>> विजय साळवी, एबीपी माझा


इंग्लंडमधला आयसीसी विश्वचषक अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. वन डे सामन्यांच्या या विश्वचषकाचं 30 मे ते 14 जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. विराट कोहलीची टीम इंडिया या विश्वचषकावर तिसऱ्यांदा भारताचं नाव कोरण्यात यशस्वी होईल का?


25 जून 1983... क्रिकेटची पंढरी अशी ओळख लाभलेल्या लॉर्डसवर भारतीय तिरंगा मोठ्या डौलानं फडकला. कपिल देवच्या भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडिजला धूळ चारुन आयसीसी विश्वचषकावर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं.


2 एप्रिल 2011... महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाला तब्बल 28 वर्षांनी पुन्हा एकदा भारताला पुन्हा विश्वचषक जिंकून दिला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं तुल्यबळ श्रीलंकेवर मात केली.



कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघांनी घडवलेला तो इतिहास यंदा इंग्लंडच्या रणांगणात पुन्हा पाहायला मिळणार का? विराट कोहलीची टीम इंडिया आयसीसीच्या विश्वचषकावर तिसऱ्यांदा भारताचं नाव कोरणार का?


विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रमवारीतील नंबर वनची गदा एकदा-दोनदा नाही, तर लागोपाठ तीन वेळा जिंकली आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. पण तोच विराट कोहली आजच्या टीम इंडियाला वन डे क्रिकेटचा वर्ल्ड चॅम्पियन बनवू शकतो का? हाच प्रश्न सध्या भारतीय क्रिकेटरसिकांना पडला आहे.


विराट कोहलीनं एक कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीची उंची गाठायला अजूनही अवकाश आहे. पण वन डे क्रिकेटच्या दुनियेत त्यानं मिळवलेलं यश कमालीचं आहे. विराटनं आजवरच्या कारकीर्दीत 68 वन डे सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्त्व केलं असून, त्यापैकी 49 सामन्यांमध्ये विजय आणि केवळ 17 सामन्यांमध्येच हार ही आहे कर्णधार या नात्यानं त्याची कामगिरी. विराटच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर टू राखून ठेवला आहे.


विराट कोहलीनं वन डे सामन्यांमध्ये कर्णधार या नात्यानं बजावलेली कामगिरी नक्कीच अपेक्षा उंचावणारी आहे. पण त्याच वेळी एक फलंदाज या नात्यानं टीम इंडिया त्याच्यावर अधिक अवलंबून आहे. 227 वन डे सामन्यांमध्ये 59.57 च्या सरासरीनं 10,843 धावा... त्यात 41 शतकं आणि 49 अर्धशतकं ही कामगिरी विराटमधल्या फलंदाजाचं विराट महत्त्व अधोरेखित करणारी आहे. पण विराट कोहली हा टीम इंडियाचा नंबर वन फलंदाज असला, तरी तो एकटा भारताला विश्वचषक जिंकून देऊ शकणार नाही. त्याच्याइतकाच सलामीच्या रोहित शर्मा आणि शिखर धवनलाही सूर गवसणं भारताच्या दृष्टीनं गरजेचं आहे.



वन डेत तीन द्विशतकं झळकावणारा रोहित आणि जगातला एक स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला धवन या दोघांमध्येही सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. पण अंबाती रायुडू आणि रिषभ पंत यांच्या अनुपस्थितीत मधली फळी हा भारतीय फलंदाजीचा कच्चा दुवा ठरला आहे. भारताच्या विश्वचषक संघात चौथ्या क्रमांकाचा अस्सल फलंदाज नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची पोकळी भरून काढण्यासाठी टीम इंडियाला विराटसह रोहित आणि धवनचंही क्लिक होणं आवश्यक आहे.


मूळच्या सलामीच्या लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा सल्ला दिलीप वेंगसरकरांसारख्या मान्यवरांनी दिला आहे. थ्री डायमेन्शनल क्रिकेटर अशी बिरुदावली मिळालेला विजय शंकर हा टीम इंडियाचा चौथ्या क्रमांकासाठीचा दुसरा पर्याय राहिल. पण वयपरत्वे भर ओसरलेला महेंद्रसिंग धोनी, दुखापतीतून सावरलेला केदार जाधव आणि आयपीएल किंग असलेला हार्दिक पंड्या यांची बॅट अखेरच्या पंधरा षटकांत तळपली तर टीम इंडियाला धावांचा मोठा डोंगर उभा करता येऊ शकतो किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलागही करता येईल.


टीम इंडियाच्या 2011 सालच्या विश्वचषक विजयाचा हीरो गौतम गंभीरच्या मते, भारतीय आक्रमणात एका वेगवान गोलंदाजाची उणीव जाणवते. ईशांत शर्मा किंवा उमेश यांदव या दोघांपैकी एकाला घेऊन ती उणीव भरता आली असती, पण त्यामुळे संघात समतोल राखणाऱ्या अष्टपैलू वीरांवर कुऱ्हाड कोसळली असती. आगामी विश्वचषकात टीम इंडियाच्या आक्रमणाचा जसप्रीत बुमरा हा मुख्य शिलेदार राहिल. फलंदाजीत जसा विराट कोहली, तसाच गोलंदाजीत बुमरा हा हुकुमाचा एक्का ठरावा.


बुमराच्या बूम बूम यॉर्कर्सना मोहम्मद शमीचा स्विंग आणि भुवनेश्वर कुमारचा वेग यांची साथ कशी लाभते यावर भारतीय आक्रमणाची मदार राहिल. हार्दिक पंड्या आणि विजय शंकरची मध्यमगती गुणवत्ता मधल्या षटकांसाठी निर्णायक ठरावी. बीसीसीआयच्या निवड समितीनं कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहलच्या मनगटी फिरकीवर दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करण्याची संधी त्यांना विश्वचषकात मिळणार आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या पाटा ठेवण्यात आल्या, तर डावखुरा अष्टपैलू रवींद्र जाडेजाची कामगिरी निर्णायक ठरावी. पण केदार जाधवला गोलंदाज म्हणून आयपीएलच्या रणांगणात न लाभलेलं यश टीम इंडियाच्या गोटात नक्कीच चिंता निर्माण करणारं आहे.


आता याउपरही आयसीसीच्या फॉरमॅटनुसार विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठायची, तर दहा फौजांच्या प्राथमिक साखळीत टीम इंडियाला नऊपैकी किमान सहा सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. टीम इंडियाची गुणवत्ता आणि ताकद लक्षात घेता, विराटसेनेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवणं कठीण दिसत नाही. पण त्यानंतर विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकार करायचं, तर टीम इंडियासमोर उपांत्य आणि अंतिम सामन्यात लागोपाठ दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी संघांचं आव्हान असेल. आणि तिथंच विराटसेनेच्या गुणवत्तेची आणि ताकदीची खरी कसोटी असेल.