काल संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा पार  पडला. प्रथेप्रमाणे पहाटे अभिषेक करून, त्यानंतर पादुका पुजनानंतर कीर्तन झाले आणि पालखीने प्रस्थान ठेवले. पालखीने प्रस्थान ठेवले असले तरी काल पालखी देहूतील इनामदार वाड्यातच मुक्कामी होती. आज खऱ्या अर्थाने देहूतून तुकारामांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती झाली. मावळ प्रांताबरोबरच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी विशेषत: तुकारामांप्रति श्रद्धा असणारा समाज या पालखी सोहळ्यात सहभागी झाला. आज आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराज विसाव्याला असतील.


वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या आणि तत्वज्ञानाची बैठक देणाऱ्या मुक्त कैवल्य तेजोनिधी असे स्वरूप असणाऱ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा हे आजच्या दिवसाचे फलित. फलित यासाठी की हा सोहळा अनुभवण्यासाठी वारकरी जिवाचं रान करून येतो. इंद्रायणीला अक्षरश: धवल धोतर, सदरा, टोपी, पंचा, तुळशीमाळ घातलेल्यांचा पूर यावा एवढ्या संख्येने हा श्रद्धाळू समाज एकवटतो. थेट पंढरीला जाण्याऐवजी 'चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू' हे वारकऱ्यांचे आळंदीत येण्याचे प्रयोजन असते. तद्नंतर वर्षभरापासून काही आपण एकमेकांना भेटलो नसल्याने आता या निमित्ताने 'होतील संतांचिया भेटी, सांगू सुखाचिया गोष्टी'म्हणत आजच्या दिवशी वारकरी येथेच विसावा घेतात. एवढ्याच आशेवर ते येतात. काहीही मागणं नाही, उलट द्यायलाच आलेले असतात. आजही असाच काहीसा भाव आळंदीत होता. माउलींच्या पालखीच्या प्रस्थानापूर्वी पहाटे विधीवत घंटानाद काकड आरती व इंद्रायणी जलाभिषेक, वीणा मंडपामध्ये कीर्तन झाले. त्यानंतर  दुपारी समाधीला पाणी घालण्यात आल्यावर गुरु हैबतबाबा आणि संस्थानातर्फे माउलींची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना प्रसाद देण्यात आला. पादुका पूजन आणि नामसंकीर्तन करत पालखीने प्रस्थान ठेवले. मात्र, आज ज्ञानोबाराय येथील गांधीवाड्यातच मुक्कामी असतील. उद्या पहाटे खरं त्यांचं आळंदीच्या बाहेर प्रस्थान होईल. 'बहुत सुकृतांची जोडी म्हणोनि विठ्ठल आवडीं' असं म्हणणारी माउली आता एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा आपल्या पांडुंरगाचे ते विटेवर उभे रूप स्वरूप  अनुभवायला आणि ते बघितल्यावर 'तो हा विठ्ठल बरवा' या अमृताअनुभवाचा आस्वाद घेण्यासाठी निघाली आहे.


      आपण वर वर्णिलेल्या दोनही पालख्यांनी प्रस्थान ठेवले. पालख्यांची ही वारी कशी सुरू झाली आणि तुकाराम महाराजांचे लहान चिरंजीव नारायण महाराजांनी या पालख्यांना एकत्रित आणत कशी शिस्तबद्धता वारकऱ्यांमध्ये आणली याबाबत आपण काल बोललोच आहोत. आता ज्ञानेश्वरांच्या पालखीच्या इतिहासावर आपण थोडंसं बोलू म्हणजे आपल्याला वारीचे आताचे स्वरूप अनुभवायला मदत होईल. इसवी सन १६८५ मध्ये नारायण महाराजांनी वारीला राजाश्रय मिळवून देत ज्ञानोबा आणि तुकाराम यांना एकत्र आणण्याचे काम केले जे त्या काळात आत्यंतिक गरजेचे होते. कारण त्याकाळी मराठीजन परकीय अमलाखाली होते. पुढे वारीला एकत्र जाण्याचा हा नेम सुमारे दीडशे वर्ष सुरू होता  मात्र, १८३२नंतर हैबतबाबांनी आपल्याला आलेल्या काही अनुभवांनंतर ज्ञानेश्वरांच्या चरणी स्वत:ला वाहून घेत ज्ञानेश्वरांचा  वेगळा पालखी सोहळा सुरू केला. त्यांनीही शितोळे सरकारांकरवी या पालखी सोहळ्याला राजाश्रय मिळवून दिला. जरी पटका, पालखी, हत्ती, घोडे, तुतारी, अब्दागिरी शितोळी सरकारांनी माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिले आणि या पालखीला वेगळेच वैभव प्राप्त झाले. हा झाला थोडक्यात इतिहास. आज हत्ती नसले तरी स्वाराचा आणि माउलींचा अश्व आपण उभ्या, गोल या दोनही रिंगणांमध्ये  प्रतिवर्षी दिमाखाने धावताना बघतोच. पूर्वीचे प्राप्त झालेले हे वैभवही आता शतगुणांनी वाढले आहे.


 या पालख्यांबरोबर अनेक दिंड्या वर्षानुवर्षे एकत्र चालत आहेत. कालानुसार वाढत गेलेला समाज आता खूप वाढला आहे आणि संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज पालख्यांनी विराट स्वरूप प्राप्त केले आहे. एवढा विराट जनसागर एकत्र जात असताना याही काळात मात्र, पालखी मार्गावर कोणताही त्रास किंवा गैरसोय होत नाही. त्याचं कारण म्हणजे वर्षानुवर्षांचा अनुभव आणि नियोजनबद्धता आणि सकल वारकरी समाजाकडून एकमेकांना मिळणारे सहकार्य. या पालख्यांबरोबर जाणाऱ्या दिंड्या म्हणजेच वारकऱ्यांचे छोटे छोटे कळप किंवा गट अतिशय नियोजनबद्धतेने पुढे मार्गक्रमण करत असतात. कोणत्या गटाने कुठे चालावे याचा एक अलिखित आणि सर्वमान्य करारच त्यांच्यात झालेला आपल्याला वर्षानुवर्षे बघायला मिळत आहे. अनेक दिंड्यांचा एकमेकांबरोबर चालण्याचा क्रम ठरलेला. कोणी पुढे तर कोणी मागे. दोन दिंड्यांचे असे क्रम  ठरलेलेच असतात. मात्र, अजून सुक्ष्म नियोजन बघायचे झाल्यास एका दिंडीतही कोण कुठे चालणार हाही क्रम ठरलेला. सर्वांत पुढे ध्वजवाहक चालतो. त्याच्या मागे केवळ मोकळा चालणारा समाज चालतो. त्यांच्या मागे टाळकरी आणि मग वीणेकरी चालतात. यानंतर वारीत सर्वांना पाणी पुरवणाऱ्या महिलांचा गट म्हणजे हांडेवाल्या महिलांचा गट चालतो. त्यांच्या मागे डोईवर तुळसी घेऊन चालणाऱ्या महिला चालतात. त्यांनतर मोकळा चालणारा महिलांचा समाज मागे चालतो. वारी अशीच सुरूवातीपासून शेवटपर्यंत एकत्र जाते. वारीतील ही शिस्तबद्धता, सहकार्याची भावना, एकमेकांप्रतिचा आदरभाव आणि दिवसभर केवळ विठोबाचे नाम याची अनुभूती घेण्यासाठीच संत म्हणतात 'एक तरी वारी अनुभवावी'. त्याच वारीचा अनुभव आपण येथून पुढे आषाढीपर्यंत घेत जाणार आहोत.  


आज ज्ञानेश्वरांच्या पालखीने प्रस्थान ठेवले आहे. मात्र, प्रत्यक्ष चालायला उद्या सुरूवात होईल. तुकारामांच्या पालखीने आज सुरूवात केलीच आहे. उद्या दोनही संतांच्या  पुण्यातील संगम चौकात भेटी होतील आणि ते दोन दिवस पुणे शहरात विसावतील. पुण्याचा पाहुणचार घेतील. त्यांची ही भेट होत असताना लाखो वारकरीही आपल्या सग्यासोयऱ्यांना भेटतील. त्यांच्यातील नात्याचा दुवा केवळ हा विठ्ठल असेल ज्याच्यासाठी ते पाठीवर संसार घेऊन पुढील काही दिवस एकत्र मार्गक्रमण करतील. हा मार्गक्रमण करत असताना कुठेही आपली बाधा इतरांना होणार नाही याची काळजी घेणं हा प्रत्येक वारकऱ्याचा स्वभावधर्मच पुढील काळात होणार आहे. याची प्रचिती पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी आलीच आहे. उद्या पुणेकरांसाठी दिवाळी आणि दसऱ्याचा योग असेल. साधुसंतांचे मोठ्या मनाने स्वागत करून त्यांना सात्विक पाहुणचार पुणेकर गेले कित्येक वर्षे देत आहेत. उद्याही साहजिकच हा पाहुणचार असेलच. शेवटी 'जरी झाला संन्यासी तरी वासी तोंड माध्यानाला' संन्यासाला सुद्धा भूक लागल्यावर भोजनाची आवश्यकता असतेच. आपण तर सामान्य प्रापंचिक माणसं. पुणेकरांचा चविष्ट पाहुणचार पुढील दोन दिवस घेऊ आणि पुढील प्रवासाला सुरूवात करू. तूर्तास, रामकृष्ण हरि.