>> संतोष आंधळे, वरिष्ठ संपादक, माय मेडिकल मंत्रा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात काळजी घेतली जातेय, तसेच दंतवैद्यकीय क्षेत्रात सावधगिरीचा उपाय म्हणून अनेकवेळा दंतोपचार पुढे ढकलण्याचा निर्णय भारतातील बहुतेक डेन्टिस्टने घेतला आहे. त्यामुळे या काळात जर दाताला ठणक लागली, तर फार फार तुमची लक्षणं बघून डॉक्टर तुम्हाला औषध देतील. मात्र तुमचा अट्टाहास असेल की डेंटिस्टने किडलेला दात, दाढ काढावी, तर ते याकाळात शक्य होणार नाही हे आपल्याला मान्य करावेच लागेल. उगाच दाताच्या या डॉक्टरांसोबत भांडत बसू नका. अख्ख्या प्रगतशील देशातही सध्या हीच पद्धत अवलंबली जात आहे. आपल्याकडेही इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) या दंतोपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संघटनेने याबद्दल काही मार्गदर्शक सूचना आपल्या डॉक्टरांसाठी जारी केल्या आहेत.
ब्रिटीश डेंटल असोसिएशन (बीडीए ) या संघटनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दंतउपचार करताना डेंटिस्टने कोणती काळजी घ्यावी, यावर आपल्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे. अनेक वेळा दातांचं दुखणं सहन होत नाही, याचा प्रत्यय आपल्या सगळ्यांना आला असेलच. परंतु परिस्थिती इतकी विचित्र आहे की दातांच्या सर्व उपचारामध्ये डेंटिस्ट हा प्रत्यक्ष तुमच्या तोंडात काम करत असतो. अशावेळी कोरोनाचा फैलाव टाळण्याकरता अनेक डेंटिस्ट हे उपचार करणं टाळत आहेत. याला काही शास्त्रीय कारणं आहेत. ती कारणं अशी की, कोरोना विषाणूचा संसर्ग हा कुणी खोकलं किंवा शिंकलं, त्यातून निघणाऱ्या थेंबामधून (द्र्व्यामार्फत) होत असतो. दाताच्या उपचारांमध्ये अनेकवेळा पाण्याचा, त्याचप्रमाणे हवेचा फवारा वापरला जातो, त्यामुळे अनेक तोंडातील थुंकी हवेत उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला एरोसोल असेही म्हणतात.
जर नकळत कोरोनाबाधित रुगांवर डेंटिस्टने उपचार केल्यास, या एरोसोलने या विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान डेंटल चेअर, इन्स्ट्रूमेंट, टेबल, खुर्ची अशा बऱ्याच ठिकाणी डॉक्टर्स, असिस्टंट आणि अन्य रुग्ण यांचा स्पर्श होत असतो. यामुळे या सर्वांनाच याची बाधा होण्याची शक्यता असते. कुठल्याही डेंटिस्टला रुग्ण नाकारायला आवडत नाही. मात्र वेळच अशी आली आहे की डॉक्टरांना सर्व गोष्टीची काळजी घ्यावी लागत आहे. त्याचप्रमाणे या काळात जर अत्यावश्यक शस्त्रक्रियांची आवश्यकता भासल्यास त्यास मोठ्या रुग्णालयात डॉक्टर पाठवत आहेत.
आजच्या घडीला महाराष्ट्रात 25-30 हजार आणि 1 लाखांपेक्षा जास्त डेंटिस्ट भारतभर आहेत. इंडियन डेंटल असोसिएशन, सेक्रेटरी, डॉ अशोक ढोबळे, याबाबत माहिती देताना सांगतात की, "आम्ही आमच्या डेंटिस्टना कळवलंय, अत्यंत गरजेचं आणि आवश्यक असेल तरच रुग्णाला उपचार द्या. शक्यतो मेडिसिन किंवा परिस्थिती बघून आवश्यकता असल्यास अँटिबायोटिक द्यावेत. अशा परिस्थितीत कुणीही दवाखाने बंद ठेवणं अपेक्षित नाही. रुग्ण आल्यावर त्याची प्रवासाविषयी माहिती डॉक्टरांनी जाणून घेतली पाहिजे. कोरोनाचा कुठलाही संशय आल्यास त्या रुग्णास सरकारी रुग्णालयात पाठवावे. दाताचे नियमित उपचार रद्द करून त्यांना नंतर म्हणजे कोरोनाचा हा सगळा विषय थांबल्यावर बोलवावे. यामध्ये डॉक्टर आणि रुग्ण दोघांच्या सुरक्षेचा विचार केला गेला आहे."
दात दुखण्याचा आजारातून प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी सामोरे जावे लागते. अनेकवेळा दंतोपचार हे टाळू नये, पण औषधे घेऊन काही दिवस पुढे ढकलणे शक्य असते. काही जर छोट्या समस्या असतील तर डॉक्टर्स त्या फोनवरून मार्गदर्शन करून सोडवू शकतात. सध्याच्या परिस्थितीत डेंटिस्ट आणि रुग्णाचा सवांद असणे गरजेचं आहे. अनेक वेळा गैरसमजुतीतून वाद होतात, दोघांनीही एकमेकांच्या अडचणी समजून मार्ग काढण्याची ही वेळ आहे.
मात्र दाताच्या समस्या उद्भवू नये याकरता आपण छोटे-छोटे घरगुती उपाय करु शकतो. याबाबत अधिक माहिती देताना पुण्याच्या डॉ. निशिगंधा दिवेकर सांगतात की,दोन वेळा ब्रश करावा. खाल्ल्यानंतर चूळ भरावी. कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास तरीही उत्तम. अती गरम, अती थंड पदार्थ खाणे टाळावे. माऊथवॉश वापरू शकता. यामध्ये ब्रश आणि माऊथवॉश वापरताना अर्ध्या तासाचे अंतर ठेवावे. हिरड्यांवर बोटं फिरवून गोलाकार मसाज करावी. जेणेकरून हिरड्यांचे रक्ताभिसरण आणि आरोग्य चांगले राहील. मधुमेह, काही हृदयरोग यामध्ये दातांच्या आरोग्यासंदर्भात अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे त्यांनी मधुमेहावरील व इतर औषधे वेळेवर घ्यावीत. रक्तातील साखर नियंत्रणात असावी. धुम्रपान, तंबाखू मिश्रीत सेवन टाळावे."
त्या पुढे सांगतात की, "लहान मुलांना दुधाची बाटली वापरणे शक्यतो टाळावे. त्याने लहानपणीच दाताच्या समस्या उदभवू शकतात. लहान मुलांनी दूध प्यायल्यावर, पालकांनी स्वच्छ कापसाचा बोळा दातावरून फिरवावा. रात्री झोपेत दूध पाजणे शक्यतो टाळावे. कोणत्याही प्रकारे विक्स, कापूर, लवंग, लसूण, चुना अशा गोष्टी दातांना लावणे टाळावे. दात दुखत असल्यास तात्काळ डेंटिस्टला संपर्क करावा. कोरोना आजारांमध्ये डेंटिस्ट सर्वांत जास्त रिस्कमध्ये येतात. प्रत्यक्ष तोंडात, दातांवर लाळेमध्ये काम करायचे असते. ट्रीटमेंटमध्ये एरोसोलची निर्मिती होते. त्यामुळे हे थुंकी किंवा तोंडातून निघणाऱ्या द्रव्यामुळे होणार संसर्ग थांबवण्यासाठी डेंटिस्टना सध्या अत्यावश्यक सेवा सोडून कोणतीही ट्रीटमेंट करणे शक्य नाही."
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग