कोरोना व्हायरसच्या प्रसाराकडे आपण अन्य दृष्टिकोनातूनही पाहू. आपल्याकडील वाहिन्या आणि वर्तमानपत्रे गाळीव आणि साचेबंद मजकुराकडे अधिक भर देत असल्याने लोकांपर्यंत अधिकाधिक नेमकी माहिती पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत हे आधी नमूद करून पुढे जाऊयात.


कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने चीनमधील हुबे प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहरामध्ये 1 डिसेंबर 2019 रोजी पहिली केस नोंद झाली आणि 11 जानेवारी रोजी करोना व्हायरसच्या बाधेने पहिला मृत्यू झाल्याची नोंद झाली. कोरोनासंबंधी अन्य माहिती तुम्ही इतरत्र वाचली असेलच ती आपण दुसऱ्या लेखात नेटकेपणाने घेऊ या. या लेखात चीनमधील करोना बाधेचा भौगोलिक मुद्दा पाहुयात.


चीनमध्ये 23 परगणे / प्रांत / प्रोव्हिन्स आहेत. त्यापैकी तैवान हा प्रांत आणि फुजियन (फुकेन) प्रांतातील काही भाग यावर चीनचा हक्क वादग्रस्त आहे. उत्तर, उत्तरपूर्व, पूर्व, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम आणि दक्षिण पश्चिम या सहा विभागात हे प्रांत विभागले आहेत.



सोबतच्या चित्र क्रमांक दोन मध्ये चीनचे सर्व प्रांत दिसतात. त्यापैकी मध्य भागातील प्रांत करोना व्हायरसच्या बाधेने पुरते ग्रस्त झाल्याचे चित्र क्रमांक एक वरून स्पष्ट होते. त्यातही मध्यभागी असणाऱ्या हुबे प्रांतात याचा उद्रेक सर्वाधिक झाला. हुबे प्रांताची राजधानी असलेल्या 1 कोटीहून अधिक लोकसंख्येचं शहर असलेल्या वुहानमध्ये याचा उगम / केंद्रबिंदू होता.



हुबे प्रांतातील बाधितांची संख्या दहा हजारहून अधिक होती. हा लेख लिहीत असताना चीनमधील करोनाबाधितांची एकूण संख्या 81,093 इतकी होती आणि मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या 3270 ! त्यापैकी 48,557 बाधित लोक एकट्या वुहान शहरातील होते. तर मृतापैकी 2169 लोक वुहानमधले होते. तर हुबे प्रांतातील बाधितांची संख्या 55,527 इतकी होती. (ही आकडेवारी 7मार्च रोजीची आहे)
या व्हायरसच्या चीनमधील प्रसाराची खरी मेख येथेच आहे.


मध्य चीनमधील हुबे व्यतिरिक्त हेनान या प्रांतात इथल्या बाधितांची संख्या दहा हजाराहून कमी होती. तर हुनान प्रांतातील बाधितांची संख्या साडेतीन हजारच्या आसपास होती. दक्षिण मध्य भागात असणाऱ्या गॉन्गडाँग प्रांतात ती दिड हजार इतकी होती तर पूर्व भागातील झिजियांग प्रांतात ती तीन हजारच्या आसपास होती. म्हणजे चीन मधील एकूण कोरोनाबाधित व्यक्तींच्या संख्येपैकी सत्तरह जार लोक म्हणजे नव्वद टक्के लोक या चारच प्रांतात होते. या खेरीज सिशुआन, जियांग्झि, ऍनहूल, जियांगसू आणि शॅन्डाँग प्रांतातील बाधितांची संख्या 4680 इतकी होती. चीनच्या एकूण भूभागापैकी पंधरा टक्के भूप्रदेशात हे सर्व प्रांत येतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो की चीनमधील एकूण बाधित लोकांपैकी 92टक्के बाधित व्यक्ती ह्या पंधरा टक्के व्याप्त भूभागातील होत्या. म्हणजे उर्वरित 85 टक्के भूप्रदेशात एकूण बाधित संख्या फक्त आठ टक्के इतकीच भरते.


त्यातही तिबेटमध्ये कोरोनाबाधितांची संख्या जेमतेम दोन आकडी इतकीच आहे. झिनजियांग, इनर मंगोलिया, ग्वान्सू, शिन्झाय, निंक्झिया आणि जीलिन या प्रांतातील बाधितांची संख्या चारशे साठ इतकीच आहे. हे कसे काय शक्य झाले ?


वुहानमध्ये 1 डिसेंबर रोजी पहिला रुग्ण आल्यानंतर नऊ दिवसांनी याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले. 26 डिसेंबर 2019 रोजी ऍडमिट झालेल्या एका वृद्ध दांपत्याच्या केसमुळे धोक्याची घंटी वाजली. 31 डिसेंबर रोजी कोव्हीड 19 मुळे न्यूमोनिया होऊन मृत्यू होत असल्याचे मान्य केले गेले. त्याच दिवसापासून वुहान मधील सीफूड मार्केट बंद केले गेले. 1 डिसेंबर रोजीचा रुग्ण वगळता उर्वरित रुग्णांनी या सीफूड मार्केटला भेट दिली होती असे पुढील तपासात निष्पन्न झाले होते. हुबे प्रांताबाहेरील पहिला रुग्ण जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सापडला तेंव्हा वुहानला लॉक करण्यात आलं आणि तिथून पुढला इतिहास तुम्हा सर्वांना ठाऊक आहे.


या लेखाच्या मुख्य हेतूकडे वळूयात. चीनचे मध्य आणि पूर्व भागातील प्रांत वगळता अन्यत्र असलेले बाधितांची संख्या अगदीच नाममात्र आहे. आपल्याकडे तसे झालेय का याचे उत्तर नाही असे येते.जगभरात जिथेही संसर्ग झाला तिथल्या देशात ही असा अटकाव शक्य झाला नाही. याचे कारण आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी सगळीकडे ही साथ पोहोचवली. त्याच वेळी चीनकडे जाणाऱ्या बहुतांश विमानसेवा सगळ्यांनी बंद केल्या होत्या, त्यांच्याकडून सगळीकडे प्रसार झाला मात्र त्यांच्याच भूमीत अगदी छोट्याशा भागात हा प्रादुर्भाव झाला. आता मागील तीन दिवसात तिथे आढळणाऱ्या नवीन केसेस बाहेरून आलेल्या व्यक्तीत आढळत आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी नवी व्यवस्था उभी केलीय.


आपल्याकडील बहुतांश राज्यांची भौगोलिक आणि पर्यावरणीय गणिते वेगवेगळी आहेत त्यामुळे आपलं गणित अधिकच क्लिष्ट झालंय मात्र ते अशक्य कोटीतलं नाही. प्रसार रोखणे आणि अधिकाधिक चाचण्या करून घेणे हा एकच मार्ग यावर अधिक प्रभावी आहे. खोटे मेसेज फॉरवर्ड करून आपल्या लोकांनी अतोनात नुकसान केलेलं आहे. शहरातील लोक खेड्यात पळून गेलेत आणि विदेशातून आलेल्या लोकांनी अकलेचे दिवाळे वाजल्यासारखे वागत सर्वाधिक बाधा पोहोचवली आहे. शिवाय आपली सरकारे उशिरा जागी झालीत.डॉनल्ड ट्रम्प भारतात आले होते तेंव्हा आपण दोन आकडी संख्येत होतो मात्र तेंव्हा आपल्याकडे काय चाललं होतं यावर लिहावं वाटत नाही. सरकारहून वाईट लोक आहेत.


आपली यंत्रणा आधीच तोकडी आहे तरीही ती जीवपाड प्रयत्न करते आहे आणि आपण काय करतो आहोत ? आपण आपलीच कबर खोदत आहोत. अत्यंत कठोरपणे प्रसंगी निष्ठूर होत आपल्याला स्वतःला बंधने लादून घेतली तरच आपण यातून वाचू. जो काळजी घेईल तो वाचेल इतरांच्या विषयी काय बोलणार ? करोना व्हायरसला ठरविक भागापुरते रोखण्यात चीनला यश आले मात्र आपण ऑलरेडी त्याच्या पलीकडे येऊन पोहोचलो आहोत. उत्तरपूर्वेकडील राज्ये वगळता करोनाने सगळीकडे पाय पसरले आहेत.  आता जितका प्रसार झाला आहे त्याहून अधिक प्रसार होऊ द्यायचा नसेल तर आपल्या घरात किमान महिना भर बंदिस्त राहण्याची तयारी ठेवा दोस्तांनो ! हे कठीण आहे मात्र याशिवाय तरणोपाय ही नाही..


संबंधित ब्लॉग :


BLOG | टाळ्या-थाळ्या वाजवून झाल्या असतील तर घरी शांत बसा


BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क