नवा गडी नवं राज्य! टीम इंडियाच्या टी-ट्वेन्टी मिशनपुरतं तरी तसंच म्हणावं लागेल. कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा या जोडीची नवी इनिंग बुधवारी सुरु झाली. नुकत्याच पार पडलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या किवी टीमला जयपूरच्या मैदानात भारताने अखेरच्या षटकात पराभूत केलं.


संघ बांधणी नव्याने होत असताना काही फ्रेश चेहरे, साहजिकच त्यांचं फ्रेश थिंकिंग हे सारं आता पाहायला मिळेल. असं असलं तरीही यावेळच्या विश्वचषकात आणि खरं तर याआधीही काही गोष्टी अधोरेखित झाल्या. ज्याच्यावर आता टीम इंडियाने भर द्यायची गरज आहे. येत्या तीन वर्षात वनडे वर्ल्डकप आणि आणखी एक टी-ट्वेन्टी वर्ल्डकप आपल्याला खेळायचाय. त्यामुळे परीक्षा जवळ जवळच असल्याने आपल्याला अभ्यासाला फार वेळ नाहीये. त्यात आपल्या टीमची गत काही वर्षातील कामगिरी पाहता आपल्याकडून अपेक्षा बोर्डात येण्याची आहे. जशी याही वेळी होती. असं असलं तरी काही गोष्टींचा रिअलिस्टिकली विचार व्हायला हवा. यात आपल्या संघात नसलेल्या किंवा अत्यंत गरजेच्या असलेल्या दोन गोष्टींचा अभाव जाणवला. त्यातली फलंदाजीच्या पहिल्या तीन क्रमांकात डावखुरा फलंदाज असणं आणि आक्रमणाच्या फळीत डावखुरा वेगवान गोलंदाजाची उपस्थिती.


या डाव्यांनी नुकत्याच पार पडलेल्या दुबईतील स्पर्धेत तुफान कामगिरी केली. सेमी फायनल आणि फायनल आठवा. खरं तर पूर्ण स्पर्धेवरच प्रकाश टाकल्यास काही गोष्टी स्पष्ट होतायत. डेव्हिड वॉर्नर, नीशॅम, वेड या मंडळींनी फलंदाजीत केलेली कामगिरी तसंच शाहीन आफ्रिदी, ट्रेंट बोल्टने टाकलेले सुरुवातीचे स्पेल. (स्टार्कचा फॉर्म यावेळी हरवलेला वाटला, तरी तोही चॅम्पियन गोलंदाज आहे)


डावखुऱ्या फलंदाजाचा प्रथम विचार करु. आपल्याकडे शिखर धवन, ईशान किशन, ऋषभ पंत ही मंडळी आहेत. जी हे काम करु शकतात. टीम प्लॅनिंगमध्ये बाय डिफॉल्ट यावर मेहनत घ्यायला हवी. बॅटिंग ऑर्डरमध्ये याचप्रमाणे आखणी व्हावी. याचं साधं सोपं लॉजिकल म्हणजे एक डावखुरा-एक उजवा फलंदाज आघाडीत असला की समोरच्या टीमच्या गोलंदाजांना लय, टप्पा आणि दिशेत सारखा बदल करावा लागतो. जे त्या-त्या गोलंदाजांसाठी सोपं नसतं. तिथे तुम्ही काहीवेळा अर्धी लढाई जिंकून जाता. टीम बांधणी करताना भारताने ही बाब लक्षात घेऊन यावर विशेष लक्ष द्यावं. विशेषत: व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये याची महती खूप मोठी आहे.


तीच बाब गोलंदाजीत, तुमच्या भात्यात एक निव्वळ डावखुरा वेगवान गोलंदाज असेल तर त्याने तुमच्या आक्रमणात वैविध्य येतं. अपोझिशनला तुम्ही हैराण करु शकता. यॉर्कर, स्लोअरवन, इन स्विंगिंग आणि आऊट गोईंग चेंडू असा समृद्ध भाता असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज मॅच विनर ठरु शकतो. याबाबतीत पाकिस्तान क्रिकेट टीमची श्रीमंती पाहा. अगदी वसिम अक्रमपासून ते आताच्या शाहीन शाह आफ्रिदीपर्यंत व्हाया वहाब रियाझ, राहत अली, मोहम्मद इरफान, मोहम्मद आमीर, जुनैद खान...... किती नावं घ्यायची.


कांगारुंच्या टीमकडेही नजर टाकली तर ब्रुस रिड, व्हिटनीपासून ते मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, नेथन ब्रॅकन असे कित्येक गोलंदाज त्यांच्यासाठी खेळलेत.


श्रीलंकेच्या वर्ल्डकप विनिंग टीमचीही ताकद पाहिली तर डावखुऱ्यांचं महत्त्व लक्षात येतं. म्हणजे चामिंडा वाससारखा क्लासी बॉलर. याशिवाय फलंदाजीत जयसूर्या, गुरुसिंघे, रणतुंगा, तिलकरत्ने असे दादा बॅट्समन.


याउलट आपल्याकडे गोलंदाजांच्या बाबतीत म्हणायचं तर पूर्वीच्या काळात करसन घावरी त्यानंतर मला तरी थेट झहीर खान, आशिष नेहरा, आर.पी.सिंग, इरफान पठाण हेच आठवतात. यातल्या झहीर खानने आपलं नाणं सातत्याने खणखणीत वाजवलं. 


जयदेव उनाडकट, खलील अहमद हेही अलिकडच्या काळात थोडंफार खेळले. पण, लंबी रेस का घोडा वाटावा असा परफॉर्मन्स अजून तरी या दोघांकडून पाहायला मिळाला नाहीये. चेतन साकरियाचं नावंही चर्चेत आहे. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करण्याची क्षमता या नावांमध्ये आहे का? ती तशी निर्माण करण्यासाठी वा त्यांच्यातली क्षमता वाढवण्यासाठी आपली तयारी काय? याची उत्तरं आपल्याला शोधावीच लागतील. आपल्याकडे नुसते हिरे असून चालत नाहीत, त्याला पैलू पाडावे लागतात. ते पैलू पाडले जातायत का?


आपलं स्थानिक क्रिकेट सध्या जगातील सर्वोत्तमपैकी एक मानलं जातं. एनसीएसारखं क्रिकेट विद्यापीठ आपल्याकडे आहे. पुरेसा पैसा आहे, अत्याधुनिक सुविधा आहेत. भारतासारखा 130 कोटींची लोकसंख्या असलेला विशाल पसरलेला देश. ज्यात तुम्हाला डावखुरे वेगवान गोलंदाज हेरणं हे फार कठीण नाही. म्हणूनच फोकस्डली या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा शोध घेतला जावा. गल्लीबोळात जाऊन टॅलेंट हंटसारखी प्रोजेक्ट करावीत. ज्याचं मुख्य ध्येय डावखुरा वेगवान गोलंदाज शोधणं हाच असेल.


याची जबाबदारी झहीर खान, आशिष नेहरासारख्या माजी क्रिकेटर्सकडे दिली जावी. त्यांचं ग्रुमिंग केलं जावं. ‘पी हळद की हो गोरी’, या म्हणीसारखं एका रात्रीत आपल्याकडे पाकिस्तानसारखी डावखुऱ्या फास्ट बॉलर्सची खाण सापडणार नाही, हे मान्य. तरीही त्या दिशेने आपण नक्की जाऊ शकतो. कारण, आपलं क्रिकेट त्यांच्यापेक्षा जास्त आर्थिक सुबत्तेत आहे. नाही म्हणायला आयपीएलसारखी मसाला स्पर्धा असली तरी तिथेही खेळाडूचा कस पाहायला मिळू शकतो. अर्थात आय़पीएल हाच एकमेव कामगिरीचा निकष नसावा. तरीही ती एक पायरी ठरु शकते.


आपल्याकडे सध्या बुमरा, शमी, भुवनेश्वर, ईशांत, उमेश यादवसारखे वेगवान गोलंदाज आहेत, जे वेगवान गोलंदाजीतील आपली ताकद आहेत. अश्विन, जडेजा, चहल, चहर, कुलदीप यादवच्या रुपात आपली फिरकीची बाजूही बळकट आहे.


त्यात जर एक किंवा दोन डावखुऱे वेगवान जर समाविष्ट झाले तर गोलंदाजीला वेगळी धार चढेल. देशापरदेशात केवळ व्हाईट बॉल क्रिकेटनेच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्ये खेळतानाही या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा प्रेझेन्स अनमोल आहे. द्रविडची अभ्यासू आणि क्रिकेटचा बारकाईने विचार करण्याची वृत्ती पाहता हे जितकं लवकर होईल, तितकं ते टीम इंडियाच्या भल्याचं आहे.



संबंधित ब्लॉग-