Varuthini Ekadashi 2022: एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. वेगवेगळ्या महिन्यात येणाऱ्या एकादशीची वेगवेगळे महत्त्व आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला ‘वरुथिनी एकादशी’ असे म्हणतात. या दिवशीही भगवान विष्णूची मनोभावे पूजा केली जाते. आज (26 एप्रिल) ‘वरूथिनी एकादशी’ आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया या मागची पौराणिक कथा...


एकादशीच्या तिथीला भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होते, तसेच मनुष्याला सुख-शांती प्राप्त होते, असे म्हटले जाते. काही पौराणिक मान्यतांनुसार ‘वरूथिनी एकादशी’चे व्रत केल्याने वैकुंठाची प्राप्ती होते.


काय आहे ‘वरूथिनी एकादशी’ची कथा?


एका पौराणिक आख्यायिकेनुसार, फार पूर्वी नर्मदा नदीच्या काठच्या परिसरात मांधाता नावाचा राजा राज्य करत होता. हा राजा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. या नदीकाठच्या जंगलात बसून, तो भगवान विष्णूची आराधना करायचा. एकदा राजा तपश्चर्येत लीन असताना, त्या जंगलात एक अस्वल आले. हे अस्वल राजाची तपस्या भंग करायचा प्रयत्न करत होते.


त्या अस्वलाने तपस्येत लीन असणाऱ्या राजाचा पाय चावण्यास सुरुवात केली. मात्र, तरीही राजाचे लक्ष विचलित झाले नाही. राजाने मनोमन भगवान विष्णूंकडे मदतीची याचना केली. आपल्या भक्ताची श्रद्धा पाहून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी या अस्वलाचा वध केला. मात्र, या अस्वलाच्या हल्ल्यात राजा मांधाताने त्याचा एक पाय गमवला होता. राजा मांधाताची अवस्था पाहून भगवान विष्णूला त्यांची दया आली.


आपल्या निस्सीम भक्ताला त्याच्या तपस्येचे फळ देत भगवान विष्णूने राजाला मथुरेत जाऊन वरूथिनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. भगवान विष्णूच्या सांगण्यावरून राजाने हे व्रत पूर्ण केले. या व्रताचे फळ राजा मिळाले आणि त्याचा पाय पूर्ववत झाला. तेव्हापासून, ‘वरूथिनी एकादशी’चे हे व्रत केले जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


महत्वाच्या बातम्या :