऱ्या एसटीत काका, आत्या पोराबाळांसह बसून यायचे, नवी मुंबईत हायवेवर भल्या पहाटेपासून आम्ही एसटीची वाट पाहातच उभे असायचो. आई बाबांची नजर भिरभिरायची. एकदा का आपल्या तिकीटावरच्या नंबरची एसटी आली की एसटीत घुसण्यासाठी चढाओढ. आमची सिट आहे असं म्हणत आरामात विराजमान झालेल्यांना उठवणं बाबांच्या जीवाशी यायचं मात्र काय करणार? गणपतीसाठी प्रत्येकालाच गाव गाठायचंय. सीट मिळाली की कुणी म्हातारे आजी आजोबा चढले की बाबा आपल्या सिटवर त्यांना बसवायचे आणि स्वतः एसटीच्या दोन्ही बाजूंच्या सिटमधल्या मार्गावर पेपर टाकून बसायचे. 


ही झाली एक आठवण, मात्र एसटी प्रवास म्हटला की बसायला जागा नाही म्हणून एसटीत प्रवाशांना चढून दिलं जाणार नाही, असं कधीच पाहायला मिळालं नाही. एसटीने सर्वांना आपलंस केलं. सर्वांना आपल्यात सामावून घेतलं. जितकी एसटी जिव्हाळ्याची तितकेच एसटीचे चालक वाहक आपलेसे वाटतात. ऊन, पाऊस, वारा असो एसटी येणारच आणि आपल्या निश्चित स्थळी पोहोचवणारच, ही भावना आपल्या एसी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना कळणारच नाही. रातराणीचा प्रवास म्हणजे कंडक्टर काका सांगणार, अहो दादा झोपा, तुमचा स्टॉप आला की सांगतो. बाहेर काळाकुट्ट अंधार मात्र योग्य स्थळी गाडी थांबवून प्रवाशांना उतरणारे चालक वाहक हे फक्त जबाबदारीचं भान ठेवत नाहीत, तर आपल्या प्रत्येक कृतीतून माणुसकीचं दर्शनही पदोपदी घडवतात..


 स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये स्थापन झालेली आपली एसटी फक्त गावाखेड्यांना, गाव-शहरांनाच जोडत नाही तर महाराष्ट्राशेजारची राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणालाही जोडते. गाव तिथे एसटी, रस्ता तिथे एसटी या ब्रीदवाक्यानुसार विस्तारलेल्या एसटीने काळानुसार कातही टाकली. साध्या बस गाड्या, शहर बस गाड्या, डिलक्स, वातानुकूलित, शिवशाही बसगाड्यांपर्यंत एसटीन आपलं रुपडं पालटलं. msrtc. Maharashtra.gov.in वेबसाईच्या माध्यमातून एसटीचं वेळापत्रक, मार्ग प्रत्येकाच्या मोबाईलवरही आलं. 


काळानुरुप इतके बदल होत असताना, एसटीचं बाह्यरुप पालटलं जात असताना ज्यांच्यामुळे एसटी हाकली जात आहे, त्या कर्मचारीवर्गाचे हाल का सुरु आहेत? एसटी आर्थिक संकटात सापडली आहे. निव्वळ उत्पन्न  इतकंच, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळावर कर्जाचा बोजा, कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात अडचणी यास्वरुपाच्या अनेक बातम्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने येतायत. 2020 वर्ष सर्वच घटकांसाठी आव्हानात्मक होतं. तितकंच ते एसटी कर्मचाऱ्यांसाठीही. लॉकडाऊनमध्ये एसटी धावलीच नाही, त्यामुळे उत्पन्न नाही, कर्मचारी पगाराविना राहिल्याने त्यांच्या कुटुंबियांचा इतर खर्च तर सोडाच मात्र दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत निर्माण झाली. आर्थिक विवंचनेत सापडलेल्या एसटीच्या 23 कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात आत्महत्या केल्या आहेत, याला जबाबदार कोण?


दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलं, ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल आपल्याला दिसले मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या घरातला अंधार कुणाला दिसला का? एसटी राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी कर्मचारी करतायत. तोडगा काढला जातोय, कोर्टात प्रकरण गेलं. मात्र आता बस्स.. आश्वासन नको असं म्हणत कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. राजकीय चिखलफेक सुरुच आहे. काल विरोधी बाकावर बसून एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या बाता मारणारे आज कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ जितकी धडपड करतंय त्याहून अधिक संपावर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या जीवाची घालमेल सुरु आहे.  


लेक बापासोबत कडाक्याच्या थंडीत येऊन बसलाय कारण त्याला भीती आहे आपला बाप जीव तर देणार नाही ना? अंगावर काटा उभा राहतो, राजकारण होतच राहील, मात्र इमानेइतबारे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ का?  1 तारखेला पगार झाला नाही तर जीव मेटाकुटीला येतो मात्र महिनोनमहिने पगार होत नसेल आणि त्यातही हक्काचा लढा देताना पगार कापणार असल्याचा इशारा दिला जात असेल तर याहून असंवेदनशीलता ती काय असावी? 
तोडगा काढा, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा, कष्टाचं चीज करणारा पगार हाती द्या.. आणि तळागाळापर्यंत नाळ जुळलेल्या एसटी आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची ससेहोलपट थांबवा. एसटी कर्मचाऱ्यांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे आणि संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारने कष्टकऱ्याला योग्य न्याय दिला पाहिजे, हीच अपेक्षा.


हे ही ब्लॉग वाचा-


BLOG : एसटीच्या विलिनीकरणाचं मृगजळ


BLOG :  ....पेरल्याशिवाय उगवणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे!
Blog | एसटीच्या भवितव्याचा 'महामार्ग'!!!
BLOG : 'लालपरी'च्या सेवकांची फरफट अन् दमनकारी सरकारे!