अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरा वारी, 
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी



देहू आळंदीहून निघालेली पंढरीची वारी सासवड सोडलं की कधी एकदाची मल्हारीची होऊन जाते ते विठ्ठलालाच माहिती. 'ज्ञानोबा माउली तुकाराम' म्हणता म्हणता 'येळकोट येळकोट' कानावर ऐकू आलं की समजायचं जेजुरी जवळ आलं. रस्त्याच्या आजूबाजूलाही बघितलं तर इथल्या मातीच्या रंगावरून आपण आता जेजुरीच्या जवळ आहोत याचा अंदाज येतो. ही पिवळसर माती म्हणजे जणू सर्वत्र उधळलेला भंडाराच. याच मातीत आज माझा संपूर्ण दिवस गेला. काल सासवड मुक्कामी असलेली ज्ञानोबांची पालखी आज पहाटे लवकर नगर प्रदक्षिणा मारून जेजुरीकडे निघाली. सासवडमध्ये एक दिवस मुक्काम केल्यावर आम्ही काल रात्रीच जेजुरीत आलो होतो. त्यामुळे खरंतर आज दिंडीबरोबर चालायचा योग आला नाही. मात्र, थोडं मागे म्हणजेच सासवडकडे जाऊन आम्ही दिवसभर चालत राहणारा हा वारकरी समाज न्याहाळत होतो. दोन दिवस सासवडमध्ये राहुट्या ठोकून असलेले वारकरी आज आपला गाशा गुंडाळून मार्तंडाच्या नगरीकडे निघाले होते. दरवर्षी दिवेघाटात येणारा पाऊस आज जेजुरी आलं तरी काय पडायला धजला नाही. त्यामुळे धरणी शांत होत नाही. तिचा दाह तसाच आहे जो वारकऱ्यांचे घसे कोरडे करत होता, पायाला फोड आणत होता. तशाही अवस्थेत वारकरी चालतच होते.


आज चालताना एक दृश्य चांगलं होतं. ते म्हणजे देहू किंवा आळंदीपासून चालत असताना असलेले अरुंद रस्ते आज खुप रुंद झाले होते. त्यामुळे चालायला खूप जागा खरंतर मिळत होती.  आजूबाजूला वाहनांनाही जागा मिळत होती. थोडं मागे मागे जाताना आम्हाला एका जागी जमाव दिसला जिथे भर उन्हात काहीतरी सुरु असल्यासारखं दिसलं. तिथे पोहोचल्यावर रखरखत्या उन्हात शे-सव्वाशे पोरं गाणी गाताना दिसली. जवळ गेल्यावर कळलं की त्यांचं पर्यावरण आणि स्वच्छतेवर पथनाट्य सुरू होतं जे विसाव्याला बसलेल्या वारकऱ्यांसाठी योजिलं होतं. त्यातले विनोदी सीन बघून वारकरीही मस्त मजा घेत घेत ते पथनाट्य बघत होते. वारीत चालणारा समाज हा बहुतांशी अशिक्षित असतो. त्या अशिक्षितांना छोटया छोट्या गोष्टींचं महत्त्व ही पोरं पोट तिडकीनं पटवून देत होती, जी गरजही आहे. त्या पोरांशी बोलून आम्ही पुन्हा वारीकडे वळलो. 


एका झाडाखाली पाणी प्यायला बसल्यावर माझ्यासमोर फार मजेशीर किस्सा घडला. दुपारच्या रखरखत्या उन्हात 3 वासुदेव माझ्यासमोर आले आणि 'सकाळ सकाळी हरिनाम बोला गावू लागले'. मी ही गाणं होऊ दिलं आणि तिघांना ओळीने नमस्कार केला. त्यांची तरी काय चूक. बिचाऱ्यांचं एकच गाणं बसलं असेल. वारी मात्र, अशा सर्वांचा पंढरपूर येईपर्यंत सांभाळ करते. हळूहळू ऊन उतरायला लागलं तसा माउलींच्या पालखीचा रथ जेजुरी गाठायला लागला. इकडे जेजुरीत लहानसहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वच जण मिळेल ती जागा गाठून माउलींच्या रथावर भंडारा उधळायला खडे ठाकले होते. सर्वांच्या नजरा आता सासवडकडून येणाऱ्या गर्दीकडे होत्या. कधी एकदाचा रथ दिसतो आणि आपण भंडारा उधळतो असं झालं होतं. अखेर 5 वाजता रथ आला. आला म्हणताच सर्वांची एकच गर्दी. सर्वांना माउलीच्या रथावर भंडारा उधळायचं सुख  अनुभवायचं होतं. इकडे माउलीलाही विठाईच्या आधी म्हाळसाई-बाणाईला भेटायचं असतंच. माउलींच्या पालखीवर भरपूर भंडारा उधळला गेला. तो क्षण अनुभवताना या नगरीला सोन्याची जेजुरी का म्हणतात ते कळालं. भंडाऱ्याची उधळण होताच माउलीचं सर्वांनी करतलध्वनी करत मार्तंड नगरीत स्वागत केलं. 


या सोहळ्यामुळे शैव आणि वैष्णव दरवर्षी एकत्र येतात तसे याही वर्षी एकत्र आले. शैव आणि वैष्णव एकत्र येण्याचा हा एकमेव योग असतो. शैव म्हणजे शिवाचे भक्त जे केवळ शिवाला मानतात. वैष्णव म्हणजे विष्णूचे भक्त जे विष्णूला मानतात. त्यांच्या परंपरेतील एखाद्या सत्पुरुषाला थेट विष्णूचा अवतारही समजतात. 'तुका विष्णू नाही दुजा' संत तुकारामांना वारकाऱ्यांमध्ये विष्णूचा अवतार म्हटलं जातं. काही आणखी संतांचीही अशी भगवान विष्णूशी तुलना केली जाते. असा हा शैव-वैष्णव भेटीचा योग या प्रसंगी जुळून येतो. एरवी एकमेकांच्या परंपरांना, एकमेकांच्या आराध्यांना न मानणारा हा समाज यावेळी मात्र, एकत्र येतो.  शैव-वैष्णवांचे वाद आपणही कधीना-कधी ऐकलेलेच असतील. पंढरपुरातील पांडुरंगाचे प्रिय, संत नरहरी सोनारांचा वादाचा किस्सा तर संप्रदायात प्रचलित आहे. मात्र, आजचा क्षण त्याला अपवाद ठरतो. 


हरी हरा भेद । 
नाही करू नये वाद ।।
   
हरि आणि हराची वेगवेगळी रूपं नाहीत असं स्वतः तुकाराम महाराज सांगतात. त्यामुळे सर्वांना सामावून घेणारा आणि सर्वांच्यात सामावणारा हा संप्रदाय आज एवढ्या प्रचंड लोकसंख्येने रस्त्यावर चालताना दिसतो. या संप्रदायातील संतांच्या विचारांचे वैभव आणखी उत्तरोत्तर वाढत राहो. हीच आमची जेजुरीच्या मुक्कामी प्रार्थना. उद्या वाल्हेला माउली पहाटेच निघतील. तेव्हा आपणही निघावे. तूर्तास रामकृष्ण हरि...


मयूर बोरसे यांचे इतरही ब्लॉग वाचा :