क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज अर्थात अनिश्चिततेचा खेळ अशी ओळख या खेळाने का निर्माण केलीय. याचा प्रत्यय देणारी थरारक सेमी फायनल आपण बुधवारी अनुभवली. पावसाच्या कृपेमुळे (खरं तर अवकृपेमुळे) दोन दिवसीय वनडे उपांत्य फेरी आपण पाहिली. ज्यात गोलंदाजांची दृष्ट लागण्यासारखी कामगिरी झाल्यावर फलंदाजांनी त्यावर कळस चढवणं बाकी होतं. पण, 240 च्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना आपण 18 धावांनी खुजे ठरलो आणि वर्ल्डकपमधून बाहेर झालो.


यामध्ये आपल्या फलंदाजीची कारणमीमांसा करुयाच. पण, किवी टीमला त्यांच्या यशाचं श्रेय सुरुवातीला देऊया. त्यांनी आपल्या शिस्तबद्ध गोलंदाजीने आणि तितक्याच दक्ष क्षेत्ररक्षणाने हे 240 चं लक्ष्य 280 चं भासवलं. बोल्ट आणि हेन्रीचा पहिला स्पेल आपल्याला फायनलचं दार बंद करुन गेला असं मला वाटतं. फलंदाजांची जशी भागीदारी क्रिकेटमध्ये मोलाची असते तशीच गोलंदाजांचीही. या सामन्यात तेच झालं. आधी बुमरा-भुवनेश्वर नंतर बोल्ट-हेन्री. किंबहुना बोल्टने एका बाजूने दबाव निर्माण केला आणि हेन्रीला विकेट मिळाल्या. ज्यामध्ये विल्यमसनच्या अत्यंत हुशार नेतृत्वाची जोड लाभली. कोहलीची विकेट त्याने ज्या पध्दतीने सेट अप केली, त्याला तोड नाही. क्षेत्ररचना आणि तशी गोलंदाजी. सारं काही त्यांच्या मनासारखं झालं आणि आपला घात झाला. आपला स्पर्धेतला मिस्टर कन्सिस्टंट रोहित शर्मा एका अप्रतिम चेंडूवर सापडला. मला वाटतं न्यूझीलंड टीममध्ये ही विकेट नवी जान फुंकून गली. कारण, नंतर त्यांचा खेळ एका वेगळ्याच उंचीचा

वाटला. पाठोपाठ कोहलीही मिळाल्याने त्यांचं बळ वाढलं आणि आपली धडधड. अशा स्थितीत मला असं वाटतं की, आपण एक टॅक्टिकल ब्लंडर केलं. अर्थात रणनीतीमधली घोडचूक. धोनीला चार नंबरवर फलंदाजीला न पाठवण्याची. सेमी फायनलसारख्या अत्यंत प्रेशर मॅचमध्ये जिकडे तुमचं एक पाऊल लॉर्डसच्या आणि दुसरं भारताच्या वेशीवर होतं, तिकडे आपला सर्वात अनुभवी फलंदाज आपण पॅव्हेलियनमध्येच ठेवला आणि त्याच्याआधी पाठवला टीमच्या आतबाहेर असलेला दिनेश कार्तिक तसंच दोन स्फोटक तरीही अननुभवी फलंदाज. पंत आणि पंड्या. बरं तेव्हा धावांची गती अशीही काही मोठी नव्हती की, दोन्ही साईडने हिटिंग व्हायला हवं होतं. मग, धोनीला मागे ठेवण्याचं कारण काय ? समोर बोल्ट, हेन्री, फर्ग्युसन, सँटनर आपल्या बॅटिंगला निखाऱ्यावरुन चालायला लावत होते. स्कोरबोर्ड तीन बाद पाच असा रडत असताना अश्रू पुसायला आणि त्या निखाऱ्यांना शांत करायला आपल्याकडे उपलब्ध असलेली आईस फॅक्टरी कुलुपबंद करुन ठेवली आणि तिथेच किवी टीमचं काम आपण सोपं केलं. म्हणजे पंत किंवा पंड्याच्या जोडीला जर धोनी असता तर जे दोन फटके त्या दोघांनी प्रेशरखाली मारले ते मारले नसते.

रो'हिट' मॅन....लगे रहो....

अर्थात चक दे इंडियामधील डायलॉगनुसार, वो सत्तर मिनिट....तसंच वो दस ओव्हर किंवा वो 45 मिनिट. पहिल्या 45 मिनिटांमध्येच आपण कोसळलो. आपले दोन सर्वोत्तम फलंदाज म्हणजे रोहित शर्मा, कोहली बाद झाले. पाठोपाठ राहुलही अत्यंत अतर्क्य पद्धतीने आऊट झाला. मागच्याच सामन्यात शतक ठोकणाऱ्या राहुलची बाद होण्याची पध्दत फारच अनाकलनीय होती. कॉमेंट्रीला संजय मांजरेकर म्हणाले देखील हा आपला फॉर्म पुढच्या मॅचमध्ये कॅरी करत नाही, जे मनोमन पटलं. मधली फळी कचकड्याची होती, हे प्रूव्ह झालं. आणि सहा बाद 92 अशी स्कोरलाईन असतानाही धोनी अभी बाकी है.... च्या भरवशावर आपण पुढे मॅच खेळत आणि पाहत होतो. त्यावेळी मैदानात उतरला रवींद्र जडेजा. जो आपली स्पर्धेतली दुसरी मॅच खेळत होता. समोर अर्थातच दबावसम्राट महेंद्रसिंग धोनी. पुढचा एक-दीड तास या दोघांनी खास करुन जडेजाने जी बॅटिंग केली, ती खरंच अविश्वसनीय होती. खास करुन त्याने केलेल्या मोठ्या फटक्यांची निवड. त्याने एकही मोठा फटका क्रॉस बॅट मारला नाही. जसा पंत आणि पंड्याने मारला. शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये मॅच नेत त्याने विल्यमसन आणि कंपनीच्या हृदयाचे ठोकेही वाढवले होते. पण, पुन्हा एकदा बोल्टने ब्रेक थ्रू दिला तो जडेजाच्या रुपात. या मॅचमध्ये किवी टीमने धावा अशा वाचवल्या की, जणू त्या धावा नाहीत, खजिन्यातल्या मोहरा आहेत. अर्थात फायनलची दार उघडून देणारी प्रत्येक वाचवलेली धाव ही खजिन्यातल्या मोहरांइतकीच महत्त्वाची होती म्हणा.

त्याचप्रमाणे आलेले बहुतके सर्व कॅचेस त्यांनी घेतले. मुख्य म्हणजे 48 व्या षटकात धोनीने पहिल्याच चेंडूवर ठोकलेला षटकार पाहून आपल्याला फायनलचं दार किलकिलं झालंय का, असं मनाला वाटून गेलं. कारण, अर्थातच धोनीकडे असलेली हमखास आणि त्याला पाहिजे तेव्हा षटकार मारण्याची असलेली क्षमता. यावेळी समोर भुवनेश्वर होता आणि धावफलक सांगत होता 10 चेंडूंत 25. धोनीने अशी समीकरणं पूर्वी अनेकदा चुटकीसरशी सोडवली असल्याने आपली नैया पार होणार असं वाटत असतानाच मार्टिन गप्टिलने त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची मोमेंट अनुभवली. धोनीने मारलेला फटका त्याने अडवून थेट स्टम्पवर मारला. कॉमेंट्रीला असलेला इयान स्मिथ ओरडला इज दिस अ फायनल. या स्पर्धेत फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या गप्टिलने त्याच्या करिअरमधील एखाद्या सेंच्युरीपेक्षाही मोठी कामगिरी केली.

थर्ड अम्पायरच्या रिप्लेत धोनीची धाव काही इंचांनी कमी असल्याचं दिसलं आणि आपलं परतीचं तिकीट कन्फर्म झालं. धोनी जड पावलाने पॅव्हेलियनमध्ये परतत होता आणि आपण जड मनाने हे सारं पाहत होतो. अर्थात त्यावेळी त्याच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पनाही न केलेली बरी.

कोहली शेर तर केदार सव्वाशेर...

ज्या धोनीने आपल्याला टी-ट्वेन्टी, वनडेचा विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. ज्याने आपल्याला कसोटीतही नंबर वन केलं. त्याच्यासाठी तरी अन्य खेळाडूंनी ही ट्रॉफी जिंकायला पाहिजे होती. त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. आज तो 38 वर्षांचा आहे, त्याचा फिटनेस आजही लाजवाब आहे. म्हणजे एक-दोन धावा तो चित्त्याच्या चपळाईने धावतो. पुढच्या वर्ल्डकपला तो 42 असेल. तो तेव्हा खेळत असेल, नसेल आता सांगणं कठीण आहे. बहुतेक सर्व जण त्याचा हा अखेरचा वर्ल्डकप आणि या स्टेजवरची त्याची ही अखेरची इनिंग असल्याचं बोलत असताना मन गलबलून येत होतं. ज्या माणसाने मैदानावर आपल्या समर्पित वृत्तीने खेळताना रक्ताचं पाणी केलं. ज्याने गांगुलीनंतर टीमचा चेहरामोहरा बदलला. टीम इंडिया म्हणून संघाला आणखी घट्ट बांधलं. ज्याने कोहलीसकट आजच्या अनेक युवा खेळाडूंना पाठीवरुन वडिलकीचा हात फिरवत टेम्परामेंट, संयम शिकवला. त्याच्यासाठी तरी फायनल गाठून विजेतेपद पटकवायला हवं होतं. कोहलीने धोनीला बर्थ-डे विश करताना म्हटलं होतं. यू हॅव बिन अ बिग ब्रदर टू ऑल ऑफ अस आणि यू विल ऑलवेज बी माय कॅप्टन. धोनीचं हे स्थान केवळ खेळाडूंच्याच नव्हे तर तुमच्या आमच्या मनातही आहे. त्यामुळेच अजूनही हुंदके आवरत नाहीयेत. हा लेख टाईप करताना की-बोर्डही ओलसर जाणवतोय, कदाचित त्यालाही भावना आवरत नसाव्या.

असो..... पण, एक गोष्ट नक्की की, वनडेत टीम इंडिया पुढची काही वर्षे राज्य करणार ही बाब या स्पर्धेने निश्चित केली. अर्थात मधल्या फळीवर थोडं काम करावं लागेल, तरीही या टीममधील खेळाडूंमध्ये मोठ्या स्टेजवर परफॉर्म करायची क्षमता आणि गुणवत्ता नक्कीच आहे. त्या 45 मिनिटांचा अपवाद वगळता टीमने पूर्ण स्पर्धेत जो खेळ केला, तो आपली मान ताठ करणाराच होता. त्यामुळे सेमी फायनलच्या पराभवाची सल मनात ठेवूनही टीमची पाठ थोपटताना कॅप्टन कूल धोनीला सलाम करुया आणि पुढच्या वाटचालीसाठी ऑल द बेस्ट म्हणूया.

बर्थडे स्पेशल : भारतीय क्रिकेटचा बिग ‘व्ही’