महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या निर्णयाचं वर्णन करण्यासाठी मला हे शब्द चपखल वाटतात. 'दॅट्स द वे माही वे'. जितक्या अनपेक्षित चाली तो मैदानावर खेळायचा, त्याच अनपेक्षितपणे त्याने अचानक निवृत्ती घेतली. गेल्या काही महिन्यात त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली असली तरी तो इतक्यात तसं करेल असं वाटलं नव्हतं. तरी त्याने एक धक्का और दो.. स्टाईल हा धक्का दिलाच.
ही बातमी येऊन थडकल्यानंतर मानेवरुन रुळणाऱ्या केसांच्या यंग धोनीपासून कॅप्टन कूलचं बिरुद सार्थ करणाऱ्या मॅच्युअर धोनीपर्यंतचा प्रवास आठवला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात वनडेत त्याने तिसऱ्या क्रमांकावर येऊन केलेली धुलाई आठवली, युवराजच्या साथीने त्याने केलेल्या भागीदाऱ्या आठवल्या. त्याच वेळी मोक्याच्या क्षणी त्याने फिरवलेल्या मॅचेसही. मनात येईल त्या चेंडूवर आणि मनात येईल तेव्हा चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावण्याची त्याची क्षमता अफाट होती. बॉलर्सच्या चिंधड्या उडवणं म्हणजे काय हे त्याच्या काळात दोन फलंदाजांनी आपल्याला दाखवलं, एक धोनी आणि दुसरा वीरु सेहवाग. त्याची फलंदाजी देखणीपेक्षा रांगडी होती. षटकार ठोकण्यासाठी मनगटाचा ताकदवान वापर तो असा करायचा की, त्याने मारलेले चेंडू बाऊंड्री रोपच्या बाहेर वगैरे फार क्वचित पडायचे. बहुतांश वेळा ते प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये फेरफटका मारायला जायचे. खेळपट्टीचा, सामन्याच्या स्थितीचा जणू त्याला वास यायचा. मग तो अशी काही बॅटिंग करायचा की, समोरच्या गोलंदाजीची चवच घालवायचा. खास करुन स्लॉग ओव्हर्समध्ये किंवा धावांचा पाठलाग करताना सात-आठ अगदी नऊ-दहाच्या सरासरीने तो स्कोर मीटर असा काही फिरवायचा की, प्रतिस्पर्धी टीम गरगरुन जायची. षटकारांवर ताव मारणारा धोनी एकेरी-दुहेरी धावांचा खुराकही करायचा. त्याचं रनिंग बिटविन द विकेट्स अफलातून होतं.
सामना एकहाती जिंकून देण्याची क्षमता तर त्याने सिद्ध केलीच, शिवाय कर्णधार म्हणूनही आपलं नाणं खणखणीत वाजवलं. ट्वेन्टी-20 चा वर्ल्ड कप, वनडेचा वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया नंबर वन ही मानाची पानं त्यानेच टीम इंडियाच्या शिरपेचात खोवलीत. खास करुन जेव्हा दक्षिण आफ्रिकेत टी-ट्वेन्टी वर्ल्डकप झाला, त्यावेळी भारतीय क्रिकेट संकट काळातून जात होतं. 2007 च्या वनडे वर्ल्डकपमधल्या सर्वात वाईट परफॉर्मन्समुळे (पहिल्याच फेरीत आऊट) भारतीय क्रिकेटची रयाच गेली होती. त्यावेळी धोनीसारख्या यंगस्टरकडे संघाची सूत्रं गेली.
धोनीच्या टीमच्या टी-ट्वेन्टी विश्वविजयाने ती निराशा पुसून टाकत नवा अध्याय लिहायला घेतला. भारतीय क्रिकेटचा त्याने मेकअप केला आणि मेकओव्हरही. पुढे विक्रमांचं, विजयाचं एकेक पान तो या अध्यायात जोडत गेला. सचिनसारख्या लिजंडरी क्रिकेटरपासून ते रोहित शर्मासारख्या त्या काळी नवख्या असलेल्या क्रिकेटरलाही त्याने कॅप्टन म्हणून उत्तम हाताळलं, सांभाळलं.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये फायनलच्या निर्णायक क्षणी जोगिंदर शर्माच्या हाती चेंडू देण्याची धाडसी चाल धोनीच करु जाणे.
तो या खेळाचा उत्तम स्टुडंट होता, असं म्हणावं लागेल. यष्टीपाठी तो विकेटकिपिंग करताना जणू सामना वाचायचा. त्याचं प्रतिबिंब मग त्याच्या डावपेचांमध्ये दिसायचं. डीआरएस अर्थात डीसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा उत्तम अभ्यास त्याला होता. रिव्ह्यू घेण्याचं टायमिंग, त्यासाठीची त्याची निवड हे अभ्यासण्यासारखंच होतं. अगदी फलंदाजीला असतानाही समोरच्या बॅट्समनला तो बर्फाची लादी ठेवल्यागत थंड करायचा. त्याच वेळी खेळातली आग मात्र कायम ठेवायचा. खास करुन युवीसोबतच्या त्याच्या अनेक मॅचविनिंग पार्टनरशिपमध्ये आपल्याला हे जाणवतं. त्याचं सेलिब्रेशनही लो प्रोफाईल असे. अगदी वानखेडेला वर्ल्डकप जिंकताना विनिंग सिक्स मारल्यावरही त्याचे एक्स्प्रेशन तुम्ही आठवलेत तर तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल.
गांगुली म्हणतो, त्याप्रमाणे आज धोनी निवृत्त झाल्याने क्रिकेटमधल्या एका पर्वाची, सांगता झालीय. त्याच वेळी आपल्या संघ सहकाऱ्यांसाठी तो काय होता हे सांगायला सेहवाग अन् कोहलीचे ट्विट पुरेसे आहेत.
या ट्विटमध्ये सेहवाग म्हणतो, चाहत्यांना तुझ्याकडून अशी आझादी नको होती. ओम् फिनिशाय नम:
तर कोहली म्हणतो, जगाने तुला यशस्वी क्रिकेटर म्हणून पाहिलं, मी व्यक्ती म्हणून. तुझ्यासमोर मी नतमस्तक आहे. विचार करा, कोहलीच्या टेम्परामेंटचा, अॅटिट्यूडचा खेळाडू धोनीला म्हणतोय, मी तुझ्यासमोर नतमस्तक आहे. यातच सारं काही आलं.
सचिनसारखा ग्रँड सेन्डऑफ त्याला मिळायला हवा होता. पण, सध्याच्या कोरोना काळामुळे अनिश्चित असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं भविष्य, त्यातच धोनीचं वाढत जाणारं वय, पर्यायाने फिटनेसवर होणारा परिणाम हे त्याने जोखलं आणि काहीसा अनपेक्षित वाटत असला तरी त्याच्यासाठी योग्य असाच निर्णय त्याने घेतला.
आता आयपीएलमध्ये धोनी दिसेल, पण मेन इन ब्ल्यूच्या जर्सीमध्ये त्याची अनुपस्थिती जाणवत राहील. एक मात्र नक्की, झारखंडच्या रांचीमधून टेकऑफ घेतलेली त्याची करिअर त्याच्या हेलिकॉप्टर शॉटसारखीच उंच शिखरावर जाताना आणि ती घडताना आपल्याला पाहायला मिळाली, हे आपल्यासारख्या क्रिकेटरसिकांचं भाग्यच. माहीला पुढच्या वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.
संबंधित बातम्या
Suresh Raina Retires | महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती
MS Dhoni Retires: महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास
MS Dhoni Retires | कॅप्टन कूल धोनीच्या निवृत्तीवर सचिन, विराटची प्रतिक्रिया, म्हणाले...
BLOG | दॅट्स द वे माही वे...
अश्विन बापट, एबीपी माझा
Updated at:
16 Aug 2020 09:28 AM (IST)
महेंद्रसिंग धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीच्या निर्णयाचं वर्णन करण्यासाठी मला हे शब्द चपखल वाटतात. 'दॅट्स द वे माही वे'. जितक्या अनपेक्षित चाली तो मैदानावर खेळायचा, त्याच अनपेक्षितपणे त्याने अचानक निवृत्ती घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -