शिकागोहून दिल्लीला नॉनस्टॉप येणारे एअर इंडियाचे विमान अर्ध्यातून माघारी फिरवावे लागल्याची लाजिरवाणी घटना काल घडली. या विमानातील १२ टॉयलेट्सपैकी अकरा टॉयलेट्स / कमोड चोकअप झाल्याने विमान माघारी फिरवावे लागल्याने ही घटना अत्यंत लज्जास्पद म्हणावी लागेल. या टॉयलेट सीट्समध्ये प्रवाशांनी पॉलिथिन बॅग्ज, डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, इनरविअर्स आणि बॉटल्स टाकल्याचे उघड झालेय. या घटनेमुळे आपल्याकडील काही लोक एअरइंडियाला ट्रोल करत आहेत. खरेतर अपवाद वगळता समग्र भारतीय माणूसच यासाठी ट्रोल व्हायला हवा! कारण आपल्याकडील रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स मधील टॉयलेट्स अत्यंत गलिच्छ घाण अवस्थेत असतात. चुकून कधी अशा ठिकाणी जायचा प्रसंग जरी आला तर केवळ दरवाजा उघडून पाहिला तरी माणूस ओकारी करेल असे दृश्य दिसते. इतकेच नव्हे तर अशा कमालीच्या घाणेरड्या ठिकाणी गेल्याची एक घृणास्पद स्मृती मनात अकारण ठासून राहते त्याचा पुनर्स्मरण देखील शरमेने मान खाली घालायला लावते!


...आणि पुढचे काही मिनिट्स श्वास कोंडतो!


सार्वजनिक मालमत्तेची जितकीही ठिकाणे असतील जसे की सिव्हिल हॉस्पिटल्स, कोर्ट, महापालिका, जिल्हा परिषदा, बगीचे, मॉल्स, बिझिनेस कॉम्प्लेक्सेस इत्यादी ठिकाणीही असाच घाणेरडा अनुभव येतो! रेल्वेमधील टॉयलेट्स तर न बोलण्याच्या पलीकडची बाब होय! कोणताही प्रवासी वर्ग असला तरी रेल्वे टॉयलेट्स भयंकर घाण असतात. शिगोशीग भरलेले पॉट्स आणि दुर्गंधीने जीव नकोसा होतो. विमाने देखील आपण यातून सोडली नाहीत हे अत्यंत शरम वाटण्याजोगे होय. अनेक पुरुष कमोडचे कव्हर न उचलता कुठेही लघवी करतात. आपल्या सार्वजनिक मुताऱ्या म्हणजे किळस आणि गलिच्छतेचे आदर्श ठरावेत. ज्या रस्त्यावर मुताऱ्या असतात त्यावरून जाताना देखील तो 'दरवळ' नाकात शिरतो आणि पुढचे काही मिनिट्स श्वास कोंडतो!


सार्वजनिक वर्तन कमालीचे बधीर, बेफिकीर


कोणत्याही सरकारी वा सार्वजनिक ठिकाणी लोक कुठेही थुंकतात. रस्त्यांवर उघड्यावर लघवी करतात. शौच करतात. कोणत्याही सण उत्सव मिरवणुकांसाठी रस्ते खोदतात. सरकारी यंत्रणाही कोणताही रस्ता कधीही खोदतात आणि पूर्ववत दुरुस्ती न करता तसेच काम सोडून देतात. रेल्वे, बसेस वा थिएटर्स वा तत्सम ठिकाणी लोक सीटकव्हर्स फाडून ठेवतात. जिन्यात मावा गुटखा पानाच्या पिचकाऱ्या मारतात. घरे स्वच्छ ठेवून कचरा कुठेही टाकतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत. एक ना अनेक हजारो मुद्दे इथे मांडता येतील. आपले सार्वजनिक वर्तन कमालीचे बधीर, बेफिकीर आणि सेन्सलेस आहे. आपल्याला सार्वजनिक कर्तव्यांची जराही चाड नाही. लोक खुशाल रेल्वे रुळांवर संडास करत बसतात. खेड्यांनी अजूनही लोक उघड्यावर शौचास बसतात कारण त्यांच्या घरात सरकारी अनुदानातून बांधलेल्या संडासात पाणीच नसते. जिथे प्यायला पाणी नाही तिथे धुवायला कोठून आणणार याचा विचारच सिस्टीमने केलेला नसतो!


काय करावं अशा लोकांचं?  


अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अथवा नळाला तसेच सार्वजनिक संडासमध्ये शंभर ठिकाणी चेमटलेल्या जर्मनच्या ग्लासला साखळीने बांधून ठेवलेले असते! लोक तिथला ग्लासही चोरून नेतील की काय याची भीती असते! अनेक लोक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान हेतुतः करतात तर किरकोळ वस्तूंवरही बिनदिक्कत हात साफ करतात! फुटपाथवरचे पेवर्स देखील चोरून नेतात! रस्त्याच्या कडेने अथवा मध्ये लावलेली सुंदर फुलझाडंही लोक सोडत नाहीत! काय करावं अशा लोकांचं!          


अन्यथा आपण जगापुढे पुन्हा पुन्हा शरमिंदा होत राहू


आपण भारतीय असण्याचा गर्व करणे, आपल्याला राष्ट्रवादी मानणे या गोष्टींनीच आपण स्वतःला देशाभिमानी मानून घेतो मात्र वास्तवात आपल्या देशाची वा आपल्या सकल भारतीय समाजाची शान राखली जावी म्हणून आपल्याकडून जे सार्वजनिक वर्तन अपेक्षित असते तिथे आपण कमालीचे बेगडी आणि भोंगळ शाबित होतो! विशेष म्हणजे याची आपल्याला किंचितही चाड नसते. आपले सार्वजनिक वर्तन सुधारण्याची भयंकर गरज आहे अन्यथा आपण देश म्हणून,  लोकसंख्या म्हणून मोठे असू, आपल्या स्वतःच्याच स्वप्नातले विश्वगुरू असू मात्र वास्तवात आपण एक डस्टबिन कम कमोड असू जे आपणच तुंबवून ठेवेलेलं आहे. आपलं प्रशासन वा आपले राजकारणी यावर कधीही बोलणार नाहीत कारण त्यांनाच मुळात लोकांना नागरिकशास्त्रापासून दूर ठेवायचेय! आपण भूतकाळात सोन्याचा धूर काढत होतो वा जगातले सर्वात शक्तिशाली शासक होतो वा आपली गतकाळातली संस्कृती सर्वश्रेष्ठ होती याच्या कालकथित आनंदात रमण्याऐवजी आपण वर्तमानात कसे आहोत नि आपल्याला कसे असायला हवे याचे भान आपल्याला आले पाहिजे! अन्यथा आपण जगापुढे पुन्हा पुन्हा शरमिंदा होत राहू! 


शौचालयाचे नागरिकशास्त्रही सिलॅबसमध्ये ठेवावे काय?


मर्मकवी अशोक नायगावकर यांची 'सुलभ शौचालय' नावाची एक कविता आहे. सरकारने जगायची नाहीतर हगायची सोय केली असे ते कवितेत म्हणतात मात्र त्याहीपुढे जाऊन असे म्हणावे वाटते की हगायचे कसे नि कुठे नि कधी हेही आता शिकवावे लागते की काय? नि हे काम कोण करणार? आता सुलभ शौचालयाचे नागरिकशास्त्रही  सिलॅबसमध्ये ठेवावे काय?  


हेही वाचा :


Blog : "यंदा दुर्गा मूर्तीसाठी आम्ही माती देणार नाही!... "


Rashid Khan : राशीद खान आणि आओगे जब तुम साजना..


'स्पिनचा सरदार' ज्याने बीसीसीआयचे तळवे चाटले नव्हते!