आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगल्या हेतूने जनता कर्फ्यूचे आवाहन करुन देशातील जनतेला एक दिवस घरी बसण्यास सांगितले होते. त्याचप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता, सगळ्या नागरिकांनी टाळ्या-थाळ्या वाजवून, तसेच घंटा नाद करून करोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या योद्ध्यांना सलाम करण्याचे आवाहन केले होते. देशातीलम अनेक नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद देत या दिवशी घरी बसणे पसंतही केले शिवाय ठरल्याप्रमाणे आपल्या घरातून टाळ्या वाजवून आपले प्रेमही व्यक्त केले. मात्र, काही जणांनी नेमका अतिउत्साह दाखवून रस्त्यावर झुंडीने उतरुन ह्या सर्व प्रकाराला हरताळ फासला. जनता कर्फ्यूचे आवाहन करताना पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांना सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासही सांगितले होते, मात्र कालचा प्रकार बघता काही नागरिक गंभीर बाब सोयीस्कररीत्या विसरून गेल्याचे दिसत होते.


आपण आतापर्यंत ऐकलं असेल, की सध्या आपला देश हा कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, आणि याच टप्प्यात या संकटाला थांबविण्याकरिता शासन युद्धपातळीवर नवनवीन उपाय यॊजना आखत आहे. आपल्याला सामाजिक लागणीच्या तिसऱ्या टप्पयातून वाचायचं असेल तर 'तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार' असे म्हणायची वेळ आता आली आहे.

रविवारी चिटपाखरू नसणारे रस्ते मात्र सोमवारी व्यवस्तिथ गजबजले होते, मुलुंड चेक नाक्यावर सकाळी लांबच्या लांब गाडीच्या रांगा दिसत होत्या. कशाकरता एवढी ही गर्दी या लोकांनी केली असेल, किती लोकांना अत्यावश्यक काम असेल कि त्यांना खासगी वाहन करून मुंबई बाहेर जायचं असेल किंवा काही जणांना मुंबईत मध्ये यायचं असेल याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सुशिक्षित माणसांनी असं अडाण्यासारखे वागणे बरं नव्हे, जीवापेक्षा मोठं आहे का प्रवास करणं हे आता प्रत्येकालाच ठरवावं लागेल. तुम्ही शासन अनिश्चित काळाकरिता संचारबंदी करण्याची वाट पाहत आहत काय? जमाव बंदीने तुम्ही ऐकणार नसाल तर तुम्ही लवकरच संचारबंदीच्या वाटेवर आहात हे तुम्ही येथे लक्षा घ्यायलाच हवे. मग सरकारच्या नावाने बोंबलत बसू नका.

प्रत्येक वेळी पोलिसांनी तुमच्या पार्श्वभागावर दांडू ठोकला तर तुम्ही ऐकणार आहात काय? इथे प्रत्येकाला कुटुंब आहे, प्रत्येकाला आपल्या स्वकीयांची काळजी आहे. तरी काही आपल्यापेक्षा वेगळे असे अत्यावश्यक सेवेत काम करणारे नागरिक आपलं काम करीत आहेत. तुम्हाला किमान घरी बसायची संधी मिळाली आहे तर बसा ना घरी. मीडियचे प्रतिनिधी आपल्याला बाहेर काय चालंलय हे दाखविण्यासाठी फिरत आहेत, सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध आहे.

जागतिक आरोग्य संघटना, यांच्या मते सोशल डिस्टंसिंग म्हणजे नागरिकांनी एक मीटर किंवा तीन फुटांचं अंतर एकमेकांमध्ये ठेवलं पाहिजे, जेणेकरून जर समोरची एखादी व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यांच्यातून निघणाऱ्या थेंबातुन तुम्हाला संसर्ग होणार नाही. प्रशासन सध्या लोकांनी सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करावा यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे, कारण त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होऊ शकते. सोशल डिस्टंसिंग केल्याने जास्त लोक एकमेकांच्या संपर्कात येत नाही आणि त्यामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होऊ शकते.

देशभरात आता पर्यंत 415 जणांना कोरोनाची लागण झाली असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला असून निश्चितच ही चिंतेची बाब आहे. कारण कोरोनाच्या भीतीने संपूर्ण भारत देश हादरून गेला असताना, दिवसेंदिवस माणसांच्या जमावर निर्बंध आणले जातायत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शक्यतो सर्व कडक पावलं शासन उचलीत आहे. मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल बंद करण्यात आली आहे. शासनाने खासगी कंपन्यांबरोबर चर्चा करून शक्य तेवढ्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याचा सल्ला दिला. बऱ्यापैकी कंपन्यांनी शासनाच्या या आवाहनाला साथ देत कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याचा आदेशही दिला. काही कंपन्यांनी तर काही दिवसांकरिता कार्यालय बंद करण्याचा निर्णयही घेतला. हा सगळा अट्टाहास लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये म्हणून केलेले प्रयोजन आहे.

कोरोनाशी लढा देण्याची जबाबदारी ही केवळ शासनाची नसून, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फूर्तीने सहभाग घेण्याची जबाबदारी आहे. आपल्याला युद्धात समोरचा शत्रू दिसत असतो, तो कशाप्रकारे आपल्यावर हल्ला करतोय हे पाहून आपण त्याचा हल्ला परतवत असतो. मात्र, या कोरोनाच्या युद्धामध्ये विषाणू हा शत्रू आपल्या सर्वसाधारण डोळ्यांनी दिसत नाही, त्यामुळे तो कशाप्रकारे हल्ला करतोय याचं अनुमान तुम्हाला ठरवता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला समोरच्याची युद्धाबाबतची व्ह्युरचना माहीत नसते. त्यावेळी आपण 'डिफेन्स मोड' मध्ये जातो, म्हणजेच प्रतिबंधात्मक पाऊल उचलतो. सध्या देशपातळीवर हेच सुरु आहे, आता तुम्हीच ठरवा सरकारने जी प्रतिबंधात्मक पावले उचललेली आहेत त्यांच्यासोबत जायचं की शत्रूला आत्मसमर्पण व्हायचं. खरं तर उपाय सोपा आहे, शांतपणे घरी बसा.

संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग

BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क

BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...

BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!

जियेंगे तो और भी लढेंगे!

सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?

BLOG | आरोग्यसेवेतून राष्ट्रसेवाच...

कोरोना आणि कोविड-19‬