>> संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा
आज आपण सर्वच जण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेत आहोत. सर्वच देशातील हाउसिंग सोसायटीतील सभासद ज्या छोट्या-छोट्या कारणावरून एकमेकांशी भांडत असायचे, आज त्याच सोसायटीतील सर्व सभासद खांद्याला खांदा (सोशल डिस्टंसिंग ठेवून) लावून काम करत आहेत. अर्थातच त्यांचा मुख्य भर सोसायटीमधील स्वच्छतेवर आहे. साफसफाईच्या मुद्द्याने सर्वांनाच एकत्र आणलं आहे. एरवी सफाई कामगाराचा अनादर करून बोलणारे सभासद आज आदरपूर्वक, नम्रतेने सफाई कामगारांशी बोलत आहेत. आज त्यांना या स्वच्छतादुताचं महत्व कळालं असून त्याला काय हवंय नकोय देखील विचारलं जात आहे. त्यांना त्यांचाच हा सफाई कामगार फक्त स्वच्छतादूतच नाही तर खरा देवदूत वाटायला लागलाय. कारण तो जर एक दिवस आला नाही, तरी खूप अस्वच्छता पसरून रोगराई वाढू शकते, अशी त्यांना आता भीती वाटू लागली आहे. या अस्वच्छतेने आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि आपण आजारी पडू ही भावना आता सर्वसामान्यांमध्ये घर करू लागली आहे.
देशभरात कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशावेळी प्रशासन शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी राहण्याचं आवाहन करत आहे. परंतु घाणीच्या साम्राज्यात काम करत असणाऱ्या कामगारांकडे पण तेवढ्याच आक्रमकतेने, त्यांच्या सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर, सफाई कामगारांसाठी काम करत असणाऱ्या संघटनांमधून उमटत आहे.
आपला साफसफाईशी संबंध फक्त आपल्या घरापुरता मर्यादित असतो. घरात साचलेला कचरा डस्टबिनमध्ये टाकला की आपली जबाबदारी पूर्ण होते. परंतु, संपूर्ण सोसायटीतील त्या कचऱ्याचा प्रवास पुढे कसा होतो, हे जाणून घेण्याची कधीही तसदीही आपण घेतलेली नसते. कारण तसं जाणून घ्यावं अशी गरजही कधी वाटली नाही. आपल्यासाठी सफाई कामगार कचरा घेऊन जातो, दिवाळी सणाला तो आलाच घरी तर दिले तर दिले 200-500 रुपये बोनस म्हणून द्यायचे, इतकाच काय तो सफाई कामगारांशी संबंध. अनेक लोकांना तर त्याचं नावही माहित नसतं. ते त्यांना 'कचरावाला' म्हणूनच संबोधतात. याला मात्र काही अपवाद असल्याचं चित्रही काही ठिकाणी पहिलं मिळतं. काही सभासद त्यांना घरच्याप्रमाणे वागवतात. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होतात, वेळप्रसंगी मदत करतात. कोरोनाच्या काळात या सफाई कामगारांना आवर्जून किराणामाल पुरवताना दिसत आहेत. मात्र अशी उदाहरणं फार कमी आहेत.
15 वर्ष स्वतः सफाई कामगार म्हणून काम करणारे आणि सेवा निवृत्तीनंतर सफाई कामगारांच्या मुलांसाठी शाळा चालवणारे रमेश हरळकर आज सफाई कामगार परिवर्तन संघ, ही संघटना चालवतात. ते सांगतात की, "सफाई कामगारांच्या प्रश्नांचा लढा खूप मोठा आहे. आज कोरोनामुळे त्यांचं महत्त्व लोकांना कळतंय, ही चांगली गोष्ट आहे. मात्र सफाई कामगारांचं काम हा आजही एक विशिष्ट समाजातील व्यक्तीच गेली अनेक दशके करत आला आहे. या समाजासाठी मोठं काम उभं करण्याची गरज असून, त्याला आरोग्याच्या सर्व सुविधा आज दिल्या गेल्या पाहिजेत. आजही सफाई कामगार महापालिकेने बांधून दिलेल्या वस्त्यांमध्ये राहतो. त्या वस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. आज प्रत्येक सफाई कामगारांच्या वस्तीत पाण्याची नळाची खास लाईन दिली गेली पाहिजे, म्हणजे कामगार कामावरून जेव्हा घरी जाईल तेव्हा पहिला तो त्या नळाखाली स्वच्छ होऊन घरात प्रवेश करेल."
"आज कोरोनाच्या या परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रातील आणि पोलीस सेवेतील कर्मचाऱ्याचा सहभाग आहे, तेवढाच सहभाग किंबहुना त्यापेक्षा जास्त काम आज सफाई कामगार करत आहे. कोरोनाशी युद्ध करणारे सफाई कामगार हे सुद्धा योद्धेच आहेत."
आज देशभरात कोट्यवधी लोकं साफसफाईचं काम करत आहेत. आपल्याला राज्यातील उदाहरणं घायची झाली तर अंदाजे तीन लाखापेक्षा जास्त सफाई कामगार आज राज्य शासन, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेत कायमस्वरुपी तत्वावर काम करत आहेत. तर 50 हजारांपेक्षा जास्त सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने याच विभागात काम करत आहे. खासगी ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कामगाराची संख्या तर खूप मोठी आहे. मात्र खरी कामाची कसोटी लागते ती राज्य शासन, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेत काम करणाऱ्या सफाई कामगाराची. कारण तुमच्या घरातून, कार्यालयातून ते डम्पिंग ग्राऊंडवर कचरा नेण्याची प्रामुख्याने जबाबदारी ह्यांच्यावरच असते. त्यांना या सेवेसाठी अत्यावश्यक सेवेचा दर्जाही बहाल करण्यात आला आहे.
कचरा वाहतूक श्रमिक संघ आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनिअन, ही संघटना कंत्राटी सफाई कामगारांचे प्रश्न मांडण्याचं काम करत असते. ह्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी, मिलिंद रानडे, सांगतात की, "माझ्या मते सर्वच सफाई कामगारांना स्वयं सुरक्षा किट मिळणे गरजेचे आहे. आज ही लोकं आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचं दर आठवड्याला जनरल मेडिकल चेक-अप केलं जाणं गरजेचं आहे. ज्याप्रमाने केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 50 लाखाचं विमा कवच प्रदान केले आहे. त्याचप्रमाणे ते सफाई कामगाराला पण केले पाहिजे असे मला वाटते."
सफाई कामगारांचं या काळात येणार महत्व पुढच्या काळात जेव्हा कुठलाही साथीचा आजार नसेल त्यावेळी असंच राहणे गरजेचं आहे. शिवाय शासन या सर्व सफाई कामगारांच्या आरोग्याची तसेच त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने लागणाऱ्या सर्व साधनांची काळजी घेईल, असा विश्वास खरं तर व्यक्त करायला हरकत नाही. कारण आपण प्रत्यकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे, जान है तो जहान है. त्यामुळे येत्या काळात आपल्या परिसरातील स्वच्छता अप्रतिम ठेवायची असेल तर आपल्याला या स्वच्छतादूताची काळजी घेतली पाहिजे. प्रशासन त्यांच्यपद्धतीने काम करेल, मात्र या सफाई कामगारांना 'कचरावाला' हाक न मारता किमान आदर देऊन त्यांच्याशी दोन शब्द प्रेमाने बोललात तरी त्यांना बरं वाटेल. एवढी जबादारी नागरिक म्हणून नक्कीच पार पडू शकतो.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग