मी मुंबई बोलतेय.. कधीही न झोपणारं शहर, अशी ओळख असलेली. स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई. जिथे कायम उत्साह फसफसलेला असतो, जिथे माझ्या दोन कोटी लेकरांचा गजबजाट, किलबिलाट होत असतो, काही वेळा कलकलाटही. पण, मला तो बरा वाटतो. कारण, तो माझ्या लेकरांचा असतो. सध्या तर माझ्या पोटातून तुमच्या मेट्रोची तयारीही जोरात सुरु होती.. तिलाही ब्रेक लागलाय. सध्या या रस्त्यांवर, गल्ली बोळात, नाक्या नाक्यांवर मी जीवघेणी शांतता अनुभवतेय. निर्मनुष्य रस्ते, वाहनं जागच्या जागी स्तब्ध. काही अतिउत्साहींचा अपवाद सोडल्यास नजर जाईल तिथपर्यंत नुसते भकास रस्ते दिसतात. तेव्हा ती शांतता, तो सुन्नपणा खायला उठतो मला. माझ्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुंबईकरांची माझ्यावर उमटलेली पावलं पाहायची मला सवय. सध्या त्या पावलांचे ठसे नाहीसे झालेत. कारण एकचं. कोरोनाचा राक्षस जगभरात धुमाकूळ घालत माझ्या भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत धडकलाय. एकेक करत त्याने वेटोळं करायला सुरुवात केली आणि त्याने वाटोळं केलं हो माझ्या लेकराबाळांच्या दिनक्रमाचं. एरवी घड्याळाच्या ठोक्याला घराबाहेर पडणारा मुंबईकर, रात्री उशीरापर्यंत घरी येऊन थडकायचा. सध्या तो त्याच्या लेकराबाळांसह घरीच अडकून पडलाय. सध्या ते गरजेचंही आहे म्हणा. या कोरोनाची साखळी तोडायची असेल तर मुंबईसह भारतातील जनतेने एकजुटीची अखंड साखळी निर्माण केली पाहिजे. घरी राहिलं पाहिजे. गर्दी नकोच करायला. तरी तुमच्यातले काही जण गर्दी करताना दिसतायत. भाजी मार्केटमधली बातमी मी पाहिली, आणि बँकांसमोरच्या रांगांचीही..


काय हो हे..कशाल करताय असं?, अहो, आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी कितीदा सांगितलं, तुम्हाला जीवनावश्यक वस्तुंची दुकानं, भाजीपाला, मेडिकलची दुकानं उघडी असणार आहेत, तरी असं का करता रे. गर्दी टाळा बाबांनो, हात जोडून सांगते. घरीच राहा आणि घरीच राहून तुमच्या मुलाबाळांना, आईबाबांना वेळ द्या जरा. एरवी आपल्या आईबाबांनाही फक्त येतो, फोन करतो असं म्हणण्यापुरते भेटता तुम्ही. फोनवरुन तब्येतीची विचारपूस करता. सध्या जरा वेळ मिळालाय तर आईबाबांसोबत प्रेमाने बसा, बोला. त्यांचे आईबाबा होण्याची ही उत्तम वेळ आहे. त्यांच्या खांद्यावर तुम्ही टाकलेला एक हात त्यांना सुरु असलेल्या औषधापेक्षा मोठा गुणकारी असेल. तुमच्या बायकोला, जी तुमच्यासाठी राब राब राबते अगदी घरातल्या किचनपासून ते तिच्या ऑफिसच्या डेस्कपर्यंत. तिच्याशी बोला, तिला सांगा. छान झालंय जेवण. तू खूप करतेस माझ्यासाठी. असं नुसतं म्हणा तिला, तुमच्यासाठी पुन्हा पदर खोचून झोकून देईल ती सर्वस्व. तुमच्या मुलाबाळांनाही वेळ द्या. खास करुन लहान लहान मुलांना. एरवी लवकर जाऊन उशीराने येणारा बाबा त्यांना पाहायला मिळतो. जरा त्यांच्याशी खेळा, त्यांच्या विश्वात रमा. बघा, किती सकारात्मक ऊर्जा मिळेल ते.


त्याच वेळी अशा अडचणीच्या काळात आपले जीव वाचावेत म्हणून त्यांचे जीव धोक्यात घालून, त्यांच्या रडू कोसळणाऱ्या लेकरांना, कुटुंबियांना घरीच सोडून ड्युटीवर येणाऱ्या पोलीस दलाला, सुरक्षा यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, या आरोग्याच्या लढाईत तुमची ढाल बनून कोरोना नावाच्या शत्रूचा पहिला वार अंगावर झेलणाऱ्या डॉक्टरांसह वैद्यकीय यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांना, सफाई कर्मचारी, वीजेचा सप्लाय 24 तास राहण्यासाठी राबणारे, फायर ब्रिगेडचे जवान, राज्याचे, देशाचे कारभारी, अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील मंडळींना साऱ्यांनाच सॅल्यूट ठोका.


तसं आपण थाळीनाद, टाळीनाद केला अन् केलं त्यांच्या योगदानाला वंदन. पाहिलं मी. अन् तुम्ही एकजुटीचे दिवे प्रज्ज्वलित केले, तेही पाहिले. (काही अतिउत्साही लोकांनी बडवलेल्या थाळ्या, पत्रे, उजळलेले अकलेचे दिवेही पाहिले बरं का?) असो. पुढे सांगते..केवळ कोरोना काळातच नव्हे तर एरवी सणवारात जेव्हा तुम्ही कुटुंबियांसमवेत एन्जॉय करत असता, तेव्हाही ही अत्यावश्यक सेवेतील मंडळी आपल्यासाठी ड्युटी बजावत असतात. त्यांना मनापासून वंदन करा.
सांगा, त्यांना हे युद्ध तुम्ही फिल्डवर राहून लढताय, आम्ही घरात राहूनच लढू. तुम्हाला साथ देऊ. अन् हे केवळ मुंबईकरांना नव्हे, तर माझ्या देशवासियांना सांगतेय मी. कारण प्रत्येक राज्यातून महाराष्ट्रात येणारी मंडळी एकदा तरी मला भेट देतातच. तेव्हा तीही माझीच बाळं नाही का. त्यामुळे बाबांनो आहात तिथेच थांबा, घरी राहा.


जाता जाता आणखी एक सांगते, सध्या तुम्ही घरात आहात त्यावेळी हा विचार मात्र नक्की करा. आपण, कोरोनासारख्या शत्रूंना एन्ट्रीच न देण्यासाठी यापुढे आपण काय काय करु शकतो. अगदी मूलभुत गोष्टी तर नक्की पाळू शकतो. म्हणजे नियमित हात धुणं, आपल्या शरीराची, परिसराची स्वच्छता ठेवणं, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणं, कुठेही न थुकणं यासारख्या.


सध्या म्हणे, माझ्या समुद्रात डॉल्फिन फिरायला लागलेत. तसंच हवेचा दर्जाही उंचावलाय. या गोष्टींसाठीही खबरदारी घ्या की जरा. समुद्राला आलेली भरती पाहायला जेव्हा समुद्रावर जाता, तेव्हा लाटेसोबत तो समुद्र बाहेर फेकत असलेली घाण आठवा. आपल्या अतिउत्साहाला आलेली भरती थांबवण्याची हीच वेळ आहे. वातावरण प्रदूषण मुक्त, शुद्ध ठेवण्यासाठी काय काय करु शकतो. ते सर्व करा आणि फक्त कोरोनाच्या या काळात नव्हे. आयुष्यभरासाठी. माझे रस्ते सध्या निर्जन दिसत असले तरी पाहा किती स्वच्छ दिसतायत. तुम्ही वावरतानाही ते तसे राहू शकतात. अन्य देशातल्या शहरांमधली उदाहरणं आहेतच आपल्यासमोर. वेळ आलीय स्वत:ला या निमित्ताने शिस्त लावून घेण्याची, आरोग्यविषयक शिस्त.


माझ्यावर याआधी अनेक संकटं आली, कधी बॉम्बस्फोट झाले, कधी तो कसाब काळ बनून आला. पण, तुमच्या साथीने मीही यातून बाहेर आले. पुन्हा धावू लागले. आता तुमची पावलं पुन्हा थांबलीयेत, कोरोना नावाच्या दहशतवाद्याच्या हल्ल्यामुळे. याही वेळी आपण नक्की बाहेर येणार बघा, या महासंकटातून. तुमची साथ हवीय. पुन्हा मोठी धाव घेण्यासाठी एक पॉझ महत्त्वाचा आहे.


मग आहेच, तुमचं ऑन युअर मार्क, गेट सेट गो. तुमच्या जीवासाठीच कराल ना एवढं. तुम्ही माझा जीव आहात म्हणून पोटतिडकीने सांगतेय. कराच एवढं. तुमच्या नव्हे माझ्या जीवासाठी.


तुमचीच..


लाडकी मुंबई


संबंधित ब्लॉग :