परवा रामनवमी झाली. दुपारी सुटीची जरा झोप काढावी म्हटलं तर एक फोन आला. नंबर अनोळखी होता. कुणी प्राध्यापक गोरे की मोरे बोलत होते. ते म्हणाले की, "विद्यापीठाचे बोधवाक्य चुकीचे?" या तुमच्या बातमीने फारच धुरळा उडवून दिला. आम्ही इतकी वर्षे हे बोधवाक्य वाचतोय, पण आम्ही लक्षच दिले नाही. पण तुम्ही लिहिले हे बरे केलेत." मी धन्यवाद वगैरे म्हणून फोन ठेवला. मग फोन वाजू नये म्हणून थरारक मोडवर टाकला. 


दोन मिनिटे झोपलो तर फोन थरथरू लागला. हा पण नंबर अनोळखी. उचलला फोन. तिकडून कुलकर्णी नावाचे कुणी तरी बोलत होते. तुमची बातमी वाचली म्हणाले. भेटायला येऊ का? असेही विचारू लागले. मी त्यांना म्हणालो, फोनवरच बोला. रामनवमीची भर दुपार आहे. उन्हातान्हात कुठे येता? मग ते बोलू लागले... "छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बोधवाक्य ज्ञानेश्वरी ग्रंथातून घेतले. पण ते चुकीचे छापलेले आहे, हे तुम्ही बातमीत लिहिले. परंतु या विद्यापीठाचे केवळ बोधवाक्यच चुकले असे नाही, तर बरेच काही चुकले आहे. मला ज्ञान मिळवण्याचा छंद असल्यामुळे मी नेहमीच वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जात असतो. सुरुवातीला येथे मला बरेच ज्ञान मिळाले. पण गेल्या तीसेक वर्षांत मला असले साक्षात्कार झालेत की विचारू नका! इथले कुलगुरू व प्राध्यापक अभ्यासू, विद्वान आहेत. त्यामुळे ते जेथे जातील तेथे मी जाऊ लागलो. पण यातले अनेक लोक फारच बेरकी आहेत. ते जसे बोलतात तसे वागत नाहीत हे माझ्या लक्षात आले. हे लिहा तुम्ही उद्याच्या पेपरात."


मी त्यांना म्हणालो,"कुलकर्णी, तुम्ही तोंडी सांगून मला लिहायला सांगताय. तुमच्याकडे काही पुरावे आहेत का?" तर कुलकर्णी शांतपणे म्हणाले,"मी स्वतः डोळ्यांनी पाहतोय यांचे उद्योग. तुम्हाला पाहायचे असतील तर या इकडे विद्यापीठात! या लोकांनी काय नाही केले? 'मागेल त्याला शेततळे' योजनेसारखी 'मागेल त्याला पीएच. डी.' दिली. मागच्या तारखेत नोंदणी करून सहा महिन्यांत लोकांना 'डॉक्टरेट' देतो अशी ऑफर देतात हे गाइड. हे कसले गाइड! हे तर मिसगाइड करतात, शक्य त्या प्रकारांनी शोषण करतात.


'तीर्थाटन करू' असे सांगून विद्यार्थ्यांना छळतात." मी विचारले, "तीर्थाटन म्हणजे काय?" तर कुलकर्णी म्हणाले, "तीर्थ म्हणजे दारू! आणखी मला बरेच काही सांगायचे आहे. तेही लिहा पेपरात... हे लोक दुसर्‍या सत्राची परीक्षा घेतात; पण पहिल्या सत्राचा निकालच लावत नाहीत. प्रश्नपत्रिका संगणकावर टाइप केल्यावर ती कुणीच तपासून पाहत नाही. त्यामुळे पेपरमध्ये एकच प्रश्न तीनदा येतो. पर्याय चुकीचे येतात. वर कहर म्हणजे निकालात शून्य ग्रेड दिला जातो.  विद्यार्थी काही समस्या घेऊन अधिकार्‍यांना भेटायला गेले तर खूप वेळ ताटकळून ठेवतात. कधी कधी सुरक्षारक्षकांना बोलावून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना हाकलून दिले जाते. जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांची येथे कुणाला किंमत नाही..."  


कुलकर्णी सुसाट बोलत होते. थांबायलाच तयार नव्हते. मी त्यांना स्पष्ट सांगितले की, "मी असे काहीही लिहीणार नाही. सांगोवांगीच्या गोष्टीवर आपण काही लिहीत नसतो. कुलकर्णी साहेब, तुम्ही एवढं सगळं सांगताय, पण तुम्ही करता तरी काय?" तर कुलकर्णी म्हणाले की, "पूर्वी भाषांतराचे काही काम केले. काही आध्यात्मिक काव्यरचना केली. मग एकविसाव्या वर्षी 'निवृत्ती' घेतली." मी म्हणालो, "अहो कुलकर्णी! वयाच्या एकविसाव्या वर्षी लोक नोकरीला लागतात. तुम्ही निवृत्ती कशी घेतली?" तर म्हणाले, "जाऊद्या, तुम्हाला कळणार नाही." असे म्हणून त्यांनी फोन कट केला. 


कोण हे 'कुलकर्णी' म्हणून Truecaller ॲपवर पाहिले तर पूर्ण नाव सापडले, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, मु. पो. आळंदी, जिल्हा पुणे. दुपारची गाढ झोप एकंदरीत बरी नसते. काहीही स्वप्नं पडतात...!


(या लेखात व्यक्त झालेली मते लेखकाची स्वतःची आहेत. त्याच्याशी एबीपी माझा, abpmajha.com किंवा एबीपी नेटवर्क सहमत असतील असं नाही).