पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या चाळीस सर्वोत्तम अथलिट्सना कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आपल्या फौजेत दाखल करून घेतलं आहे. या लढाईसाठी पंतप्रधानांनी दिलेल्या संदेशाची एक पंचसूत्री आहे. ही पंचसूत्री आपण साऱ्यांनी अंमलात आणली, तर कोरोनाला हरवणं कठीण नाही, असा पंतप्रधानांचा विश्वास आहे.


संकल्प... संयम... सकारात्मकता... सन्मान आणि सहयोग


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या चाळीस सर्वोत्तम अथलिट्सना कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिलेल्या संदेशाची हीच होती पंचसूत्री. पंतप्रधान मोदींनी दिलेला हाच संदेश आता देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबवण्याची जबाबदारी या चाळीस क्रीडासैनिकांची राहिल.


वास्तविक सचिन असो किंवा सौरव गांगुली... सिंधू असो किंवा सायना नेहवाल... खेळांच्या आंतरराष्ट्रीय मैदानात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या वीरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपापल्या परीनं आजवर योगदान दिलंय. मग ते सोशल मीडियावरून सामाजिक संदेश देणं असो किंवा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री निधीला आर्थिक सहाय्य करणं असो. पण देशाचे नागरिक म्हणून ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी होती. आता पंतप्रधान मोदींनी या क्रीडासैनिकांना कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी आपल्या फौजेत दाखल करून घेतलंय.


कोरोनाविरुद्धच्या या लढाईचं आव्हान खूप मोठंय. मोदींच्या शब्दांत सांगायचं तर ते अवघ्या विश्वातल्या मानवसमूहावर आलेलं संकटय. दुसऱ्या महायुद्धानंतर मानवसमूहाचं सर्वाधिक नुकसान करणारी कोरोना ही पहिली घटना असल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी देशातल्या सर्वोत्तम अथलिट्सशी बोलताना केला. या अथलिट्सना उद्देशून ते म्हणाले... आजवर तुम्ही खेळांच्या मैदानात देशाचं वैभव वाढवलंत. त्याबद्दल तुमचं कौतुक आहेच, पण आता देशातल्या नागरिकांचं मनोधैर्य उंचावण्याच्या दृष्टीनं तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे.


देशातल्या नागरिकांचं मनोधैर्य उंचावतानाच, त्यांना सोशल डिस्टन्सिंगचा सामाजिक संदेश देण्याची आणि त्यांना सामाजिकदृष्य्चा अधिक शहाणं करण्याची जबाबदारीही पंतप्रधानांनी खेळाडूंच्या खांद्यावर दिलीय. जग जिंकणारे खेळाडू हे सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्यातले ताईत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांशी त्यांची नाळ ही नेहमीच जोडलेली असते. त्यामुळं देशाच्या क्रीडासैनिकांची भाषा देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना सहज समजू आणि उमजूही शकते, याचा अंदाज मोदी यांच्यासारख्या मुत्सद्दी नेत्याला येणं स्वाभाविकच होतं. तेच लक्षात घेऊन त्यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता देशातल्या सर्वोत्तम अथलिट्सनाही सहभागी करून घेतलंय.


आता पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या क्रीडासैनिकांना दिलेल्या मंत्राची काय आहे पंचसूत्री?


पहिलं सूत्र – दृढ संकल्प


कोरोनाची लढाई जिंकायची तर प्रत्येकानं मनाशी जिंकण्याचा निर्धार करायला हवा. विजिगिषु वृत्तीचे चॅम्पियन्स ही गोष्ट सर्वसामान्यांना नेमकी समजावून देऊ शकतील.


दुसरं सूत्र – संयम


सोशल डिस्टन्सिंग हे कोरोना पसरू न देण्याचं महत्त्वाचं सूत्रय. पण सर्वसामान्य माणसाकडे सध्या संयमाचीच उणीव असल्यानं तेच आपल्याला घातक ठरतंय.


तिसरं सूत्र – सकारात्मकता


कोरोनाचा जगभरातला फैलाव वाढत चालला आहे. या परिस्थितीत लोकांनी संकटाचा मुकाबला सकारात्मकतेनं करायला हवा, अशी पंतप्रधानांना अपेक्षा आहे.


चौथं सूत्र – सन्मान


कोरोनामुळं समाजातला ताणतणाव इतका वाढत चाललाय की, त्या तणावाखाली ठिकठिकाणी डॉक्टर, पोलीस आदी आपल्यासाठी लढणाऱ्या मंडळींचा अपमान होत आहे. हे चित्र बदलावं अशीही पंतप्रधानांना अपेक्षा आहे.


आणि पाचवं सूत्र – सहयोग


कोरोनाविरुद्धच्या या लढाईत देशाला मोठ्या अर्थसहाय्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकानं खारीचा वाटा उचलला, तर शासकीय तिजोरीत मोठी रक्कम उभी राहू शकेल.


कोरोनाविरुद्धच्या लढाईच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी घातलेली साद देशाच्या क्रीडासैनिकांनाही नवं स्फुरण देणारी ठरावी. त्यांच्यासमोरची ऑलिम्पिक, आयपीएल, विम्बल्डन आदी सारी उद्दिष्टं काही काळासाठी तरी सध्या दूर आहेत. त्यामुळं सचिन, सौरव, सिंधू आणि सायनाही नव्या जोमानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत उतरतील. पण ही मंडळी जे सांगतील, ते आता आपणही अंगी बाणवायला हवं. आणि तसं झालं तर कोरोनाला हरवणं कठीण नाही.