>> संतोष आंधळे
संपूर्ण जगात धुमशान घातलेल्या कोविड -19 म्हणजेच कोरोन व्हायरसला आळा घालण्याकरता लॉकडाऊनचा अवलंब पूर्ण देशात केला गेलाय. आता दुसरा देशव्यापी लॉकडाऊन संपण्यास पाच दिवस बाकी असताना, नागरिकांमध्ये लॉकडाऊन संपणार की चालू राहणार या चर्चेला उधाण आलंय. येत्या 3 मे रोजी देशात लॉकडाऊन लागू होऊन 40 दिवस होणार असले तरी म्हणावी तितकी कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही. किंबहुना रुग्ण संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढच झाली आहे. वास्तवात या लॉकडाऊनचा परिणाम एकंदरच सर्व मानवी जीवनावर झाला असून प्रत्येकजण याची झळ सोसत आहे. मात्र सरकारला लॉकडाऊन ठेवण्यात स्वारस्य नसून केवळ नागरिकांच्या आरोग्याच्या हिताकरिता शासन परिस्थिती बघून निर्णय घेत असते. त्यामुळे या लॉकडाऊन विषयी विचार करताना, अगोदर आपण निरोगी कसे, राहू उत्तम आयुष्य कसे जगू याचाही प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आजच्या घडीला लॉकडाऊन या विषयवार काही निर्णय झाला नसून योग्य वेळी राज्य सरकार नागरिकांना माहिती देईल.
कोरोना पेक्षा आपल्याकडे लॉकडाऊनचं कौतुक फार असल्याचं चित्र दिसत आहे. संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि त्यात मुंबई-पुणे शहरात अधिक आहे. कोरोनाबाधितांचा सध्या आकडा बघून राज्यातील संपूर्ण लॉकडाऊन उठवावा अशी सकारात्मक परिस्थिती सध्या तरी दिसत नाही आहे. मात्र काहीजण आमच्या जिल्ह्यात कुणी रुग्ण नाही अशा अविर्भावात वागत असून आमच्या जिल्ह्यात कामकाज आणि व्यवहार सुरळीत करण्यास काय हरकत आहे. याबद्दल बोलताना दिसत आहे. त्या मंडळींचा मुद्दा बरोबर जरी असला तरी त्याकरिता प्रशासनाला काही नियोजन आणि उपाय काळजीपूर्वक खबरदारी घेत करत असतं. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 20 एप्रिलनंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वसतूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळ वाहतूक सुरु आहे. महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत हे यापूर्वीच मुखमंत्र्यांनी जाहीर केले आहे. 40 प्रयोगशाळांच्या मदतीने राज्याने कोरोना चाचण्यांचा एक लाखांचा टप्पा गाठला आहे. संपूर्ण देशात सगळ्यात जास्त टेस्ट या महाराष्ट्रात झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात ज्या गोष्टी अत्यावश्यक सेवा आहे, त्या सर्व तर चालूच आहे. नागरिकांनी संयम ठेवण्याची हीच ती वेळ आहे. सर्व जे काही चाललंय ते सुरु आहे.
सरकारकडून लॉकडाउन का वाढवला जातो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. केंद्रातील आणि राज्यातील सरकारला लॉकडाउन वाढवण्यास काही आनंद होत नाही, उलटकरवी कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर त्यांनी पाणी सोडलंय. फक्त देशातील नागरिक सुरक्षित राहावे, त्यांना कुठल्याही पद्धतीचा आरोग्याचा त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्याकडून ही टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात येत असतो . कोरोनाबाधितांचा राज्यातील आकडा वाढत चाललाय. खबरदारी म्हणून प्रशासन विविध पावले उचलत आहेत. उपाय योजना राबवत आहे. आरोग्य यंत्रणा त्यांचं काम करत आहेत. सध्या जे घरी आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये आणि केवळ नागरिकांचं हीत लक्षात घेऊन असे निर्णय शासन घेत असतं.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने जी माहिती देण्यात आली आहे, त्यात मुंबईतील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या सर्व पातळीवरच्या उपाययोजना परिणामकारक ठरत आहेत. सुमारे दीड कोटी मुंबईकर जनतेच्या दैनंदिन जीवनाची काळजी वाहत असताना कोरोना बाधितांना योग्य, दर्जेदार उपचार देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यात देखील आरोग्य यंत्रणा प्रभावी ठरली आहे. यामुळेच 24 एप्रिलपर्यंत आढळलेल्या 4 हजार 870 रुग्णांपैकी 762 जण बरे होऊन घरी परतले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचा वेग वाढल्याने प्रतिबंधित क्षेत्र कमी होवून नागरिकांची दिनचर्या सुरळीत होण्यास आणखी मदत मिळते आहे.
सध्या आशादायक चित्र म्हणजे आपलायकडे अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःला 'लॉक' करून कोरोनाला कसं 'डाउन' करता येईल, सोबत आरोग्य कसं सेफ ठेवता येईल, याचा विचार केला पाहिजे. आपण घाबरण्याची वेळ आता निघून गेली आहे. आपण कशा पद्धतीने सजग आणि सुरक्षित राहू शकतो याच विचार प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे. सर्व नागरिकांना कोरोना किती गंभीर रूप घेतोय हे लक्षात आलं आहे. यापुढे फक्त शासनाने नाही तर सगळ्यांनी मिळून कोरोनावर कशाप्रकारे विजय मिळवता येईल याचा विचार करत सुरक्षित आयुष्य जगलं पाहिजे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- BLOG | डेथ ऑडिट ठरणार कोरोनाची संजीवनी