गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या वापराबाबत चर्चा घडू लागल्यात. सोशल मीडियाचा वापर जसा चांगल्या गोष्टींसाठी केला जातो त्यापेक्षा जास्त तो वाईट गोष्टींसाठी केला जात असल्याचं म्हटलं जाऊ लागलंय. केंद्र सरकारनंही सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याबाबत सूतोवाच केलंय. आज देशातील, केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्ट फोन आलाय. या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम असे सोशल मीडिया अप असतातच. याशिवाय अजूनही अनेक अप आहेत पण ते जास्त लोकप्रिय नाहीत. या सोशल मीडियानं प्रत्येकाचं आयुष्य व्यापलंय. सोशल मीडियाची इतकी सवय लागलीय की ठराविक काळानं मोबाईल सुरु करून सोशल मीडियावर काय आलंय हे पाहिलंच जातं.
माझा एक मित्र आहे. तो सोशल मीडियावर पोस्ट करीत असतो. आणि त्याच्या पोस्टला किती जणांनी लाईक केलंय हे तो सतत पाहात असतो. आणि त्याच्या मित्रांपैकी कुणी लाईक केलं नसेल तर त्या मित्राच्या एखाद्या पोस्टवर जाऊन ‘मीसुद्धा पोस्ट करतो पण तू कुठे बघतो?’ असा प्रश्न करतो. यावरूनच सोशल मीडियाने सगळ्यांना कसं ग्रासून टाकलंय हे दिसून येतं.
2014 मध्ये सोशल मीडियाचा वापर इंडिया अगेन्स्ट करप्शनसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात झालेल्या या आंदोलनासाठी देशभरातून तरुण दिल्लीत दाखल झाले होते. सोशल मीडियावरील आमंत्रणावरूनच ते दिल्लीत पोहोचले होते. या आंदोलनानेच अरविंज केजरीवाल यांना राजकारणाचा दरवाजा उघडून दिला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियाने राजकीय पक्षांना खूप मदत केली. 2019 लाही तेच झाले आणि आताही तेच होत आहे.
जसं मी अगोदर म्हटलं सोशल मीडियाचा वापर कोण कसा करतं यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरवरून समाजात जनजागृतीही केली जाते. नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडली जाते. ‘मी टू’ चळवळ याचे चांगले उदाहरण म्हणता येईल. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच 'निर्भया'ला न्याय मिळावा म्हणून तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. मात्र काही जण याचा गैरवापर करीत असल्याचेही समोर आले आहे. दिशाभूल करणारी आणि नकारात्मक माहिती देऊन लोकांमध्ये फूट पाडणे, दिशाभूल करणे अशी कामे करणाऱ्या व्यक्तीही समाजात मोठ्या प्रमाणावर आहेत.
सोशल मीडियाबाबत बोलताना मल्याळम भाषेतील ‘विकृती’ नावाच्या चित्रपटाची आठवण येथे आल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडिया ही कशी विकृती आहे आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे या चित्रपटात अत्यंत उत्कृष्टरित्या दाखवण्यात आलेले आहे. अशा विषयावरही अत्यंत वेगळा, मर्मस्पर्शी, विचार करण्यास प्रवृत्त करणारा चित्रपट तयार होऊ शकतो हे या चित्रपटाने दाखवले आहे. हिंदी, मराठी चित्रपट निर्माते असा धाडसी विचार कधी करणार कोणास ठाऊक?
विकृती या नावावरून तुम्हाला भलते सलते वाटेल. पण चित्रपटातील विकृती सोशल मीडियावर काय पोस्ट केले जातेय याबाबतची आहे. चित्रपटाची कथा एका मुक्या-बहिऱ्या जोडप्याची, त्यांच्या दोन मुलांची आणि एका परदेशात नोकरी असलेल्या पण सुट्टीसाठी भारतात आलेल्या तरुणाची आहे. एल्डो (सूरज वेंजारामोडू) मुका आहे. त्याची पत्नीही त्याच्याप्रमाणेच आहे. त्याला फुटबॉलपटू बनू पाहाणारा एक मुलगा आणि लहान मुलगी आहे. एल्डो एका शाळेत शिपायाचे काम करतो. तर समीर (शोबिन शाहीर) हा आखाती देशात नोकरी करणारा पण सुट्टीवर भारतात आलेला तरूण आहे. एल्डोची मुलगी आजारी पडते त्यामुळे त्याला दोन दिवस झोप मिळत नाही. दोन दिवसानंतर हॉस्पिटलमधून घरी जाताना तो मेट्रो ट्रेनमध्ये चक्क गाढ झोपतो. त्याच मेट्रोतून समीर प्रवास करीत असतो.
समीरला फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करण्याची आणि त्याला मिळणाऱ्या लाईक्सची संख्या मोजण्याची आवड असते. तो बेंचवर गाढ झोपलेल्या एल्डोचा फोटो काढतो आणि सोशल मीडियावर शेअर करतो. एल्डो दारू पिऊन मेट्रोत झोपलाय असाच सगळ्यांचा समज होतो आणि एल्डोला सोशल मीडियावर प्रचंड शिव्या पडतात. समाजाची बदनामी करणाऱ्या अशा पुरुषांना अद्दल घडवायला पाहिजे अशा प्रतिक्रियाही येतात. ही गोष्ट एल्डोच्या घरापर्यंतही पोहचते. यावरून त्याचा मुलगा मित्राशी मारामारी करतो आणि त्यामुळे त्याला फुटबॉल क्लबमधून बाहेर काढले जाते. एल्डोची नोकरीही जाते.
मात्र एल्डो दारू पिणारा नसल्यानं त्याचा मुलासह एक फोटो शेजारची मुलगी सोशल मीडियावर टाकते आणि पुन्हा एल्डोकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला जातो आणि मेट्रोतील फोटो टाकणाऱ्याला शिव्या देण्यास सुरुवात होते. पुढे काय होते ते चित्रपटात पाहाणेच योग्य आहे. या चित्रपटात सोशल मीडियाचा नकारात्मक आणि सकारात्मक वापर कसा केला जातो ते अत्यंत उत्कृष्टपणे दाखवलेले आहे. एम्सी जोसेफ दिग्दर्शित अजीश थॉमस लिखित एडी श्रीकुमार, गणेश मेनन, लक्ष्मी वॉरियर निर्मित हा चित्रपट 2017 मध्ये कोची मेट्रोत घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.
सोशल मीडियावरची हीच ती विकृती जी एका क्षणात काहीही करू शकते. त्यामुळेच सोशल मीडियाचा वापर कसा करावा हे प्रत्येकाने स्वतः ठरवले पाहिजे. सोशल मीडियाच्या आहारी किती जावे? त्यातील गोष्टींवर किती विश्वास ठेवावा? कोणत्या गोष्टी पुढे फॉरवर्ड कराव्यात याचा एकदा तरी विचार केलाच पाहिजे. सोशल मीडिया हा एक राक्षस आहे त्याला आपल्यावर स्वार होऊ द्यायचे की, त्यावर आपण स्वार व्हायचे हे आपण ठरवण्याची वेळ आता आली आहे.