आपल्या कानावर अनेकदा असा सवांद आला असेल जिवंत माणूस होता तो आता मृत्यू पावला आता चर्चा करून काय  फायदा, जाणारा गेला. मात्र वैद्यकीय शास्त्रात माणूस का मेला याचाही एक शास्त्रीय अभ्यास आहे. तो अभ्यास सखोल पद्धतीने करण्याकरिता पदव्युत्तर अभ्यासक्रम आपल्याकडे  वैद्यकशात्रात आहे. थोडक्यात त्याला न्यायवैद्क शास्त्र (फॉरेन्सिक मेडिसिन )असं म्हणतात. कायदा व कायदेविषयक समस्यांशी संबध असलेली वैद्यकाची शाखा. तसेच प्रत्येक रुग्णालयात एखाद्या रुगणांचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी समिती असते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या या महाभयंकर संकटात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या मृत्यूवर विश्लेषणात्मक चर्चा होणे गरजेचे आहे म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाने  'डेथ ऑडिट' (मृत्यू  कारणमिमांसा) करण्याचा निर्णय घेतला असून मृत्यू होण्याचे नेमके कारण कळणार असून भविष्यात कशा पद्धतीने मृत्यू टाळता येईल आणि काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत केली आहे. आतापर्यंत 133 मृत्यूचं डेथ ऑडिट केले आहे.


समजा एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या पाठीमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी औषध वैद्यक, बालरोगतज्ज्ञ , स्त्री व प्रसूतिरोग, विकृतीशास्त्र, त्याचप्रमाणे महत्त्वाचे म्हणजे बधिरीकरणशास्त्र विभागाचे तज्ज्ञ एकत्र  येऊन चर्चा करतात अशी अनेक रुग्णालयामध्ये प्रथा आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने  14 एप्रिल रोजी कोरोनामुळे महाराष्ट्रात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या मृत्यूचे विश्लेषण करणे आणि त्याचे प्रमाण कमी करण्याकरिता आरोग्य विभागाने मुंबई अणि परिसरासाठी तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली होती.


मुंबई शहर व परिसरात कोरोनाची विषाणूबाधा आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असून त्यावर उपाययोजना व विश्लेषण करण्याकरिता सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे .मुंबई शहरासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी के.ई.एम. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, के. ई.एम. रुग्णालयाचे औषधी वैद्यक शास्त्र प्रमुख डॉ. मिलिंद नाडकर, सायन रुग्णालयाचे अतिदक्षता विभागप्रमुख डॉ. नितीन कर्णीक , जे.जे. रुग्णालयाचे कम्युनिटी मेडीसीनचे प्रा.डॉ. छाया राजगुरू, जे.जे. रुग्णालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभग प्रमुख डॉ. विद्या नागर, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचा समिती सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे समितीच्या सदस्य सचिव आहेत.


या प्रकरणी डॉ अविनाश सुपे सांगतात की, "या मृत्यूच्या कारणांचा शोध लागला तर तशी लक्षणे आढळलेल्या रुग्णांच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येते. आतापर्यंत 133 मृत्यूचं डेथ ऑडिट करण्यात आलं असून उर्वरित काम सुरु आहे. आमची समितीतील तज्ज्ञांशी प्रत्येक मृत्यूवर सदाहक बाधक चर्चा होते .यामुळे मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला असून याची एक दिशा निश्चित होते. याचा शास्त्रोक्त अहवाल आम्ही शासनाला सादर केला असून यामुळे उपचार पद्धतीत बदल करण्याकरिता  जे डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत त्यांना मदत होते. यामध्ये  काही मृत्यूंबाबत असंही दिसून आले आहे की, काही 8-10 दिवस रुग्ण स्थिर असतात आणि त्यांचे अचानक पणे मृत्यू झाले आहेत. अनेक  वेळा रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात येतात  परिस्थिती खूप हलाखीची झालेली असते. त्यामुळे वृद्ध नागरिकांना दाखल केल्यावर, ज्यांना श्वसनाचा त्रास आहे अशा रुग्णांना तात्कळ ऑक्सिजन देणे गरजेचं असल्याचे अहवाल आम्ही नोंदविले आहे. काही दिवसांपासून आपला सरासरी मृत्यू दर हा पहिल्यापेक्षा कमी झाला आहे. तो आणखी खाली आणण्यासाठी  प्रयत्न करणे गरजेचं आहे".


ते पुढे असेही सांगतात की, " त्याचप्रमाणे आतापर्यंत जे रुग्ण दगावले आहेत त्यामध्ये बहुतांश करून त्या रुग्णांना आधीच काही  स्वरूपाच्या व्याधी असल्याचे दिसले आहे . एखादा रुग्ण तात्काळ रुग्णालयात आणल्यावर दगावल्याची कारणेही शोधण्याचं काम समिती करते आहे.  कोरोनाबाधित रुग्ण दगावल्यानंतर त्याचे शव तात्काळ शास्त्रीय पद्धतीने बंद करणे. त्याकरिता स्वतंत्र ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करणे. त्याचप्रमाणे शक्य तितक्या लवकर त्याचे अंत्यविधी होतील याकरिता एक स्वतंत्र रुग्णालयांनी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. या आम्ही तयार केलेल्या सर्व  मृत्यू विश्लेषण अहवालाचा उपयोग जे डॉक्टर रुग्णांना उपचार देत असतात त्यांना एक दिशा देण्याचं काम करतो".


राज्यात व मुंबई परिसरात ज्या रुग्णालयात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या रुग्णालयाच्या प्रमुखाला संबधित मृत रुग्णाची सविस्तर माहिती या समितीला पाठविणे तसेच समितीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. तशा आशयाचे  पत्र आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठविले आहे.  कोरोनामुळे होणाऱ्या मुत्यूच्या कारणांचे विश्लेषण आणि त्यानुसार मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही समिती उपाययोजना सुचविणार आहे. त्याचबरोबर कोरोना उपचारासाठी रुग्णालयांना आवश्यक त्या तयारीसाठी मार्गदर्शन देखील केले जाईल.


मुंबई वगळून उर्वरित राज्य असे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीत सहा तज्ज्ञ सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या समितीत माजी आरोग्य संचालक डॉ. पी.पी. डोके, औषधी वैद्यक शास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. ए. एल. काकराणी व डॉ. दिलीप कदम, पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषधी वैद्यक शास्त्र विभागप्रमुख डॉ. शशीकला सांगळे, आरोग्य सहसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग