>> संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा
सध्या संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोनाशी मुकाबला करायची जबाबदारी सगळ्यांचीच आहे. अख्ख्या भारताला लॉकडाऊनचे आदेश असूनही अनेकवेळा काही 'टगे' केवळ हिंडण्याकरता बाहेर पडून पोलिसांची डोकेदुखी वाढवण्याचं काम करत आहे. पोलीस त्यांच्याप्रमाणे परिस्थिती हाताळत आहे. कधी प्रेमाने, तर कधी कडक शिस्तीचा धाक दाखवून या टवाळखोरांना वेळप्रसंगी चांगलाच 'प्रसाद' देण्याचं काम करत आहेत. मात्र या सध्याच्या भयभीत वातावरणात त्यांना कायदा-सुव्यवस्था राखताना जनतेच्या रोषालाही सामोरे जावं लागत आहे. जेव्हा भारतातील प्रत्येक जण (अत्यावश्यक सेवेतील यंत्रणेत काम करणारे सोडून) आपल्या घरात कुटुंबियांची काळजी घेत दोन महिन्यांचा किराणा घेण्यात 'बिझी' होते तेव्हा हाच पोलीस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रस्त्यावर जगता पहारा देत होता. त्याच्या घरातील किराणा कुणी भरला असेल, त्यालाही कुटुंब आहेच ना, आई-वडील, बायको-मुलं त्यांचं पण सगळं आपल्या सारखंच आहे.
अनेक दिवसांपासून पोलीस रस्त्यावर उभे राहून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे ज्याप्रमाणे लोकांना चोप देणारे विडिओ व्हायरल झाले, त्याचप्रमाणे नागरिक आणि पोलिसांशी वाद होणारे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण सर्वांनीच पहिले असतील. दात-ओठ आवळून आणि शिरा-स्नायू ताणून जेव्हा एखादी कारवाई पोलीस करत असतात, तेव्हा या सगळ्या प्रक्रियेचा त्यांच्या शरीरावरही परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा असते की पोलिसांनी कायम दक्ष असलं पाहिजे आणि ते दक्ष राहतातही. परंतु ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या तब्येतीची काळजी ते स्वतःच घेत असतात.
आजच्या या काळात सर्वच पोलीस कोणतीही तक्रार न करता प्रामाणिकपणे ड्युटी बजावत आहेत. त्यांनाही घरचे सांगत असतील काळजी घ्या आणि वेळेत जेवा. या प्रेमपूर्वक सूचना घेऊन रोज पोलीस घर सोडतात, रस्त्यावर थांबतात. गर्दी हटविण्याच्या कार्यात ते सुद्धा एक गर्दीचा भाग बनून जातात. आज अनेकजण गर्दी नको म्हणून ओरड करतात कारण विषाणूचा संसर्ग टाळावा म्हणून, मग आमच्या पोलिसाला तो नियम लागू होत नाही का? त्यालाही या विषाणूचा प्रादुर्भाव होईल याची भीती त्यांना वाटत नसेल का? शेवटी पोलीस पण एक माणूस आहे हो, हा साधा विचार आपल्या मनात येत नाही का? तुम्ही जर रस्त्यावर गर्दीच केली नाही किंवा नीट अंतर ठेवून शिस्तीत सर्व खरेदी केली तर तुम्ही जसे सुरक्षित राहाल तसेच हे पोलीस पण सुरक्षित राहू शकतील.
पोलिसांची कामावर येण्याची वेळ ठरलेली असते, मात्र जाण्याची वेळ रोज एकसारखी असेलच असे नाही. अशा सेवेत ते काम करतायत की कर्तव्यावर असताना घरी जायची वेळ निश्चित नाही, तरीही कुणाला तक्रार न करता ते आपली नोकरी बजावत असतात. त्यांना वाटत नसेल का, घरी जाऊन मुलांचा अभ्यास घ्यावा किंवा कुटुंबियांशी गप्पा मारत छानसा वेळ घालवावा. पोलिसांनाही या कठीण काळात काम करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याची याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयातून दिल्या गेल्या पाहिजे, त्या अगोदरच दिल्या असतील तर उत्तमच.
परंतु, ज्याप्रमाणे आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक जण महत्वाचा आहे, त्याच प्रमाणे पोलीस दलातील शिपाई पदापासून ते उच्च स्तरावरील अधिकारी जपण्याची जबाबदारी नागरिकांनी उचलली पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की काय अतिशयोक्ती मी सांगतोय, तर ते खरं आहे. आपण जर नियम पाळून आपल्या घरात बसलो, कुठेही अनावश्यक गर्दी केली नाही तर एक प्रकारे आपण त्यांच्या कामावरील ताण थोडा तरी हलका करू शकतो. आज आपल्याला सूचना आहेत, विनाकारण प्रवास करू नका आहे. तरी देखील वाहतूक थांबत नाही. ते थांबवण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे. परत पोलीस त्या कामाला लागले. आपण सर्वांनी ठरवलं आणि प्रवास नाही केला तर पोलीस काही वेळ तरी निवांत बसू शकतील.
पोलीस बळाचा वापर तेव्हाच करतात, जेव्हा त्यांना वाटतं की नीट सांगूनही काही लोकांना काळत नाही. कोरोना तुम्ही कोणत्या सेवेत आहात, हे बघून होत नाही. जितकी भीती सर्वसामान्य नागरिकांना आहे, तितकीच पोलिसांनाही आहे. खरोखरच पोलीस आज जीवाची बाजी लावून काम करत आहेत. त्याकरिता आपण त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीच आहे. देशातील सर्व स्तरातील लोकांनी पोलीस सध्या पार पडत असलेल्या कामाचं कौतुक केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील नागरिकांना संबोधून केलेल्या भाषणातून पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली आहे. ते त्यांचं कर्तव्य जर चोख पार पडत असतील, तर मग थोडी मदत आपल्याकडून पण करायला काय हरकत आहे. चला तर मग आपण त्यांना मदत करूया, आपल्या घरी शांतपणे बसुया.
>> या ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. लेखक संतोष आंधळे हे माय मेडिकल मंत्राचे वरिष्ठ संपादक आहेत.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग